पंचायती राज मंत्रालय
27 डिसेंबर 2024 रोजी 58 लाख स्वामित्व मालमत्ता पत्रांच्या ऐतिहासिक ई-वितरणाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी करणार नेतृत्व
मालमत्तेच्या हक्कांना चालना: स्वामित्व योजना करणार 2 कोटी मालमत्ता पत्रांचा टप्पा पार; देशभरातील 50,000 गावांना मिळणार लाभ
Posted On:
26 DEC 2024 2:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2024
भारताच्या ग्रामीण सशक्तीकरण आणि प्रशासनाच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरलेल्या स्वामित्व (SVAMITVA) मालमत्ता पत्रांच्या ई-वितरणाचे अध्यक्षस्थान पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, उद्या दिनांक 27 डिसेंबर 2024 (शुक्रवार) रोजी दुपारी 12:30 वाजता दृकश्राव्य पध्दतीने होणाऱ्या कार्यक्रमात भूषविणार आहेत. या कार्यक्रमात छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मिझोराम, ओडिशा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश या 10 राज्यांतील आणि 2 केंद्रशासित प्रदेश-जम्मू आणि लडाख मधील अंदाजे 50,000 गावांमधील 58 लाख लाभार्थ्यांना स्वामित्व SVAMITVA मालमत्ता पत्रांचे वितरण होणार आहे. एकाच दिवशी 58 लाखांहून अधिक प्रॉपर्टी कार्डचे वितरण करत स्वामित्व (SVAMITVA) योजनेंतर्गत 2 कोटींहून अधिक मालमत्ता पत्र तयार करून त्यांचे वितरण करण्यात येण्याचा महत्त्वाचा टप्पा या कार्यक्रमातून गाठला जाणार आहे.
केंद्रीय पंचायती राज मंत्री श्री राजीव रंजन सिंह उर्फ लालन सिंह, केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल तसेच पंचायती राज मंत्रालय सचिव श्री विवेक भारद्वाज यांच्या विशेष उपस्थितीत पंतप्रधान निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधतील आणि राष्ट्राला संबोधित करतील. या समारंभाला विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, वरिष्ठ अधिकारी, पंचायत प्रतिनिधी आणि भागधारक देखील दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थित राहणार आहेत. मालमत्ता वितरण पत्रांच्या प्रादेशिक वितरण समारंभासाठी सुमारे 13 केंद्रीय मंत्री देशभरातील विविध राज्यांतील नियुक्त ठिकाणांहून प्रत्यक्ष उपस्थित रहात यात सामील होतील.
देशव्यापी प्रभावी परिवर्तन घडविणाऱ्या SVAMITVA योजनेसाठी व्यापक तयारी
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने,पंचायती राज मंत्रालय, स्वामित्व (SVAMITVA) योजनेचा जास्तीत जास्त प्रसार करेल, तसेच मंत्रालयाचे इतर प्रमुख अभिमुखता उपक्रम देखील 27 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करून देशभरात सुमारे 20,000 ठिकाणी जनजागृतीचे कार्यक्रम होतील.
SVAMITVA योजनेअंतर्गत केलेली महत्वपूर्ण कामगिरी
- ड्रोन मॅपिंग कव्हरेज: या अंतर्गत 3.17 लाख गावांमध्ये सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
- मालमत्ता पत्र वितरण: 1.49 लाख गावांमध्ये मिळून 2.19 कोटींहून अधिक मालमत्ता पत्रे तयार करण्यात आली आहेत.
- प्रशासकीय सुधारणा: डिजिटली प्रमाणित मालमत्तेच्या नोंदींनी स्थानिक प्रशासनाला बळकटी दिली आहे आणि ग्रामपंचायत विकास योजना (GPDPs) सुधारण्यात आल्या आहेत.
- आर्थिक सर्वसमावेशकता: मालमत्ता पत्रे देण्यात आल्यामुळे ग्रामीण नागरिक सशक्त होत असून,त्यांना संस्थात्मक कर्ज उपलब्ध होण्याची सोय झाली आहे.
- महिला सक्षमीकरण: मालमत्तेच्या कायदेशीर मालकीने महिलांना अधिक आर्थिक आणि सामाजिक संरक्षण प्रदान केले जात आहे.
- विवाद निराकरण: मालमत्ता सर्वेक्षण अचूकपणे झाल्यामुळे मालमत्तेचे विवाद लक्षणीयरीत्या कमी झाले आहेत.
स्वामित्व योजना (SVAMITVA): ग्रामीण भारतासाठी एक प्रभावी परीवर्तन योजना
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 24 एप्रिल 2020 रोजी (राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त) प्रारंभ केलेल्या, SVAMITVA योजनेचे उद्दिष्ट ड्रोन आणि भौगोलिक माहिती प्रणाली तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील मालमत्ताधारकांना त्यांच्या "मालकीहक्कांच्या नोंदी" प्रदान करणे हे आहे. कोविड-19 साथीच्या आजाराने उभ्या केलेल्या अभूतपूर्व आव्हानांना न जुमानता, पंतप्रधानांनी 11 ऑक्टोबर 2020 रोजी मालमत्ता पत्रांचा पहिला संच वितरित केला आणि या परिवर्तनात्मक उपक्रमांबाबत असलेली सरकारची दृढ वचनबद्धता सिध्द करून दाखविली.आर्थिक सर्वमावेशकता,ग्रामीण भागांत स्थिरता आणि आर्थिक वाढ घडवून आणण्यासाठी आंतर-विभागीय समन्वय वाढवत SVAMITVA योजना ही याबाबत असलेल्या संपूर्ण-सरकार या दृष्टिकोनाचे उत्तम उदाहरण आहे;याने केवळ मालमत्ता धारकांनाच सशक्त केले असे नाही तर ग्रामीण भारतातील पायाभूत सुविधांचे उत्तम नियोजन करत,आर्थिक स्थैर्य आणि शाश्वत विकासही साध्य केला आहे.
* * *
JPS/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2088104)
Visitor Counter : 47