संरक्षण मंत्रालय
एअरो इंडिया 2025 या हवाई प्रदर्शनासाठी पूर्वतयारीच्या निमित्ताने नवी दिल्ली इथे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली राजदूतांच्या गोलमेज परिषदेचे आयोजन
Posted On:
09 JAN 2025 5:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2025
एअरो इंडिया 2025 या हवाई प्रदर्शनासाठी पूर्वतयारीच्या निमित्ताने येत्या 10 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली इथे राजदूतांच्या गोलमेज परिषदेचे आयोजन केले गेले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या गोलमेज परिषदेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी दीडशेपेक्षा जास्त मित्र देशांच्या राजदूत आणि उच्चायुक्तांना निमंत्रण दिले गेले आहे. या सगळ्यांना एअरो इंडिया 2025 अंतर्गत आयोजित केल्या जाणाऱ्या प्रमुख उपक्रमांची माहिती दिली जाईल आणि त्यांच्या सर्वोच्च नेतृत्वाने उपस्थित राहावे यासाठी संरक्षण मंत्र्यांच्या वतीने वैयक्तिक निमंत्रण दिले जाईल. या परिषदेला संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि संरक्षण तसेच सशस्त्र दलाचे वरिष्ठ अधिकारी देखील या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
एअरो इंडिया हे आशियातील सर्वात मोठे हवाई प्रदर्शन असून या प्रदर्शनाचे हे 15वे पर्व आहे. कर्नाटकातील बेंगळुरूमधील येलहंका इथल्या हवाई तळावर 10 ते 14 फेब्रुवारी 2025 या कालावधीत या हवाई प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या पाच दिवसांच्या प्रदर्शनादरम्यान पूर्वावलोकन सोहळा, उद्घाटन सोहळा, संरक्षण मंत्र्यांची परिषद, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गोलमेज परिषद, iDEX स्टार्ट-अप उपक्रम, अचिंबित करायला लावतील अशी हवाई प्रात्यक्षिके, भारताच्या दालनाचा समावेश असलेले मोठ्या परिसरातले भव्य प्रदर्शन, आणि हवाई अंतराळ क्षेत्रातील कंपन्यांचा व्यापार मेळावा असे विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. अब्जावधी संधींच्या दिशेची धावपट्टी (The Runway to a Billion Opportunities) ही यंदाच्या या हवाई प्रदर्शनाची व्यापक संकल्पना असणार आहे.
एअरो इंडिया या प्रदर्शनात हवाई अंतराळ क्षेत्रातील तसेच संरक्षण क्षेत्रातील जगातील आघाडीच्या उद्योगांचे प्रदर्शक मोठ्या संख्येने सहभागी होत आले आहेत. या प्रदर्शनामुळे या उद्योग क्षेत्राला आपल्या लक्ष्यित ग्राहकांसमोर त्यांच्या कंपन्यांची क्षमता, उत्पादने आणि सेवा प्रदर्शित करण्याची एक अनोखी संधी मिळत असते. दर दोन वर्षांनी हे हवाई प्रदर्शन आयोजित केले जाते. या उद्योग क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्वांना त्यांचे संपर्क वाढवण्यासोबतच हवाई अंतराळ क्षेत्र आणि संरक्षण उद्योगांचे भवितव्य घडवण्यासाठीचा मंच म्हणून हा उपक्रम उपयुक्त ठरत आला आहे.
* * *
S.Kane/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2091532)
Visitor Counter : 23