पंतप्रधान कार्यालय
जिनोम इंडिया प्रकल्पाच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेले विचार
देशाच्या जैवतंत्रज्ञान परिदृश्यात जिनोम इंडिया प्रकल्पचा प्रारंभ एक महत्त्वाचा क्षण आहे. या प्रकल्पाशी संबंधितांना माझ्याकडून शुभेच्छाः पंतप्रधान
21 व्या शतकात, जैव तंत्रज्ञान आणि बायोमासचे एकत्रीकरण जैव अर्थव्यवस्था म्हणून विकसित भारताच्या पायाचा एक महत्त्वाचा भाग आहे: पंतप्रधान
बायो अर्थव्यवस्था शाश्वत विकास आणि नवोन्मेषाला गतिमान करतेः पंतप्रधान
जगाचे मुख्य औषधनिर्मिती केंद्र म्हणून भारताने जी ओळख निर्माण केली आहे तिला आज देश एक नवा आयाम देत आहेः पंतप्रधान
संपूर्ण जग आज भारताकडे जागतिक समस्यांच्या निराकरणाच्या अपेक्षेने पाहात आहे, जी आपल्या भावी पिढ्यांसाठी एक जबाबदारी आणि संधी हे दोन्ही आहे.
ज्या प्रकारे आमच्या लोकाभिमुख शासनाने, आमच्या डिजिटल पायाभूत सुविधांनी जगाला एक नवा आदर्श दिला आहे, तशाच प्रकारे जिनोम इंडिया प्रकल्प देखील जनुकीय संशोधनाच्या क्षेत्रात भारताची प्रतिमा अधिक बळकट करेलः पंतप्रधान
Posted On:
09 JAN 2025 7:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2025
जिनोम इंडिया प्रकल्पाचा शुभारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे आज आपले विचार व्यक्त केले. भारताने संशोधन क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे, असे पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. जिनोम इंडिया प्रकल्पाला 5 वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली होती आणि आपल्या शास्त्रज्ञांनी प्रामाणिकपणे काम केले आणि कोविड महामारीने उभ्या केलेल्या आव्हानानंतरही हा प्रकल्प वेळेत पूर्ण केला, असे ते म्हणाले.
या संशोधनात आयआयएससी, आयआयटी, सीएसआयआर आणि डीबीटी-ब्रिक सारख्या २० हून अधिक प्रतिष्ठित संशोधन संस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे मोदी यांनी नमूद केले. त्यांनी पुढे सांगितले की, 10,000 भारतीयांच्या जीनोम सिक्वेन्सचा समावेश असलेला डेटा आता भारतीय जैविक डेटा सेंटरमध्ये उपलब्ध आहे. हा प्रकल्प जैवतंत्रज्ञान संशोधनाच्या क्षेत्रात एक मैलाचा दगड ठरेल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आणि या प्रकल्पात सहभागी असलेल्या सर्व हितधारकांचे अभिनंदन केले.
“जिनोम इंडिया प्रकल्प हा जैवतंत्रज्ञान क्रांतीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे", असे गौरवोद्गार मोदी यांनी काढले. त्यांनी असे नमूद केले की या प्रकल्पाने विविध लोकसंख्येमधील 10,000 व्यक्तींच्या जनुकांचे सिक्वेन्सिंग करून यशस्वीरित्या विविधतापूर्ण जनुकीय संसाधने निर्माण केली. हा डेटा आता शास्त्रज्ञ आणि संशोधकांना उपलब्ध होईल, ज्यामुळे विद्वानांना भारताचे आनुवंशिक परिदृश्य समजून घेण्यास मदत होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. देशाची धोरणे तयार करण्यासाठी आणि नियोजनासाठी ही माहिती अतिशय उपयुक्त ठरेल, यावर त्यांनी भर दिला. भारताचे विशाल स्वरुप आणि विविधता, केवळ अन्न, भाषा आणि भूगोलच नव्हे तर त्याच्या नागरिकांच्या आनुवंशिक रचनेतही विविधता असल्याचे अधोरेखित करत,पंतप्रधानांनी तज्ञ आणि शास्त्रज्ञांना संबोधित करताना नमूद केले की रोगांचे स्वरूप वारंवार बदलत असल्याने प्रभावी उपचार निश्चित करण्यासाठी लोकसंख्येची अनुवांशिक ओळख समजून घेणे आवश्यक आहे.
आदिवासी समाजात आढळून येत असलेल्या सिकलसेल अॅनिमियाच्या आजारामुळे निर्माण झालेली आव्हाने आणि त्यांवर मात करण्यासाठी राबवल्या जात असलेल्या राष्ट्रीय अभियानाविषीची माहिती त्यांनी दिली. या समस्येचे वेगवेगळ्या प्रदेशांमधले स्वरूप भिन्न असू शकते आणि त्या अनुषंगाने भारतीय लोकसंख्येची विशिष्ट जीनोमिक रचना समजून घेण्यासाठी एकंदर अनुवांशिक अभ्यास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यातून हाती आलेल्या निष्कर्षांमुळे विशिष्ट गटांसाठी विशिष्ट उपाय आणि प्रभावी औषधे विकसित करण्यात मदत होईल, असे पंतप्रधानांनी यांनी नमूद केले. या परिस्थितीची व्याप्ती खूपच व्यापक असून सिकलसेल अॅनिमिया हे केवळ एक उदाहरण आहे, ही बाब त्यांनी ठळकपणे नमूद केली. एका पिढीकडून दुसर्या पिढीला जाणाऱ्या अनेक जनुकीय आजारांविषयी भारतात जागरुकतेचा अभाव असून जीनोम इंडिया प्रकल्पामुळे भारतात अशा सर्व आजारांवर प्रभावी उपचार विकसित होण्यात मदत होईल, असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
एकविसाव्या शतकात जैवतंत्रज्ञान आणि बायोमास यांचा मिलाफ हे विकसित भारताच्या जैव अर्थव्यवस्था पाया म्हणून महत्वाचे घटक असणार आहेत असे पंतप्रधान म्हणाले. नैसर्गिक संसाधनांचा पुरेपूर वापर, जैव-आधारित उत्पादने आणि सेवांना प्रोत्साहन देणे आणि या क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे हे जैव अर्थव्यवस्थेचे ध्येय आहे, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, जैव अर्थव्यवस्थेमुळे शाश्वत विकास आणि नाविन्यपूर्णतेला गती मिळते ही बाबही पंतप्रधानांनी अधोरेखित केली. भारताची जैव अर्थव्यवस्था गेल्या दशकभरात झपाट्याने वाढली आहे, 2014 मध्ये भारताच्या जैव अर्थव्यवस्थेचा आकार 10 अब्ज डॉलर होता. आता त्यात वाढ होऊन तो आज 150 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे, हे पाहून आपल्याला समाधान वाटत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. भारत आपल्या जैव अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्नशील असून, अलिकडेच भारताने बायो ई 3 धोरणाची अंमलबजावणी सुरू केली असल्याची बाब पंतप्रधानांनी ठळकपणे नमूद केली. या धोरणामागच्या दृष्टीकोनाबद्दलही त्यांनी उपस्थितांना सांगितले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीप्रमाणेच जैव तंत्रज्ञानाच्या जागतिक अवकाशात या क्षेत्राचे नेतृत्व करणारा देश म्हणून भारताची जडणघडण करण्यात हे धोरण मदतीचे ठरेल असे पंतप्रधान म्हणाले. या प्रयत्नात शास्त्रज्ञ बजावत असलेल्या महत्त्वाच्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केले आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या.
औषधोत्पादनांचे एक प्रमुख केंद्र म्हणून भारताच्या वाढती भूमिकाही त्यांनी ठळकपणे अधोरेखित केली. गेल्या दशकात भारताने सार्वजनिक आरोग्य सेवेत क्रांतिकारी पावले उचलली आहेत, भारताने आपल्या लाखो नागरिकांना मोफत उपचार दिले आहेत, जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून 80% सवलतीत औषधे पुरवली आहेत आणि आधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधांची उभारणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
कोविड-19 महामारीच्या काळात भारताच्या औषधनिर्मिती परिसंस्थेने आपली ताकद सिद्ध केली यावर पंतप्रधानांनी भर दिला. भारतात औषध निर्मितीसाठी मजबूत पुरवठा आणि मूल्य साखळी स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. जीनोम इंडिया प्रकल्प या प्रयत्नांना आणखी गती देईल आणि ऊर्जा देईल असेही ते म्हणाले.
“जागतिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी जग भारताकडे पाहत असून भविष्यातील पिढ्यांची जबाबदारी आणि संधी या दोन्ही गोष्टी भारताकडे सोपवत आहे”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. गेल्या दशकात शिक्षणाच्या सर्व स्तरांवर संशोधन आणि नवोन्मेष यावर भर देऊन भारत एक विशाल संशोधन परिसंस्था निर्माण करत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
“10,000 हून अधिक अटल टिंकरिंग लॅब विद्यार्थ्यांना दररोज नवीन प्रयोग करण्यास सक्षम बनवत आहेत”, असे पंतप्रधान म्हणाले. तरुण नवोन्मेषकांना पाठिंबा देण्यासाठी देशभरात शेकडो अटल इनक्युबेशन केंद्रे स्थापन करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. पीएचडी अभ्यासादरम्यान संशोधनाला मदत करण्यासाठी प्रधानमंत्री रिसर्च फेलोशिप योजना देखील लागू केली जात आहे, असे ते म्हणाले. बहुविद्याशाखीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधनाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय संशोधन निधीची स्थापना करण्यात आल्याचे अधोरेखित करून पंतप्रधान म्हणाले की, विज्ञान, अभियांत्रिकी, पर्यावरण आणि आरोग्य यासारख्या क्षेत्रांना अनुसंधान राष्ट्रीय संशोधन फाउंडेशन मदत करेल. अभिनव तंत्रज्ञानातील संशोधन आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सरकारने एक लाख कोटी रुपयांचा निधी तयार करण्याचा निर्णयही घेतला आहे, ज्यामुळे जैवतंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासाला मदत होईल आणि तरुण शास्त्रज्ञांना पाठिंबा मिळेल, असे त्यांनी सांगितले.
"वन नेशन वन सबस्क्रिप्शन" या सरकारच्या अलीकडील महत्त्वपूर्ण निर्णयाचा उल्लेख करून, पंतप्रधानांनी सांगितले की हा उपक्रम भारतीय विद्यार्थी आणि संशोधकांना प्रतिष्ठित जागतिक नियतकालिके विनामूल्य मिळणे सुलभ करेल. या प्रयत्नांमुळे भारताला 21 व्या शतकातील ज्ञान आणि नवोन्मेषाचे केंद्र बनवण्यात मोठा हातभार लागेल यावर पंतप्रधानांनी भर दिला.
“भारताच्या लोकाभिमुख प्रशासन आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांनी जगासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे”, असे उद्गार पंतप्रधानांनी काढले. जीनोम इंडिया प्रकल्प अनुवंशिक संशोधनाच्या क्षेत्रात भारताची प्रतिमा अशाच प्रकारे मजबूत करेल, असा विश्वास पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना व्यक्त केला. जीनोम इंडिया प्रकल्पाच्या यशासाठी पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.
* * *
S.Kane/Shailesh/Tushar/Shraddha/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2091569)
Visitor Counter : 30
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam