वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
शासनाची 10 मूलभूत तत्त्वे या दशकातील अभूतपूर्व परिवर्तनाचा आधारस्तंभ आहेत: चेन्नई येथे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन
ही तत्त्वे भारताच्या उल्लेखनीय वाढीचा कणा आहेत; त्यांच्यामुळे 6 प्रमुख क्षेत्रांमध्ये भारताच्या प्रगतीला चालना मिळाली आहे
Posted On:
14 JAN 2025 9:53PM by PIB Mumbai
चेन्नई , 14 जानेवारी 2025
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धडाडीच्या नेतृत्वाखाली, गेल्या 10 वर्षांमध्ये, शासनाची 10 मूलभूत तत्त्वे या दशकातील अभूतपूर्व परिवर्तनाचा आधारस्तंभ राहिली आहेत. मूलभूत तत्त्वांमध्ये निर्णायक नेतृत्व, सखोल विश्लेषण, परिणामाभिमुख कृती, कायद्याचे राज्य आणि पारदर्शकता, कालबद्ध अंमलबजावणी, समस्या सोडवण्याला प्राधान्य, जबाबदारी आणि देखरेख, तंत्रज्ञानाचा अवलंब, अभिनव वित्तपुरवठा आणि सर्व हितधारकांसह भागीदारी यांचा समावेश आहे. आज चेन्नईत ठग्लक वार्षिक मेळाव्यात भाषण करताना गोयल यांनी हे मत व्यक्त केले.
'भारताचा विकास आणि त्याच्या समोरील आव्हाने' या विषयावरील बीजभाषणात पीयूष गोयल म्हणाले, "देशात जो उल्लेखनीय विकास होत आहे तो स्पष्ट तत्त्वांमध्ये रुजलेल्या रचनात्मक आणि परिणामाभिमूख दृष्टिकोनाचा परिणाम असून त्याला लोकशाही (डेमोक्रसी) , लोकसंख्याशास्त्रीय लाभांश (डेमोग्राफिक डिव्हिडंड ) , विविधता (डायव्हर्सिटी ), मागणी (डिमांड ) आणि अवलंबित्व (डिपेन्डबिलिटी ) या 5D मुळे चालना मिळाली आहे . त्यांच्या मते 10 मूलभूत तत्त्वांमुळे जागतिक नेतृत्व; अर्थव्यवस्था, उत्पादन आणि गुंतवणूक; नवोन्मेष आणि उद्योजकता; पायाभूत सुविधांचा विकास; जागतिक सॉफ्ट पॉवर आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास या 6 प्रमुख क्षेत्रांमध्ये भारताचा उदय झाला आहे.
“जागतिक नेतृत्व म्हणून भारताचा उदय हा जागतिक स्तरावर त्याच्या वाढत्या प्रभावाचा,मूल्यांचा आणि मुत्सद्देगिरीचा दाखला आहे."
अन्न,वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य सेवा, डिजिटल कनेक्टिव्हिटी,घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा ,स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी आणि ऊर्जा कार्यक्षम प्रकाश व्यवस्था यावर केंद्र सरकार भर देत असल्यामुळे शाश्वत विकास उद्दिष्टांकडे जलद संक्रमण सुनिश्चित झाले याचा पुनरुच्चार त्यांनी केला. सरकारच्या विविध कामगिरीचा उल्लेख करताना पीयूष गोयल यांनी यापुढील आव्हानांची देखील दखल घेतली.“सर्वसमावेशक विकासाकडे वाटचाल करत असताना, आपण आपल्या एकता, सुरक्षितता आणि आकांक्षांची चाचणी घेणाऱ्या जगातील उदयोन्मुख वास्तवांचा देखील सामना केला पाहिजे.
भारतीय राज्यघटनेच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त जाहीर केलेल्या पंतप्रधानांच्या 11 संकल्पांची आठवण करून देत पीयूष गोयल यांनी भाषणाचा समारोप केला. संविधानाच्या भावनेने प्रेरित हे संकल्प विकसित भारताची पायाभरणी करतात असे ते म्हणाले.
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2092933)
Visitor Counter : 15