पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते 'इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023'चे प्रकाशन
Posted On:
21 DEC 2024 1:06PM by PIB Mumbai
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज 'भारतीय राज्य वन अहवाल 2023' (आयएसएफआर 2023) देहरादून येथील वन संशोधन संस्था येथे प्रकाशित केली. ही अहवाल मालिका 1987 पासून दर दोन वर्षांनी भारतीय वन सर्वेक्षण (एफएसआय) द्वारे तयार केली जाते.
एफएसआय उपग्रह रिमोट सेन्सिंग डेटा आणि क्षेत्र-आधारित राष्ट्रीय वन सूची (एनएफआय) च्या आधारे देशातील वन आणि वृक्षांच्या संसाधनांचे सखोल मूल्यांकन करते आणि त्याचे परिणाम आयएसएफआर मध्ये प्रकाशित करते. 'भारतीय राज्य वन अहवाल 2023' हा या मालिकेतील 18 वा अहवाल आहे.
या अहवालात भारतातील वन क्षेत्र, वृक्षांचे क्षेत्र, खारफुटी क्षेत्र, वनांतील वाढीचा साठा, कार्बन साठा, वणवा, कृषीवनशास्त्र इत्यादींची माहिती समाविष्ट आहे. देशाच्या स्तरावर वन आरोग्याची सविस्तर माहिती देण्यासाठी विशेष संकल्पनात्मक माहिती सादर करण्यात आली आहे. सध्याच्या मूल्यांकनानुसार, देशातील एकूण वन आणि वृक्ष क्षेत्र 8,27,357 चौ.किमी (25.17%) आहे. यामध्ये वन क्षेत्र 7,15,343 चौ.किमी (21.76%) असून वृक्ष क्षेत्र 1,12,014 चौ.किमी (3.41%) आहे.
मंत्री महोदयांनी 2021 च्या तुलनेत देशातील एकूण वन आणि वृक्ष क्षेत्रामध्ये 1,445 चौ.किमी वाढ झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी एफएसआयद्वारे प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने देण्यात येणाऱ्या जवळजवळ रिअल-टाईम आगीची सूचना आणि वणवा विषयक सेवांवरही आपल्या भाषणात भर दिला.
महत्त्वाचे निष्कर्ष
● देशातील एकूण वन आणि वृक्ष क्षेत्र 8,27,357 चौ. किमी असून ते देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 25.17 टक्के आहे. यामध्ये 7,15,343 चौ. किमी (21.76%) वन क्षेत्र आणि 1,12,014 चौ. किमी (3.41%) वृक्ष क्षेत्र आहे.
● 2021च्या मूल्यांकनाच्या तुलनेत एकूण वन आणि वृक्ष क्षेत्रात 1,445 चौ. किमी वाढ झाली आहे, ज्यामध्ये वन क्षेत्रात 156 चौ. किमी आणि वृक्ष क्षेत्रात 1,289 चौ. किमी वाढ झाली आहे.
वन आणि वृक्ष क्षेत्रात सर्वाधिक वाढ झालेले राज्ये:
1. छत्तीसगड (684 चौ. किमी)
2. उत्तर प्रदेश (559 चौ. किमी)
3. ओडिशा (559 चौ. किमी)
4. राजस्थान (394 चौ. किमी)
वन क्षेत्रात सर्वाधिक वाढ झालेली राज्ये:
1. मिझोरम (242 चौ. किमी)
2. गुजरात (180 चौ. किमी)
3. ओडिशा (152 चौ. किमी)
एकूण वन आणि वृक्ष क्षेत्रात आघाडीवर असलेली राज्ये:
1. मध्य प्रदेश (85,724 चौ. किमी)
2. अरुणाचल प्रदेश (67,083 चौ. किमी)
3. महाराष्ट्र (65,383 चौ. किमी)
टक्केवारीने सर्वाधिक वन क्षेत्र असलेली राज्ये:
1. लक्षद्वीप (91.33%)
2. मिझोरम (85.34%)
3. अंदमान आणि निकोबार बेटे (81.62%)
● देशातील एकूण खारफुटीचे क्षेत्र 4,992 चौ. किमी आहे.
● भारतातील वन आणि वृक्षांच्या बाहेरील एकूण वाढ झालेला साठा 6,430 दशलक्ष घनमीटर आहे.
● देशातील एकूण बांबू क्षेत्र 1,54,670 चौ. किमी आहे, ज्यात 2021च्या तुलनेत 5,227 चौ.किमी वाढ झाली आहे.
● देशातील एकूण कार्बन साठा 7,285.5 दशलक्ष टन असून 2021च्या तुलनेत 81.5 दशलक्ष टन वाढ झाली आहे.
एनडीसी अंतर्गत कार्बन शोषण लक्ष्य साध्य करण्याच्या संदर्भात, देशाने 2005 च्या पायाभूत वर्षाच्या तुलनेत 2.29 अब्ज टन अतिरिक्त कार्बन साठ्याचे लक्ष्य साध्य केले आहे.
हा अहवाल धोरणकर्त्यांसाठी, संशोधन संस्थांसाठी, विकासात्मक कामांमध्ये गुंतलेल्या संस्थांसाठी आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन व व्यवस्थापनात रस असणाऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरतो.
***
H.Akude/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2086754)
Visitor Counter : 51