उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपतींनी पिकांचे अवशेष जाळण्यावर पद्धतशीर उपाय शोधण्याचे केले आवाहन, आपला निष्काळजीपणा आपल्यालाच संकटात टाकत असल्याचा दिला इशारा

Posted On: 14 DEC 2024 5:30PM by PIB Mumbai

 

शेतातील पिकांचे अवशेष जाळण्यावर पद्धतशीर उपाय शोधण्याचे आवाहन आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. ‘हे काम कोणा एका व्यक्तीकडे सोपवून चालणार नाही,’ असे ते म्हणाले. राष्ट्रीय उर्जा संवर्धन दिन 2024 निमित्त नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. धनखड म्हणाले, ‘पिकांचे अवशेष जाळल्यामुळे निर्माण होणाऱ्या घातक पर्यावरणीय परिस्थितीचा सामना राजधानी दिल्लीला दरवर्षी करावा लागतो. आपण नाविन्यपूर्ण कल्पना वापरुन यावर पद्धतशीर उपाय शोधला पाहिजे. ही जबाबदारी कोणा एका व्यक्तीवर सोपवून चालणार नाही. यासाठी यंत्रणांनीच पुढाकार घ्यायला हवा...जरा विचार करा, आपला निष्काळजीपणा आपल्याला अनेक प्रकारे संकटात लोटत आहे. एकतर आपले आरोग्य, दुसरे म्हणजे कामाच्या कित्येक तासांचे नुकसान, तिसरे सामान्य जनजीवन विस्कळीत होणे आणि चौथे म्हणजे आपल्या मुलांची काळजी. आपण त्यांच्यावर खूपच निर्बंध लादत आहोत. हवेचे प्रदूषण खूपच जास्त असल्यामुळे मुले शाळेत जाऊ शकत नाहीत. म्हणून या संकटाशी सामना करण्यात प्रत्येकाने आपले योगदान द्यायला हवे.’

नैसर्गिक संसाधनांचा जबाबदारीने वापर करण्याचे महत्त्व अधोरेखित करताना उपराष्ट्रपती म्हणाले, ‘आपली आर्थिक ताकद, आपला विश्वास हे नैसर्गिक संसाधनांच्या, उर्जेच्या वापराचे प्रमाण ठरवू शकत नाही. जर काही लोकांना असे वाटत असेल की मला परवडते, तर त्यांनी पुन्हा एकदा आपले विचार तपासून घ्यावेत असे मी म्हणेन. ही संसाधने तुमच्या एकट्याच्या मालकीची नाहीत. ती सगळ्या मानव जातीच्या उपयोगासाठी आहेत आणि म्हणूनच नैसर्गिक संसाधनांचा, उर्जेचा आवश्यक तितकाच आणि जबाबदारीने वापर केला पाहिजे.’ 

***

S.Kane/S.Joshi/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2084491) Visitor Counter : 46