भारताचा लोकपाल
azadi ka amrit mahotsav

पहिल्या लोकपाल वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 17 JAN 2025 11:56AM by PIB Mumbai

 

भारताच्या  लोकपालांच्या पहिल्या वर्धापन दिन समारंभाचे १६ जानेवारी रोजी नवी दिल्लीतील माणेकशॉ सेंटर येथे भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले.

आजच्याच दिवशी, 16 जानेवारी 2014 रोजी लोकपाल आणि लोकायुक्त कायदा, 2013 च्या कलम 3 च्या अंमलबजावणीमुळे  भारताच्या लोकपालांची स्थापना झाली होती.

प्रमुख पाहुणे, भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे, मान्यवर आणि शिष्टमंडळांचे स्वागत करताना, लोकपाल सदस्य न्यायमूर्ती लिंगप्पा नारायण स्वामी यांनी त्यांच्या भाषणात म्हटले की - "हा प्रसंग केवळ चिंतनाचा दिवस म्हणूनच नव्हे तर आपल्या सामूहिक वचनबद्धतेची पुष्टी या दृष्टीने देखील खूप महत्त्वाचा आहे."

आपल्या भाषणात, लोकपालचे अध्यक्ष, न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर यांनी स्पष्ट केले की, भारताच्या लोकपालचा उदय हा "भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी लोकपालाची मागणी करणाऱ्या परिवर्तनकारी नागरी समाज चळवळीतून जन्मलेला एक महत्त्वाचा टप्पा/मैलाचा दगड आहे".

ते म्हणाले की  “16 जानेवारी हा दिवस केवळ लोकपालची स्वायत्त, स्वतंत्र आणि स्व-उपयुक्त संस्था म्हणून स्थापना करण्याचा उत्सव नाही तर हा दिवस म्हणजे आपल्या लोकशाहीचा पाया रचणाऱ्या आणि प्रत्येक स्तरावर भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचे समर्थन करणाऱ्या मूलभूत मूल्यांप्रति सर्व समान विचारसरणीच्या लोकांच्या दृढ वचनबद्धतेचे प्रतीक आहे.”

जाणकार लोकसंख्या असण्याचे महत्त्व मान्य करताना, न्यायमूर्ती खानविलकर पुढे म्हणाले की, " ज्या समाजाला त्यांच्या हक्कांची जाणीव आहे आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या संस्थेत त्यांना सहज प्रवेश मिळतो तो समाज भ्रष्टाचार सहन न करण्याचे वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे आहे".

अलिकडच्या काळात भ्रष्टाचाराविरुद्धच्या सर्वात मोठ्या सार्वजनिक चळवळींपैकी एकाचे नेतृत्व केल्याबद्दल पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या योगदानावर भर देताना, भारताचे सरन्यायाधीश म्हणाले की सत्ता जबाबदारीने वापरली पाहिजे आणि सरकारने नैतिकता, जबाबदारी आणि पारदर्शकता पाळली पाहिजे, या लोकशाहीच्या केंद्रस्थानी असलेल्या तत्वांचे लोकपाल समर्थन करतो. त्यांनी पुढे सांगितले की, लोकपाल हे आपल्या संवैधानिक योजनेसाठी सर्वात महत्त्वाचे आहे कारण ते भ्रष्टाचाराच्या विषावर उतारा प्रदान करते, हा धोका जगभरातील लोकशाहींना ग्रासलेला आहे.

लोकपालच्या प्रवासावर लोकपालच्या उत्क्रांती आणि पुढील वाटचालीचे दर्शन घडवणारी एक व्हिडिओ फिल्म लोकपालच्या आयटी विभागाने तयार केली होती त्याचे यावेळी सादरीकरण करण्यात आले.  लोकपालच्या कार्याचे चित्रण करणारा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तयार केलेला एक लघु माहितीपट देखील यावेळी दाखविण्यात आला.

***

S.Patil/H.Kulkarni/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2093946) Visitor Counter : 9