गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

1,000 किलोमीटर पेक्षा जास्त लांबीच्या विस्तारासह भारत बनला जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मेट्रो रेल्वे सेवेचे जाळे असलेला देश

Posted On: 05 JAN 2025 6:59PM by PIB Mumbai

 

देशातील मेट्रो रेल्वे सेवा व्यवस्थेने भारतातील प्रवासी दळणवळण  व्यवस्थेचा कायापालट केला आहे. आजमितीला देशभरातील 11 राज्ये आणि 23 शहरांमध्ये  1,000 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर मेट्रो रेल्वे सेवेचे जाळे विस्तारले आहे.  देशभरातले लाखो लोक जलद, सुलभ आणि परवडणाऱ्या दरातील प्रवासासाठी मेट्रो रेल्वे सेवेवर अवलंबून आहेत. इतक्या मोठ्या विस्तारासह भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मेट्रो रेल्वे सेवा जाळे असलेला देश बनला आहे. भारतातील नागरिकांसाठी मेट्रो रेल्वे सेवा ही केवळ फिरण्याचे एक साधन नसून, ते त्यांच्या शहरांमधील जगण्याला आणि प्रवासाला नवा आकार देणारे माध्यम बनले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 5 जानेवारी रोजी भारतातील मेट्रो रेल्वे सेवा जाळ्याचा विस्तार करण्याच्या आणि त्याला अधिक मजबूत आणि प्रगत बनवण्याच्या दिशेने एक मोठा टप्पा पार केला. पंतप्रधानांनी आज  दिल्ली-गाझियाबाद - मेरठ नमो भारत कॉरिडॉरच्या 13 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे उद्घाटन केले. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत 12,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. आज उद्घाटन झालेल्या गाझियाबाद - मेरठ नमो भारत कॉरिडॉर दिल्ली आणि मेरठ दरम्यानचा प्रवास मोठ्या प्रमाणात सुलभ होणार आहे. यासोबतच पंतप्रधानांनी दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्या अंतर्गतच्या 2.8 किलोमीटर लांबीच्या नव्या विस्तारीत मार्गाचेही उद्घाटन केले. या नव्या मार्गाचा लाभ पश्चिम दिल्लीतल्या नागरिकांना होणार आहे. या शिवाय पंतप्रधानांनी 26.5 किोलमीटर लांबीच्या  रिठाला - कुंडली विभागातील मार्गाच्या कामाची देखील पायाभरणी केली. या प्रकल्पामुळे दिल्ली आणि हरयाणा दरम्यानची दळणवळणीय जोडणी  अधिक मजबूत होणार आहे.

हे सर्व प्रकल्प म्हणजे वाहतुक व्यवस्थेतील एक मोठा मैलाचा टप्पा पार करण्याचे प्रतिक ठरले आहे. या प्रकल्पांमुळे मेट्रो रेल्वे सेवेचा विस्तार आता अधिक वाढणार आहे, आणि त्याद्वारे दररोज 1 कोटींपेक्षा जास्त  प्रवाशांना सेवा मिळणार आहे. इतक्या मोठ्या विस्तारातून भारताने मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या बाबतीत 2022 मधील जपानच्या कामगिरीला मागे टाकले आहे. सध्या कार्यान्वित असलेल्या मेट्रो रेल्वे सेवा जाळ्याच्या लांबीच्या बाबतीत भारत जागतिक पातळीवर तिसऱ्या स्थानावर पोहचला असून, आता भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मेट्रो रेल्वे सेवा जाळे असलेला देश बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Image

मेट्रो रेल्वे सेवेच्या बाबतीत भारताने साधलेल्या देशांतर्गत प्रगतीबरोबरच ही व्यवस्था उभारण्याच्या भारताच्या कौशल्याविषयीची जागतिक पातळीवरची उत्सुकता देखील वाढू लागली आहे.

दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळ (The Delhi Metro Rail Corporation - DMRC) सध्या बांगलादेशतील मेट्रो रेल्वे सेवेच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्याचे काम पाहत आहे, या सोबतच या संस्थेने जकार्तामध्ये देखील आपल्या बाजुने सल्लागाराची सेवा देऊ केली आहे. इस्रायल, सौदी अरेबिया (रियाध), केनिया आणि एल साल्वाडोर या देशांनी देखील  त्यांच्याकडील मेट्रो रेल्वे सेवेच्या विकास प्रकल्पांसाठी दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळ सोबत  सहकार्य करण्याच्या शक्यता तपासण्याला सुरुवात केली आहे.

***

S.Kane/T.Pawar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2090401) Visitor Counter : 84