सांस्कृतिक मंत्रालय
कलाग्राम : महाकुंभ 2025 चे सांस्कृतिक रत्न
Posted On:
15 JAN 2025 10:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 15 जानेवारी 2025
कल्पना करा, की गंगा, यमुना आणि मिथक ठरलेली सरस्वती या भारतातील सर्वात पवित्र नद्यांच्या संगमावर तुम्ही उभे आहात. लाखो यात्रेकरूंचा सुरेल मंत्रघोष, मंदिरातील घंटांचा निनाद आणि या शाश्वत नद्यांच्या लयबद्ध प्रवाहाने वातावरण भारावून गेले आहे. हे महाकुंभ 2025 आहे, श्रद्धा आणि अध्यात्माचा जगातील सर्वात मोठा मेळावा, जो विश्वास आणि अध्यात्माचा जगातील सर्वात मोठा मेळावा, जिथे भक्ती आणि उत्सवाचा भव्य सोहळा साजरा होतो.
प्रयागराजमधील या भक्तिमय वातावरणात, नागवासुकी परिसरात वसले आहे, एक सांस्कृतिक रत्न, कलाग्राम. कलाग्राम हे केवळ प्रदर्शन स्थळ नसून, ते भारताचा जिवंत वारसा आहे. जिथे भारताच्या कालातीत परंपरा आजच्या सृजनशील कथानकाशी मेळ साधतात, जे विविधता आणि सखोलता यासाठी ओळखल्या जाणाऱ्या देशाच्या अंतःकरणाचा उद्बोधक प्रवास घडवते.
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या संकल्पनेतून साकारलेले कलाग्राम, हे थ्रीसी, म्हणजेच क्राफ्ट (हस्तकला), क्विझीन (पाककृती) आणि कल्चर (संस्कृती) याचे दर्शन घडवते. हे ऊर्जामय स्थळ प्राचीन कला प्रकार, उत्कृष्ट प्रादेशिक पाककृती आणि मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण याला एकत्र आणून, एक अद्वितीय अनुभव देते, जे भारताच्या सांस्कृतिक वारशाच्या मूर्त आणि अमूर्त अशा दोन्ही पैलूंचा उत्सव साजरा करते.
केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते 12 जानेवारी 2025 रोजी उद्घाटन करण्यात आलेले कलाग्राम, हे भारतीय परंपरांचे मर्म उलगडणारे प्रवेशद्वार आहे. हे केवळ एक कार्यक्रम स्थळ नसून, देशभरातील कारागीर, कलाकार आणि पाककलेत निपुण कलाकारांच्या कथा एकत्र विणणारा हा एक संवादात्मक आणि परिवर्तनशील अनुभव आहे.
भव्य प्रवेशद्वार: कथांचे उमग स्थान
कलाग्रामचा तुमचा प्रवास 35 फूट रुंद, 54 फूट उंच कलाकृती असलेल्या विस्मयकारक प्रवेशद्वारापासून सुरू होतो. स्थापत्य कलेचा हा चमत्कार भारताच्या पवित्र वारशाचे दृश्य वर्णन आहे, ज्यात 12 ज्योतिर्लिंगांच्या कथा आणि भगवान शंकराच्या हलाहल प्राशन करण्याच्या पुराणातील कथेचे चित्रण आहे. दैवी ऊर्जेने उजळून निघालेल्या दर्शनी भागातील गुंतागुंतीची कारागिरी पुढील जादुई प्रवासाची झलक दाखवते.
संस्कृतीच्या अंतरंगात प्रवेश:
आत प्रवेश केल्यावर कलाग्राम भारताच्या विविधतेचे मंत्रमुग्ध करणारे चित्र उलगडते. काटेकोरपणे डिझाइन केलेली संस्कृती अंगण, देशाच्या विविध भागांचे प्रतिनिधित्व करतात, जे कोलकात्याचे दक्षिणेश्वर काली मंदिर आणि पुष्करचे ब्रम्हा मंदिर, या संकल्पनेवर आधारित आहे. हे दालन प्रादेशिक कारागिरीचा खजिना असून, या ठिकाणी बंगालमधील पट्टचित्र चित्रे आणि आसामच्या बांबू शिल्पांपासून ते तामिळनाडूची तंजोर चित्रे आणि मध्य प्रदेशच्या आदिवासी कलेपर्यंत सर्व काही प्रदर्शित करण्यात आले आहे.
प्राचीन तंत्रांना जिवंत करणाऱ्या 230 कारागीरांचे कौशल्य आपण येथे पाहू शकता, आणि कदाचित इतिहासाचा एक तुकडा त्यांच्या उत्कृष्ट निर्मितीच्या रूपात घरी घेऊन जाऊ शकता.
कला आणि आत्म्याचा संगम: मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण
कलाग्राममधील वातावरण दररोज विविध मंचांवर सादर होणाऱ्या सुमारे 15,000 सांस्कृतिक कलाकारांच्या तालावर डोलते. संगीत नाटक अकादमी आणि विभागीय सांस्कृतिक केंद्रांसारख्या नामांकित संस्थांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात भावपूर्ण शास्त्रीय संगीतापासून ते सळसळत्या लोकनृत्यांचा समावेश आहे. कथ्थक नृत्यांगनांचे चपळ पदलालित्य असो, की भांगडा पथकाची ऊर्जा असो, प्रत्येक सादरीकरण परंपरेने ओतप्रोत भरलेली कथा सांगते.
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची नाट्यनिर्मिती आणि ख्यातनाम कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याचे वचन देतात. अशा कला समृद्ध कार्यक्रमांमुळे कलाग्रामची प्रत्येक भेट प्रेक्षकांच्या झोळीत काहीतरी नवीन नक्कीच टाकते.
पौराणिक कथांचा रसास्वाद घ्या: इमर्सिव्ह झोन
कलाग्रामच्या ठळक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे अनुभूती मंडपम्, जो एक अनन्यसाधारण अनुभव आहे. अत्याधुनिक 360- अंशाच्या कोनात व्हिज्युअल आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे, प्रेक्षकांसमोर गंगा अवतरणाची वैश्विक कथा मांडली जाते—स्वर्गीय गंगेचे पृथ्वीवर अवतरण. स्वर्गातून पृथ्वीवर अवतरणाऱ्या गंगा नदीचा प्रपात भगवान शंकराने आपल्या जटांमध्ये धारण करण्याचा अत्यंत पवित्र क्षण वास्तविक आवाज आणि देखाव्याने जिवंत झाला आहे. ही केवळ एक कथा नाही - हा एक अनुभव आहे जो तुम्ही परतून आल्यानंतरही दिर्घकाळ तुमच्या स्मरणात राहतो.
इतिहास सजीव झाला : प्रदर्शन क्षेत्र
अविरल शाश्वत कुंभ क्षेत्र, महाकुंभ मेळ्याच्या गहन वारशाचे अभ्यासपूर्ण दर्शन घडवते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि राष्ट्रीय अभिलेखागार यांसारख्या संस्थांच्या सहकार्याने, हे क्षेत्र युगानुयुगे सुरू असलेल्या कुंभमेळ्याची भव्यता प्रकट करणाऱ्या कलाकृती, डिजिटल प्रदर्शने आणि ऐतिहासिक अंतर्दृष्टी सादर करते. हे एक असे स्थान आहे जिथे इतिहास आणि संस्कृतीचा संगम होतो. आणि हा संगम युनेस्कोची मान्यता असलेल्या अगोचर सांस्कृतिक वारशाची सखोल माहिती देतो.
एक स्वर्गीय रात्र आणि सात्विक आनंद
कलाग्राम केवळ संस्कृतीचे दर्शन नाही तर ते संबंध दर्शवणारे देखील आहे. विशेष खगोलीय रात्री, अभ्यागत दुर्बिणीद्वारे तारकापुंजांनी भरलेल्या आकाशाकडे पाहू शकतात. आणि, अध्यात्मिकतेची अनुभूती देणाऱ्या वातावरणात ब्रम्हांडाबरोबर पुन्हा जोडले जाऊ शकतात.
आणि खवय्यांसाठी, येथे ‘सात्विक फ्लेवर्स ऑफ इंडिया झोन’ म्हणजेच भारतातील सात्विक व्यंजने खाऊ घालून जिव्हा तृप्त करणारे क्षेत्र देखील आहे. हे क्षेत्र प्रयागराजच्या स्थानिक स्वादिष्ट पदार्थांपासून ते संपूर्ण भारतातील विशेष पदार्थांपर्यंतची आणि या पवित्र पर्वासाठी शुद्धता आणि विशेष काळजी घेऊन तयार केलेली 28 प्रकारची सात्विक व्यंजने उपलब्ध करून देत आहे.
सामान्यतेच्या पलीकडे : व्यस्त रहा आणि नव्याचा शोध घ्या
कलाग्राम उत्साहवर्धक उपक्रमांद्वारे लोकांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित करते. ललित कला अकादमीच्या फोटोग्राफी स्पर्धेत भाग घ्या किंवा आयजीएनसीए आणि क्षेत्रीय सांस्कृतीक केंद्राद्वारे निर्मित माहितीपटांमध्ये हरवून जा. कलाग्रामचा प्रत्येक कोपरा काही तरी नवीन शिकण्याच्या, तयार करण्याच्या आणि प्रेरित होण्याच्या संधींनी भरलेला आहे.
जगाला आवाहन:
कलाग्राम हा संस्कृतीच्या उत्सवापेक्षाही अधिक असून ते एक खास आमंत्रण आहे. भारताच्या अगदी हृदय स्थान जाणून घेण्याचे आमंत्रण आहे. येथील प्रत्येक कलाकुसर, प्रत्येक कारागिरी आणि प्रत्येक व्यंजन भारताबाबत एक खास गोष्ट सांगत आहे. हे असे ठिकाण आहे जिथे जागतिक पर्यटक भारताच्या वारशाची गहनता अनुभवू शकतात तर स्थानिक लोक आपल्या मुळांशी पुन्हा जोडले जाऊ शकतात. तुम्ही इतिहासप्रेमी असाल, कलाप्रेमी असाल, खाद्यपदार्थाचे शौकीन असाल किंवा प्रेरणेच्या शोधात असणारे शोधक असाल, कलाग्राम तुम्हाला एका अविस्मरणीय प्रवासाचे वचन देते. आपल्या चैतन्यपूर्ण प्रदर्शनांच्या आणि भावपूर्ण कामगिरीच्या पलीकडे जाऊन कलाग्राम भारताच्या चिरस्थायी भावनेशी एक सखोल बंध स्थापित करण्याची संधी प्रदान करते - असा बंध जो आपल्या लोकांद्वारे, त्यांच्या कलाकुसरीद्वारे आणि त्यांच्या कथांद्वारे वृद्धिंगत होतो.
References
Department of Information & Public Relations (DPIR), Government of Uttar Pradesh
https://x.com/PIB_India/status/1878425862938529986/photo/1
https://x.com/MinOfCultureGoI/status/1878808822644670948/photo/1
https://x.com/PIBCulture/status/1878445520504373466/photo/2
https://x.com/nczccofficial/status/1878815428019155008/photo/1
https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=2092233
Click here to see in PDF:
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
S.Patil/S.Mukhedkar/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2093253)
Visitor Counter : 61