युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
अस्मिता खेलो इंडिया महिला योगासन लीग 2024-25 मध्ये 7000 हून अधिक महिलांचा सहभाग
Posted On:
10 JAN 2025 4:02PM by PIB Mumbai
नांगलोई नजफगढरोड येथील बकरवाला येथील आनंद धाम आश्रम येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय अस्मिता खेलो इंडिया महिला योगासन लीग 2024-25 चा नुकताच समारोप झाला. 5 ते 7 जानेवारी दरम्यान झालेल्या लीगच्या अंतिम टप्प्यात 270 हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश या राज्यांतल्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली.
भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सचिव सुजाता चतुर्वेदी यांनी क्रीडापटूंचे अभिनंदन केले आणि भारतातील योगासनाच्या वाढत्या महत्त्वावर त्यांनी भर दिला तसेच 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने देखील याचे महत्व अधोरेखित केले.
राष्ट्रीय लीगमधील सहभागी झालेल्या खेळाडूंची निवड गेल्या वर्षी संपूर्ण भारतभरात झालेल्या विभागस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेतून करण्यात आली. या स्पर्धांमध्ये 7000 हून अधिक महिला खेळाडूंनी भाग घेतला. या लीगमध्ये पारंपारिक योगासन, कलात्मक योगासन (एकल), कलात्मक योगासन (जोडी), लयबद्ध योगासन (जोडी) आणि कलात्मक योगासन (समूह) असे पाच विभाग होते. भारताच्या चार विभागातील 18 वर्षांखालील आणि 18 वर्षांवरील वयोगटातील प्रत्येकी अव्वल आठ खेळाडूंनी पाच प्रकारांमध्ये भाग घेतला. गेल्या वर्षी बिहार (पूर्व विभाग), राजस्थान (पश्चिम विभाग), तामिळनाडू (दक्षिण विभाग) आणि उत्तर प्रदेश (उत्तर विभाग) या चार झोनमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
https://www.instagram.com/reel/DEmGdKKTUJ9/?igsh=MXMxaWVxYXRjaTBidg==
योगासन भारत द्वारे आयोजित, या उपक्रमात भाग घेतलेल्या 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील खेळाडूंमध्ये निकोप स्पर्धा पाहायला मिळाली. भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने विजेत्या खेळाडूंना सुमारे 25 लाख रुपये रक्कम बक्षीस म्हणून दिली.
महिलांना आपले कुटुंब तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी योगासनांचे महत्व जाणून सक्षम करण्याच्या उद्देशाने केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आयोजित केलेली ही अस्मिता योगासन स्पर्धा महत्वपूर्ण भूमिका बजावते. वर्ष 2024 मध्ये एकूण 163 अस्मिता महिला लीग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये 12 क्रीडा शाखांमधील 17,000 हून अधिक महिलांनी सहभाग घेतला.
पाच श्रेणीतील विजेते पुढीलप्रमाणे आहेत.
- पारंपारिक योगासन: अनुष्का चॅटर्जी (पश्चिम बंगाल), सपना पाल (मध्य प्रदेश)
- कलात्मक योगासन एकल: सीमा निओपने (दिल्ली), सर्वश्री मंडल (पश्चिम बंगाल)
- कलात्मक योगासन जोडी: निशा गोडबोले आणि अविका मिश्रा (मध्य प्रदेश), कल्याणी चुटे आणि छकुली सेलोकर (महाराष्ट्र)
- तालबद्ध योगासन जोडी: काव्या सैनी आणि यात्री यशवी (उत्तराखंड), खुशी ठाकूर आणि गीता अंजली (दिल्ली).
- कलात्मक योगासन गट: मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील संघ.
अस्मिता महिला स्पर्धा :
महिलांचा खेळातील सहभाग वाढवण्यासाठी आणि देशभरातील विविध वयोगटातील महिला खेळाडूंना स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघ संयुक्तपणे विविध वयोगटातील खेळाडूंसाठी खेलो इंडिया अस्मिता महिला लीग स्पर्धांचे आयोजन करते.
***
N.Chitale/B.Sontakke/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2091911)
Visitor Counter : 27