इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारताच्या सागरी क्षेत्रात डिजिटल परिवर्तनाला चालना देणे, हा राष्ट्रीय ई गव्हर्नन्स विभाग आणि इंडियन पोर्टस असोसिएशन यांच्यातील सामंजस्य कराराचा उद्देश
बंदरे आणि नौवहन क्षेत्रांमधली डिजिटल दरी, कालबाह्य प्रथा आणि लॉजिस्टिक्समधील खंडित समस्या यावर मात करण्यासाठीचा हा एकत्रित प्रयत्न
Posted On:
26 DEC 2024 8:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2024
राष्ट्रीय ई गव्हर्नन्स विभाग आणि इंडियन पोर्टस असोसिएशन(आयपीए) यांच्यात नवी दिल्ली येथे 24 डिसेंबर 2024 रोजी एका महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
लक्ष केंद्रित करावयाची प्रमुख क्षेत्रे
राष्ट्रीय ई गव्हर्नन्स विभागाचे तांत्रिक कौशल्य आणि सागरी क्षेत्र (बंदरे, नौवहन,इ.) व राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील लॉजिस्टिक उद्योग यांबाबत आयपीएचे सखोल ज्ञान यांचा मेळ साधत भारताच्या सागरी क्षेत्रात डिजिटल परिवर्तनाला चालना देणे, हे या धोरणात्मक भागीदारीचे उद्दिष्ट आहे. लॉजिस्टिक्स प्रणाली सुव्यवस्थित करणे, परिचालन कार्यक्षमता वाढवणे आणि बंदर परिसंस्थेचे आधुनिकीकरण करणे यासाठी एक उत्तम आराखडा हा सामंजस्य करार स्थापित करतो. लक्ष केंद्रित करावयाच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये सॉफ्टवेअर विकास, प्रणाली एकत्रीकरण, क्षमता निर्माण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा अवलंब यांचा समावेश आहे.
सागरी डिजिटल परिसंस्थेचा कायापालट
अडथळाविरहित जोडणी आणि भागीदारांमधील सहयोग याला चालना देत अधिक स्मार्ट, तंत्रज्ञानप्रणीत सागरी डिजिटल परिसंस्था निर्माण करण्यासाठीच्या संयुक्त वचनबद्धतेचे प्रतिबिंब या पुढाकारात आहे. या भागीदारीतून राष्ट्रीय ई गव्हर्नन्स विभाग आणि आयपीए दोघांनीही दीर्घकालीन आव्हाने जसे की बंदरे आणि नौवहन क्षेत्रातील अपुऱ्या डिजिटल पायाभूत सुविधा, खंडित लॉजिस्टिक प्रणाली, कालबाह्य संचालन पद्धती यावर मार्ग काढणे, हे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स विभाग आणि आयपीए यांचे उद्दिष्ट आहे.
या सहयोगाअंतर्गत भविष्यात देशभरातील बंदरे एकमेकांना जोडणे, रिअल टाइम डेटाचा लाभ घेणे, इष्टतम परिचालनासाठी विश्लेषण, जहाजातून मालाची चढ-उतार करण्यासाठीचा कालावधी कमी करणे आणि पुरवठा साखळीतील कार्यक्षमता वाढवणे संकल्पित आहे. हा सामंजस्य करार भारताच्या सागरी क्षमतांना बळकटी देतो आणि बंदर परिचालनाच्या डिजिटल परिवर्तनात जागतिक अग्रणी होण्याच्या राष्ट्रीय संकल्पनेशी तो संरेखित आहे.
* * *
N.Chitale/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2088237)
Visitor Counter : 22