अर्थ मंत्रालय
आगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 साठी अर्थसंकल्पपूर्व चर्चा बैठकांचा नवी दिल्लीत समारोप
Posted On:
06 JAN 2025 9:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 6 जानेवारी 2025
केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 साठी अर्थसंकल्पपूर्व चर्चा बैठकांचा आज नवी दिल्लीत समारोप झाला. 6 डिसेंबर 2024 रोजी या बैठकांना सुरुवात झाली होती आणि त्या एक महिनाभर सुरू होत्या.
प्रत्यक्ष उपस्थितीतील चर्चेदरम्यान, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि कृषी अर्थशास्त्रज्ञ; कामगार संघटना; शिक्षण आणि आरोग्य क्षेत्र; एमएसएमई; व्यापार आणि सेवा; उद्योग; अर्थशास्त्रज्ञ; वित्तीय क्षेत्र आणि भांडवली बाजार; तसेच, पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि शहरी क्षेत्र यामधील प्रतिनिधी आणि तज्ञांसह 09 हितधारक गटांमधील 100 हून अधिक निमंत्रित, या बैठकांमध्ये सहभागी झाले.
या चर्चेदरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यामधील सहभागींनी केलेल्या बहुमूल्य सूचनांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांच्या सूचनांचा काळजीपूर्वक अभ्यास केला जाईल आणि केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 तयार करताना त्यांचा विचार केला जाईल, असे आश्वासन तज्ञ आणि प्रतिनिधींना दिले. त्याशिवाय 10 जानेवारी 2025 पासून नागरिकांना देखील केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 साठी त्यांच्या बहुमूल्य सूचना आणि कल्पना माय जीओव्ही मंचावर पाठवता येणार आहेत. अर्थसंकल्प निर्मितीची प्रक्रिया लोकसहभागाच्या भावनेतून अधिक समावेशक बनवण्याच्या उद्देशाने या वार्षिक कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. देशभरातील नागरिकांकडून नावीन्यपूर्ण आणि विधायक सूचना प्राप्त करण्यासाठी अर्थ मंत्रालय आणि मायजीओव्ही उत्सुक असून त्यांच्या प्रतीक्षेत आहे. या सूचना पाठवण्यासाठी नागरिकांनी मायजीओव्ही मंचाला (www.mygov.in) भेट द्यावी आणि विकसित भारताच्या उभारणीत योगदान द्यावे.
S.Kane/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2090755)
Visitor Counter : 28