पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जानेवारी रोजी विविध रेल्वे प्रकल्पांचे करणार उद्घाटन आणि पायाभरणी


जम्मू प्रदेशात संपर्क सुविधेला अधिक चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पंतप्रधान  नवीन जम्मू रेल्वे विभागाचे करणार उद्घाटन

तेलंगणातील चारलापल्ली नवीन टर्मिनल स्थानकाचे पंतप्रधान करणार उद्घाटन

ईस्ट कोस्ट रेल्वेच्या रायगडा रेल्वे विभागाच्या इमारतीची पंतप्रधानांच्या हस्ते होणार पायाभरणी

Posted On: 05 JAN 2025 6:28PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजता दूरदृश्य  प्रणालीमार्फत विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.

जम्मू प्रदेशातील संपर्क सुविधेला अधिक चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पंतप्रधानांच्या हस्ते नवीन जम्मू रेल्वे विभागाचे उद्घाटनही केले जाणार आहे. यासोबतच पंतप्रधान, तेलंगणातील चारलापल्ली नवीन टर्मिनल स्थानकाचे उद्घाटन तर ईस्ट कोस्ट रेल्वेच्या रायगडा रेल्वे विभागाच्या इमारतीची पायाभरणी करणार आहेत.

पठाणकोट - जम्मू - उधमपूर - श्रीनगर - बारामुल्ला, भोगपूर सिरवाल - पठाणकोट, बटाला - पठाणकोट आणि पठाणकोट ते जोगिंदर नगर या खंडांचा  समावेश असलेल्या 742.1 किमी लांबीच्या जम्मू रेल्वे विभागाच्या निर्मितीमुळे जम्मू आणि काश्मीर तसेच आसपासच्या प्रदेशांना यांचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल, सोबतच दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या रेल्वे सेवेची पूर्तता होऊन या भागाचा भारताच्या इतर भागांशी संपर्कही सुधारेल. ही सेवा सुरू झाल्याने रोजगाराच्या संधी निर्माण होतील, पायाभूत सुविधांचा विकास होईल, पर्यटनाला चालना मिळेल आणि या क्षेत्राचा सर्वांगीण सामाजिक-आर्थिक विकास होईल.

तेलंगणातील मेडचल-मलकाजगिरी जिल्ह्यातील चारलापल्ली नवीन टर्मिनल स्थानक सुमारे 413 कोटी रुपये खर्च करून दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या तरतुदीसह नवीन कोचिंग टर्मिनल म्हणून विकसित केले गेले आहे. हे पर्यावरणपूरक टर्मिनल उत्तम प्रवासी सुविधा प्रदान करत सिकंदराबाद, हैदराबाद आणि काचिगुडा यांसारख्या शहरातील विद्यमान कोचिंग टर्मिनल्सवरील गर्दी कमी करण्यासाठी मदत करेल.

याच कार्यक्रमात, पंतप्रधान ईस्ट कोस्ट रेल्वेच्या रायगडा रेल्वे विभागाच्या इमारतीची पायाभरणीही करतील. यामुळे ओदिशा, आंध्र प्रदेश आणि जवळपासच्या भागात संपर्क सुधारेल आणि या क्षेत्राचा सर्वांगीण सामाजिक-आर्थिक विकास होईल.

***

S.Kane/A.Save/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2090396) Visitor Counter : 63