संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा 67वा स्थापना दिवस: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत वरिष्ठ वैज्ञानिक व अधिकाऱ्यांची घेतली भेट


देशाच्या स्वदेशी क्षमतांच्या विकासासाठी आणि संरक्षण क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी केलेल्या योगदानाबद्दल गौरवोद्गार

Posted On: 02 JAN 2025 6:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 जानेवारी 2025

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 2 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) मुख्यालयाला भेट देत, संस्थेच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त वरिष्ठ वैज्ञानिक आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या बैठकीस संरक्षण राज्यमंत्री संजय सेठही उपस्थित होते. आपल्या भाषणात राजनाथ सिंह यांनी सशस्त्र दलांना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणे पुरवून, तसेच खासगी क्षेत्रासोबत सहकार्य साधून देशाच्या स्वदेशी क्षमतांचा विकास करण्यासाठी डीआरडीओच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

2025 हे ‘सुधारणेचे वर्ष’ म्हणून जाहीर झाले असून डीआरडीओ ठरवलेली उद्दिष्टे साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल  असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  बदलत्या तंत्रज्ञानाशी  सुसंगत राहून, काळानुसार उपयुक्त ठरणारी उत्पादने निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी डीआरडीओला केले. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगत देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या उत्पादन व प्रक्रियांवर लक्ष ठेवत, खास तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर द्यावा, जेणेकरून डीआरडीओ जगातील सर्वोत्तम संशोधन व विकास संस्थांपैकी एक बनू शकेल, असेही त्यांनी सांगितले. डीआरडीओच्या प्रत्येक प्रयोगशाळेने 2-3 महत्त्वाचे प्रकल्प निवडून, ते 2025 पर्यंत पूर्ण करावेत, असेही त्यांनी सूचवले. “पुढील स्थापना दिनापर्यंत असे 100 प्रकल्प पूर्ण करावेत ,” असे त्यांनी यावेळी सुचवले.

डीआरडीओने खासगी क्षेत्रासोबत सहयोग वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे राजनाथ सिंह यांनी कौतुक केले, ज्यात तंत्रज्ञानाचे हस्तांतरण आणि पेटंट्सवर मोफत प्रवेश यांचा समावेश आहे. खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवू शकणाऱ्या आणखी क्षेत्रांची ओळख करून देण्याचे आवाहन त्यांनी संस्थेला केले. सर्व भागधारकांनी एकत्रित काम केल्यासच देश प्रगती करू शकतो यावर त्यांनी भर दिला.

डीआरडीओने आपल्या संशोधन आणि विकास उपक्रमांमध्ये स्टार्ट-अप्सला सहभागी करून घेण्याच्या शक्यतांचा शोध घ्यावा, असेही संरक्षण  मंत्र्यांनी सुचवले. या बैठकीदरम्यान, संरक्षण संशोधन व विकास विभागाचे सचिव व डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी 2024 मधील डीआरडीओच्या चालू संशोधन व विकास कार्य, यशस्वी कामगिरी, उद्योग, स्टार्ट-अप्स यांना प्रोत्साहन देणाऱ्या विविध उपक्रमांविषयी आणि 2025 साठीचा डीआरडीओचा आराखडा याबाबत संरक्षण  मंत्र्यांना माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत डीआरडीओ विकसित प्रणालींसाठी 1,950 तंत्रज्ञान हस्तांतरण भारतीय उद्योगांना दिले गेले असून, यापैकी 2024 मध्ये 256 परवाना करार भारतीय उद्योगांशी करण्यात आले आहेत.

 

* * *

N.Chitale/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2089653) Visitor Counter : 34