संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भारत रशिया आंतर-शासकीय लष्कर व लष्करी तांत्रिक सहकार्य आयोगाच्या 21व्या बैठकीत सहभागी होण्यासाठी रशियाला भेट देणार
संरक्षण मंत्र्यांच्या 3 दिवसांच्या दौऱ्यात आयएनएस तुशील ही भारतीय नौदलाची बहुउपयोगी, क्षेपणास्त्र सज्ज, अत्याधुनिक युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात सामील होणार
Posted On:
07 DEC 2024 10:03AM by PIB Mumbai
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 8 डिसेंबर ते 10 डिसेंबर 2024 दरम्यान रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात 10 डिसेंबर 2024 रोजी मॉस्को इथे आयोजित भारत रशिया आंतर शासकीय लष्कर व लष्करी तांत्रिक सहकार्य आयोगाच्या (IRIGC-M&MTC) 21व्या बैठकीत सहभागी होतील. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रे बेलुसोव्ह या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.
भारत आणि रशिया यांच्यातल्या संरक्षण क्षेत्रातील लष्करी व औद्योगिक सहकार्यासह अन्य क्षेत्रातील संबंधांबाबतच्या विविध पैलूंचा सविस्तर आढावा दोन्ही देशांचे संरक्षण मंत्री घेतील. सध्याच्या जागतिक व क्षेत्रिय घडामोडींविषयी देखील दोन्ही नेते चर्चा करतील.
या दौऱ्यात संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते 9 डिसेंबर 2024 रोजी कॅलिनीनग्राड इथल्या यंत्रा बंदरात ‘आयएनएस तुशील’ ही भारतीय नौदलाची बहुउपयोगी, क्षेपणास्त्र सज्ज, अत्याधुनिक युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात सामील केली जाणार आहे. नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के. त्रिपाठी या समारंभाला उपस्थित राहतील.
संरक्षण मंत्री या दौऱ्यात मॉस्कोमधील ‘अनाम सैनिकांच्या स्मारका’ला भेट देऊन दुसऱ्या महायुद्धात वीरगती प्राप्त झालेल्या रशियन सैनिकांना आदरांजली अर्पण करतील तसेच ते मॉस्कोमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधतील.
***
H.Akude/S.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2081834)
Visitor Counter : 41