वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी राष्ट्रीय हळद मंडळाचे केले उद्घाटन
निजामाबाद येथे राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना
'हळद' उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे हे मंडळ विशेष लक्ष देईल,चांगल्या वाणांचा विकास करेल आणि निर्यातीवर भर देईल : गोयल
Posted On:
14 JAN 2025 3:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 14 जानेवारी 2025
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय हळद मंडळाचे उद्घाटन केले. त्यांनी मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून पल्ले गंगा रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली. मंडळाचे मुख्यालय निजामाबाद येथे स्थापन करण्यात आले आहे.
हळदीला 'गोल्डन स्पाइस' असेही म्हटले जाते, असे नमूद करून ते म्हणाले की, नव्याने स्थापन झालेले मंडळ महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, मेघालय यासह 20 राज्यांमधील हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे विशेष लक्ष देईल. ते म्हणाले की, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये हळद उत्पादन वाढवण्याची प्रचंड क्षमता आहे आणि हळद मंडळाच्या स्थापनेमुळे देशातील हळद उत्पादकांच्या उत्पन्नात वाढ होईल.
गोयल यांनी नमूद केले की नवीन मंडळ नवीन हळद उत्पादनांच्या संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देईल आणि परदेशात विपणनासाठी हळदीशी संबंधित उत्पादनांच्या मूल्यवर्धनाकडे लक्ष देईल. हळदीचे महत्वपूर्ण आणि वैद्यकीय गुणधर्म, त्याचे उत्पादन वाढवण्याच्या पद्धती आणि नवीन बाजारपेठांमध्ये व्यापाराला चालना देण्यासाठी लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळीला चालना देण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याबाबत मंडळ विचार करेल असे ते म्हणाले. गोयल यांनी असेही अधोरेखित केले की मंडळ हळदीचे उत्पादन आणि निर्यातीची गुणवत्ता आणि सुरक्षा मानके देखील सुनिश्चित करेल.
हळदीच्या जागतिक उत्पादनात भारताचा वाटा 70% पेक्षा जास्त असल्याची माहिती त्यांनी दिली. भारतात हळदीच्या 30 वाणांचे उत्पादन घेतले जाते असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय गृहराज्यमंत्री बंदी संजय कुमार हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते.
मंडळाच्या अध्यक्षांव्यतिरिक्त, आयुष मंत्रालय, औषधनिर्मिती विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग आणि वाणिज्य विभागाचे प्रतिनिधी देखील नामनिर्देशित करण्यात आले. महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन प्रमुख हळद उत्पादक राज्यांचे तसेच लकाडोंग हळदीसाठी प्रसिद्ध असलेल्या मेघालय राज्याचे प्रतिनिधी देखील मंडळाचा भाग असतील.
राष्ट्रीय हळद मंडळ नेतृत्व प्रदान करेल, प्रयत्नांना गती देईल आणि हळद क्षेत्राशी संबंधित बाबींमध्ये इतर सरकारी विभाग/संस्थांशी समन्वय साधेल आणि देशातील हळद क्षेत्राची वाढ आणि विकास सुलभ करेल.
भारत हा हळदीचा जगातील सर्वात मोठा उत्पादक, ग्राहक आणि निर्यातदार आहे. 2023-24 मध्ये, 226.5 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स मूल्याची 1.62 लाख टन हळद आणि हळदीच्या उत्पादनांची निर्यात झाली.
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2092777)
Visitor Counter : 62