संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

निलगिरी, सुरत आणि वागशीर या तीन आघाडीच्या लढाऊ ताफा मालमत्ता भारतीय नौदलात सामील होण्यास सज्ज


तीनही लढाऊ मालमत्ता एकाच दिवशी केल्या जाणार नौदलाच्या ताफ्यात सामील

Posted On: 01 JAN 2025 3:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जानेवारी 2025

 

15 जानेवारी 25 हा दिवस भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. कारण, या दिवशी भारतीय नौदल तीन आघाडीच्या लढाऊ जहाजांना नौदलात नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे एकाच कार्यक्रमात  नौदलाच्या ताफ्यात सामील करून घेण्याचे निश्चित केले आहे. ताफ्यात सामील होणारी पुढील प्रमाणे आहेत - निलगिरी, हे प्रोजेक्ट 17A स्टेल्थ फ्रिगेट अर्थात विनाशिका  श्रेणीतील प्रमुख जहाज; सुरत, प्रोजेक्ट 15B स्टेल्थ डिस्ट्रॉयर श्रेणीतील चौथे आणि अंतिम जहाज; तर वाघशीर, हे स्कॉर्पिन-श्रेणी प्रकल्पाची सहावी आणि अंतिम पाणबुडी.  

ही ऐतिहासिक घटना भारतीय नौदलाच्या लढाऊ क्षमतेला महत्त्वपूर्ण चालना देईल आणि स्वदेशी जहाजबांधणीमध्ये देशाची अग्रगण्य स्थिती अधोरेखित करेल. या तीनही लढाऊ युद्धनौका यांचे आरेखन आणि बांधणी  संपूर्णपणे मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड (MDL) येथे करण्यात आली आहे. या युद्धनौका संरक्षण उत्पादनाच्या महत्वपूर्ण क्षेत्रात भारताच्या वाढत्या आत्मनिर्भरतेचा पुरावा आहेत.  या प्रगत युद्धनौका आणि पाणबुड्या यशस्वीरित्या कार्यान्वित केल्याने युद्धनौका आरेखन आणि बांधणी क्षेत्रात भारताने केलेल्या जलद प्रगतीवर प्रकाश पडण्याबरोबर संरक्षण उत्पादनात जागतिक प्रमुख म्हणून भारताचे स्थान आणखी मजबूत झाले आहे.

निलगिरी हे प्रोजेक्ट 17A चे प्रमुख जहाज, शिवालिक-श्रेणीतील  युद्धनौकांच्या तुलनेत एक मोठी प्रगती असून यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे महत्त्वपूर्ण स्टेल्थ वैशिष्ट्ये आणि कमी रडार सिग्नेचर (रडारद्वारे लक्ष्य किती सहजपणे शोधले जाऊ शकते याचे एक माप) समाविष्ट आहेत. सुरत हे प्रोजेक्ट 15B विनाशक जहाज, कोलकाता-क्लास (प्रोजेक्ट 15A) विनाशकांच्या फॉलो-ऑन क्लासचा चरम बिंदू आहे. या जहाजांच्या आरेखन आणि क्षमतांमध्ये भरीव सुधारणा केलेल्या आहेत. दोन्ही जहाजांची रचना भारतीय नौदलाच्या युद्धनौका आरेखन ब्युरोने केली असून त्या प्रगत सेन्सर्स आणि शस्त्रास्त्र साठ्याने सुसज्ज आहेत. ही शस्त्रास्त्रे देखील प्रामुख्याने भारतात किंवा आघाडीच्या जागतिक उत्पादकांसोबत धोरणात्मक सहकार्याने विकसित केली गेली आहेत.

आधुनिक विमान वाहतूक सुविधांसह सुसज्ज, निलगिरी आणि सूरतमध्ये चेतक, एएलएच, सी किंग आणि नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या MH-60R यासह अनेक हेलिकॉप्टरचा समावेश असून हे हेलिकॉप्टर दिवसा आणि रात्री दोन्हीवेळा चालणाऱ्या मोहीमांमध्ये सहभागी होऊ शकतात.  रेल-लेस हेलिकॉप्टर ट्रॅव्हर्सिंग सिस्टीम तसेच व्हिज्युअल एड आणि लँडिंग सिस्टीम यासारखी आधुनिक वैशिष्ट्ये सर्व परिस्थितींमध्ये मोहीम अखंड चालू राहील हे सुनिश्चित करतात.  या जहाजांमध्ये महिला अधिकारी आणि महिला खलाशांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यासाठी विशिष्ट निवासस्थानांचा देखील समावेश केला आहे, जे आघाडीच्या लढाऊ भूमिकांमध्ये लिंगभाव  समावेश करण्याच्या दिशेने नौदलाच्या प्रगतीशील पावलांशी संरेखित आहे.

वागशीर, ही कलवरी-श्रेणी प्रकल्प 75 अंतर्गत सहावी स्कॉर्पीन-श्रेणीची पाणबुडी असून ती जगातील सर्वात शांत आणि डिझेल-इलेक्ट्रिक दोन्ही इंधनांनवर चालणाऱ्या बहुमुखी पाणबुड्यांपैकी एक आहे.  पृष्ठभागविरोधी युद्ध, पाणबुडीविरोधी युद्ध, गुप्त माहिती गोळा करणे, क्षेत्र निरीक्षण आणि विशेष मोहीम यासह विविध मोहिमा हाती घेण्यासाठी या पाणबुडीची रचना करण्यात आली आहे. ही पाणबुडी वायर-मार्गदर्शित टॉर्पेडो अर्थात पाणतीर , जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि प्रगत सोनार सिस्टीमसह सज्ज असून पाणबुडीमध्ये मॉड्यूलर बांधकाम देखील आहे. यामुळे यात एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन (एआयपी) तंत्रज्ञान यासारख्या भविष्यातील सुधारणांचे एकत्रीकरण करता येईल.

निलगिरी, सुरत आणि वागशीरचे एकत्रित नौदलात सामील होणे हे संरक्षण स्वावलंबन आणि स्वदेशी जहाजबांधणीमध्ये भारताची अतुलनीय प्रगती दर्शवणारे आहे.  या जहाजांच्या कठोर चाचण्या घेण्यात आल्या आहेत, ज्यात यंत्रसामग्री, हल, अग्निशमन आणि नुकसान नियंत्रण मूल्यांकन, तसेच समुद्रातील सर्व नेव्हिगेशन आणि दळणवळण यंत्रणा सिद्ध करणे यांचा समावेश आहे. या सर्व चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण करुन या युद्धनौका पूर्णपणे कार्यान्वित असून तैनातीसाठी तयार आहेत.

हा ऐतिहासिक प्रसंग केवळ नौदलाची सागरी ताकद वाढवणारा नाही तर संरक्षण उत्पादन आणि स्वावलंबनामधील देशाच्या उल्लेखनीय कामगिरीचेही प्रतीक आहे. भारतीय नौदल आणि संपूर्ण राष्ट्रासाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे, जो एक मजबूत आणि स्वयंपूर्ण संरक्षण परिसंस्था निर्माण करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेला आणखी बळकट करतो.

Vaghsheer

Surat

Nilgiri

 

* * *

JPS/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2089255) Visitor Counter : 65