पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 चे उद्घाटन
विकसित भारताचा प्रवास हा गतिशीलता क्षेत्रात अभूतपूर्व परिवर्तन आणि अनेक पटींनी विस्ताराचा असणार आहे: पंतप्रधान
प्रवास सुलभ बनवण्याला आज भारताचे सर्वोच्च प्राधान्य आहे: पंतप्रधान
मेक इन इंडिया उपक्रमाची ताकद देशाच्या वाहन उद्योगाच्या वाढीच्या शक्यतांना गती देत आहे : पंतप्रधान
भारताच्या मोबिलिटी सोल्यूशनचे सात सी - कॉमन , कनेक्टेड , कन्व्हिनियंट , कन्जेशन -फ्री , चार्ज्ड , क्लीन , कटिंग एज : पंतप्रधान
आज भारत हरित तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहने , हायड्रोजन इंधन आणि जैव इंधनाच्या विकासावर लक्ष केंद्रित करत आहे: पंतप्रधान
मोबिलिटी क्षेत्रात भविष्य घडवू पाहणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदारासाठी भारत हे एक उत्कृष्ट ठिकाण आहे: पंतप्रधान
Posted On:
17 JAN 2025 1:05PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 या भारतातील सर्वात मोठ्या मोबिलिटी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी सलग तिसऱ्यांदा आपल्या सरकारला निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले. ते पुढे म्हणाले की, या वर्षी या प्रदर्शनाची व्याप्ती खूप वाढली असून राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात इतर दोन ठिकाणी देखील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले गेल्या वर्षी 800 प्रदर्शक सहभागी झाले होते आणि 2.5 लाख लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली . मोदी यांनी नमूद केले की, पुढल्या 5 दिवसांमध्ये अनेक नवीन वाहने इथे प्रदर्शित केली जातील आणि अनेक प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. "यातून हे दिसून येते की भारतात मोबिलिटीच्या भविष्याशी संबंधित खूप सकारात्मकता आहे", असे ते म्हणाले. प्रदर्शनाच्या ठिकाणी भेट दिल्याचा उल्लेख करताना, मोदी म्हणाले , "भारताचा वाहन निर्मिती उद्योग विलक्षण आहे आणि भविष्यासाठी सज्ज आहे" .यावेळी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
भारतीय वाहन उद्योग क्षेत्रातील या भव्य कार्यक्रमात पंतप्रधानांनी रतन टाटा आणि ओसामू सुझुकी यांचे स्मरण केले. भारतीय वाहन उद्योग क्षेत्राच्या वाढीमध्ये तसेच भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबांची स्वप्ने पूर्ण करण्यात या दोन्ही दिग्गजांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांचा वारसा भारतातील संपूर्ण गतिशीलता क्षेत्राला कायम प्रेरणा देत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“लोकांच्या आकांक्षा आणि तरुणांच्या ऊर्जेमुळे भारताच्या वाहन निर्मिती क्षेत्रात अभूतपूर्व परिवर्तन होत आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या वर्षभरात भारतीय वाहन उद्योगात जवळपास 12% वाढ झाली आहे. “मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्ड” या मंत्रानुसार मार्गक्रमण करत असल्यामुळे निर्यात देखील वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतात दरवर्षी विकल्या जाणाऱ्या गाड्यांची संख्या अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षा देखील जास्त आहे, असे मोदी यांनी नमूद केले. एका वर्षात अंदाजे 2.5 कोटी गाड्यांच्या विक्री वरून दिसून येते की भारतातील मागणी सातत्याने वाढत आहे . जेव्हा गतिशीलतेच्या भविष्याबाबत बोलले जाते , तेव्हा भारताकडे इतक्या मोठ्या अपेक्षेने का पाहिले जाते हे या वाढीवरून दिसून येते यावर पंतप्रधानांनी भर दिला.
"भारत आज जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि तिसरी सर्वात मोठी प्रवासी वाहन बाजारपेठ आहे", असे मोदी यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की भारत जागतिक स्तरावर पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक बनण्याच्या दिशेने अग्रेसर असून , देशाच्या वाहन बाजारपेठेत अभूतपूर्व परिवर्तन आणि विस्तार होईल. देशाची मोठी युवा लोकसंख्या, मध्यमवर्गाचा होत असलेला विस्तार , वेगाने होत असलेले शहरीकरण, आधुनिक पायाभूत सुविधांचा विकास आणि मेक इन इंडिया उपक्रमाद्वारे परवडणारी वाहने यांसारखे अनेक घटक भारतातील गतिशीलतेच्या भविष्याला चालना देणारे आहेत यावर पंतप्रधानांनी भर दिला. ते पुढे म्हणाले की हे घटक एकत्रितपणे भारतातील वाहन क्षेत्राच्या वाढीला बळ देतात.
वाहन उद्योगाच्या वृद्धीसाठी गरज आणि आकांक्षा या दोन्ही गोष्टींचे महत्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भारताकडे या दोन्ही गोष्टी असून येणारी अनेक दशके भारत एक युवा देश म्हणून कायम राहील, आणि युवावर्ग हा सर्वात मोठा ग्राहक आधार असेल, भारतातील या मोठ्या युवा लोकसंख्येमुळे मागणीत लक्षणीय वाढ होईल, असे पंतप्रधान म्हणाले. याशिवाय भारतातील मध्यमवर्गीय देखील एक मोठा ग्राहकवर्ग असून गेल्या दशकभरात 25 कोटी भारतीय दारिद्र्यरेषेच्या वर आले आहेत, आणि हा नवमध्यम वर्ग स्वतःचे पहिले वाहन घ्यायला उत्सुक असेल. जसजशी प्रगती होईल तसतसे हा समूह आपल्या वाहनाचे अद्यतनीकरण करेल परिणामी वाहन उद्योगाला लाभ होईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.
एके काळी भारतात उत्तम दर्जाच्या आणि रुंद रस्त्यांचा अभाव हे वाहन खरेदी न करण्यामागील प्रमुख कारण असायचे, आता ही परिस्थिती बदलत असून "प्रवासात सुलभता हे भारतातील प्रमुख प्राधान्य आहे. "गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात पायाभूत सेवासुविधांच्या विकासासाठी सुमारे 11 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. संपूर्ण भारतात बहु-पदरी महामार्ग आणि द्रुतगती मार्ग बांधले जात असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. पी एम गतिशक्ति राष्ट्रीय बृहद आराखड्याने बहुपर्यायी संपर्कव्यवसंस्थेला गती दिली असून लॉजिस्टिक खर्च कमी केला आहे. राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरणामुळे भारत जागतिक स्तरावर लॉजिस्टिक खर्चाच्या बाबतीत सर्वाधिक स्पर्धात्मक दर असलेला देश बनेल यावर त्यांनी भर दिला. या सर्व प्रयत्नांमुळे वाहन उद्योगात अगणित संधी उपलब्ध होत असून देशातील वाहनांच्या वाढत्या मागणीचे हे एक महत्त्वाचे कारण आहे, असे त्यांनी सांगितले.
"उत्तम पायाभूत सेवासुविधांबरोबरच नवीन तंत्रज्ञानाचा देखील अवलंब केला जात आहे." असे पंतप्रधान म्हणाले. फास्टॅग मुळे भारतातील वाहन चालवण्याचा अनुभव खूप सोपा झाला आहे. राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड देशातील सुविहित प्रवासाकरता आवश्यक प्रयत्नांना अधिक बळ देत आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. भारत आता एकमेकांशी जोडलेली वाहने आणि मानव रहित वाहन या क्षेत्रातील प्रगतीसह स्मार्ट मोबिलिटी अर्थात गतिमानतेकडे आगेकूच करत आहे, असे ते म्हणाले.
भारताच्या वाहन उद्योगातील वृद्धीच्या क्षमतेमधील मेक इन इंडिया उपक्रमाच्या महत्वपूर्ण भूमिकेवर भर देत पंतप्रधान म्हणाले की उत्पादनावर आधारित प्रोत्साहन, पीएलआय योजनेने मेक इन इंडिया उपक्रमाला नवीन गती दिली असून त्यामुळे 2.25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्री होण्यास मदत झाली आहे. या उपक्रमामुळे या क्षेत्रात 1.5 लाखांहून अधिक थेट रोजगार निर्मिती झाली. वाहन उद्योग क्षेत्रातील रोजगार निर्मितीचा लाभ इतर अनेक क्षेत्रांना होतो, असे त्यांनी सांगितले. वाहन उद्योगातील लहानसहान भागांची निर्मिती सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रांत केली जाते. ज्याप्रमाणे वाहन उद्योगाचा विस्तार आणि वृद्धी होते त्याअनुषंगाने एम एस एम ई, लॉजिस्टिक्स, पर्यटन आणि वाहतूक क्षेत्रात नवीन रोजगारांची निर्मिती होते, असे पंतप्रधान म्हणाले.
केंद्र सरकार वाहन उद्योगाला प्रत्येक टप्प्यावर देत असलेल्या भक्कम पाठिंब्याला अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की गेल्या दशकभरात उद्योगजगतात थेट परकीय गुंतवणूक, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि जागतिक भागीदारी अशा विविध पातळ्यांवर नवीन क्षितिज उपलब्ध झाले आहे. अवघ्या गेल्या चार वर्षांच्या काळात या क्षेत्राने 36 अब्ज अमेरिकन डॉलर्स हून अधिक परदेशी थेट गुंतवणूक आकर्षित केली आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. येत्या काही वर्षांत हा आकडा वाढण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. भारतामध्ये वाहन उत्पादनासाठी संपूर्ण परिसंस्था विकसित करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.
"कॉमन (सामान्य), कनेक्टेड (जोडलेले), कन्विनियंट (सोयीस्कर), कंजेशन फ्री (मोकळे), चार्ज्ड (ऊर्जा युक्त), क्लीन (स्वच्छ)आणि कटिंग एज (अत्याधुनिक), या मोबिलिटी सोल्यूशन्ससाठी सात सी" बाबत त्यांच्या दृष्टिकोनाची आठवण करून देत पंतप्रधानांनी हरित गतिशीलतेवर लक्ष केंद्रित करणे हा या दृष्टिकोनाचा एक भाग आहे असे सांगितले. त्यांनी नमूद केले की, भारत अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाला आधार देणारी गतिशीलता प्रणाली तयार करत आहे, ज्यामुळे जीवाश्म इंधनांचे आयात बिल कमी केले जाऊ शकेल. हरित तंत्रज्ञान, ईव्ही, हायड्रोजन इंधन आणि जैवइंधनाच्या विकासावर लक्ष केंद्रित केले जात आहे, असे त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन आणि ग्रीन हायड्रोजन मिशन सारखे उपक्रम हे हाच दृष्टिकोन लक्षात घेऊन सुरू करण्यात आले आहेत हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
गेल्या काही वर्षांत भारतात इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या जलद वाढीवर भर देत मोदींनी सांगितले की, गेल्या दशकात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत 640 पट वाढ झाली आहे. दहा वर्षांपूर्वी दरवर्षी फक्त 2600 इलेक्ट्रिक वाहने विकली जात होती, तर 2024 मध्ये 16.80 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहने विकली गेली अशी माहिती त्यांनी दिली. आज एकाच दिवसात विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांची संख्या दशकापूर्वीच्या संपूर्ण वर्षात विकल्या जाणाऱ्या संख्येच्या दुप्पट आहे. या दशकाच्या अखेरीस भारतात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या आठ पटीने वाढू शकते, असा अंदाज पंतप्रधानांनी व्यक्त करतानाच या क्षेत्रात अफाट क्षमता दिसून येते, असे सांगितले.
देशात इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या विस्तारासाठी सरकारकडून सातत्याने घेतले जाणारे धोरणात्मक निर्णय आणि पाठिंब्यावर भर देत, पंतप्रधानांनी सांगितले की पाच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या FAME-2 योजनेने ₹8,000 कोटींहून अधिक किमतीचे अनुदान देऊ केले आहे. ही रक्कम इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला अनुदान देण्यासाठी आणि चार्जिंग तसेच पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी वापरली गेली गेली, ज्यामुळे 5000 हून अधिक इलेक्ट्रिक बसेससह 16 लाखांहून अधिक ईव्हींना आधार मिळाला यावर भर दिला की.
केंद्र सरकारने पुरवलेल्या 1200 हून अधिक इलेक्ट्रिक बसेस दिल्लीत कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी तिसऱ्या कार्यकाळात पीएम ई-ड्राइव्ह योजनेची सुरुवात अधोरेखित केली, ज्यामुळे दुचाकी, तीन चाकी वाहने, ई-अॅम्ब्युलन्स आणि ई-ट्रकसह सुमारे २८ लाख ईव्ही खरेदीला पाठिंबा मिळणार आहे.
अंदाजे 14,000 इलेक्ट्रिक बसेस देखील खरेदी केल्या जातील आणि देशभरात विविध वाहनांसाठी 70,000हून अधिक फास्ट चार्जर बसवले जातील यावर त्यांनी भर दिला. देशभरातील लहान शहरांमध्ये सुमारे 38,000 ई-बसच्या परिचालनाला पाठिंबा देण्यासाठी तिसऱ्या कार्यकाळात पीएम ई-बस सेवा सुरू करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. ईव्ही उत्पादनासाठी सरकारकडून सातत्याने मिळत असलेल्या पाठिंब्याला अधोरेखित करताना, मोदी यांनी सांगितले की, भारतात ईव्ही कार उत्पादनात रस असलेल्या जागतिक गुंतवणूकदारांसाठी मंच तयार करण्यात आले आहेत. या प्रयत्नांमुळे दर्जेदार ईव्ही उत्पादन परिसंस्थेचा विस्तार होण्यास आणि भारतात मूल्य साखळी तयार करण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सौर ऊर्जा आणि पर्यायी इंधनांना सतत प्रोत्साहन देण्याच्या गरजेवर भर देताना पंतप्रधानांनी सांगितले की, भारताच्या जी-२० अध्यक्षपदाच्या काळात, हरित भविष्यावर जोरदार भर देण्यात आला होता. भारतात ईव्ही आणि सौर ऊर्जा या दोन्हीवर महत्त्वपूर्ण काम केले जात आहे. पंतप्रधान सूर्यघर - मोफत वीज योजना हे छतावरील सौरऊर्जेसाठी एक प्रमुख अभियान आहे. पंतप्रधानांनी या क्षेत्रातील बॅटरी आणि स्टोरेज सिस्टमच्या वाढत्या मागणीवर प्रकाश टाकला.
प्रगत रासायनिक सेल बॅटरी पुरवठ्याला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने 18,000 कोटी रुपयांची उत्पादन लिंक्ड प्रोत्साहन (पीएलआय,PLI) योजना सुरू केली आहे, असे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण गुंतवणुकीसाठी हीच सुयोग्य वेळ असल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले.त्यांनी देशातील तरुणांना ऊर्जा साठवण क्षेत्रात स्टार्टअप सुरू करण्याचे आवाहन केले. भारतात उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून बॅटरी आणि स्टोरेज सिस्टीम निर्माण करू शकतील अशा नवकल्पनांवर काम करण्याची गरज आहे,यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यांनी नमूद केले, की या क्षेत्रात आधीपासूनच लक्षणीय काम केले जात आहे, परंतु ते जलदगतीने मिशन मोडमध्ये पुढे जाणे आवश्यक आहे.
केंद्र सरकारची सुस्पष्ट उद्दिष्टे आणि वचनबद्धतेवर भर देत, सरकार नवीन धोरणे तयार करत आहे किंवा अन्य सुधारणांची अंमलबजावणी करत आहे,असे सांगत यासाठी सरकारचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत,असे मोदीं यांनी यावेळी अधोरेखित केले.उत्पादकांना जुनी वाहने मोडीत काढण्याच्या धोरणाचा लाभ घेण्याचे आवाहन करून, त्यांनी सुचवले, की अधिकाधिक लोकांना त्यांची जुनी वाहने मोडीत काढण्यासाठी, प्रोत्साहन देत कंपन्यांनी त्यांच्या स्वत: च्या प्रोत्साहन योजना आणायला पाहिजेत. हे कार्य वैशिष्ट्यपूर्ण असून देशाच्या पर्यावरणासाठी ती महत्त्वपूर्ण सेवा ठरेल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
वाहन उद्योग नावीन्यपूर्ण पध्दतींचे अनुसरण करतो आणि तंत्रज्ञानावर चालतो यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. पूर्वेकडील देश, आशिया आणि भारत यांच्या हातात उज्वल भविष्यकाळ आहे असे त्यांनी अधोरेखित केले.गतिशीलतेकडे जाऊ पाहणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदारासाठी भारत हे एक उत्कृष्ट गंतव्यस्थान आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला.सर्वांनी "मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड"हा मंत्र जपत पुढे जायला हवे,सरकारचा तुम्हाला सर्वतोपरी पाठिंबा आहे असे सर्वांना आश्वासन देत मोदी यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, नितीन गडकरी, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री, मनोहर लाल, केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री, एच डी कुमारस्वामी, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री, पीयूष गोयल, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पार्श्वभूमी
नवी दिल्लीतील भारत मंडपम, यशोभूमी, तसेच इंडिया एक्स्पो सेंटर आणि मार्ट, ग्रेटर नोएडा,अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 हे प्रदर्शन दिनांक 17-22 जानेवारी, 2025 दरम्यान आयोजित केले जात आहे: या प्रदर्शनात 9 पेक्षा जास्त समकालावधीतील प्रदर्शने, 20 पेक्षा अधिक परीषदा आणि आणि चर्चासत्रे आयोजित केली आहेत. याव्यतिरिक्त, या प्रदर्शनात उद्योग आणि प्रादेशिक स्तरांमधील सहकार्य सक्षम करण्यासाठी वाहने आणि वाहतूक क्षेत्रातील धोरणे आणि पुढाकार प्रदर्शित करणारी राज्यस्तरीय सत्रे देखील आयोजित करण्यात आली आहेत.
भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 चा उद्देश संपूर्ण मोबिलिटी मूल्य साखळी एका छत्राखाली एकत्र आणणे हा आहे. या वर्षीच्या प्रदर्शनामध्ये जागतिक महत्त्वावर विशेष भर देण्यात आला असून प्रदर्शक आणि अभ्यागत म्हणून जगभरातून प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. हा एक उद्योगांचे -नेतृत्व असलेला आणि सरकार-समर्थित असा उपक्रम आहे आणि विविध उद्योग आणि संस्था तसेच भागीदार संस्थांच्या संयुक्त सहकार्यासह भारतीय अभियांत्रिकी निर्यात प्रोत्साहन परिषदेद्वारे( इंजिनिअरींग एक्सपोर्ट काउन्सिल ऑफ इंडिया) हा उपक्रम समन्वयित केला जात आहे.
***
JPS/S.Patil/S.Kane/B.Sontakke/H.Kulkarni/S.Patgonkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2093916)
Visitor Counter : 23
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam