शिक्षण मंत्रालय
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान भारतीय सांकेतिक भाषेसाठी उद्या पीएम-ई-विद्या डीटीएच वाहिनीचा करणार प्रारंभ
Posted On:
05 DEC 2024 6:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 डिसेंबर 2024
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान उद्या (6 डिसेंबर, 2024) नवी दिल्ली येथे भारतीय सांकेतिक भाषेसाठी पीएम-ई-विद्या डीटीएच वाहिनी क्रमांक 31 चा प्रारंभ करतील. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी हे देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात कर्णबधिर मुले, यश मिळवलेल्या कर्णबधिर व्यक्ती, विशेष शिक्षक, आयएसएल प्रमाणित दुभाषी आणि कर्णबधिर समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करणाऱ्या संस्थांचा सहभाग असणार आहे.
हा महत्त्वपूर्ण उपक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी ) 2020 च्या उद्दिष्टांचे समर्थन करतो ज्यात अधिक समावेशक शैक्षणिक वातावरणास प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय सांकेतिक भाषेला प्रोत्साहन देण्याची शिफारस केली आहे. एनईपी च्या परिच्छेद 4.22 मध्ये असे नमूद केले आहे की 'भारतीय सांकेतिक भाषेचे देशभरात प्रमाणित केली जाईल आणि श्रवणदोष असलेल्या विद्यार्थ्यांच्या वापरासाठी राष्ट्रीय आणि विविध राज्यांच्या अभ्यासक्रमाची विषय सामग्री विकसित केली जाईल. स्थानिक सांकेतिक भाषांचा आदर केला जाईल आणि जिथे शक्य असेल आणि प्रासंगिक असेल तिथे त्यांना शिकवली जाईल.’
भारतीय सांकेतिक भाषेच्या प्रचारासाठी समर्पित पीएम ई-विद्या वाहिनीची संकल्पना आयएसएल ला एक भाषा तसेच शालेय विषय म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आली आहे, जेणेकरून मोठ्या लोकसंख्येला भाषा शिकण्याची सुविधा मिळेल. ही वाहिनी शालेय मुलांसाठी (केंद्रीय आणि राज्य अभ्यासक्रम), शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक आणि इतर हितधारकांसाठी करिअर मार्गदर्शन, कौशल्य प्रशिक्षण, मानसिक आरोग्य, वर्ग-निहाय अभ्यासक्रम सामग्री, संभाषण कौशल्ये क्षेत्रात शैक्षणिक सामग्रीचा प्रसार करेल. यामुळे हिंदी, इंग्रजी सारख्या मौखिक भाषांप्रमाणेच सांकेतिक भाषेला भाषा विषय म्हणून प्रोत्साहन मिळेल.
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2081237)
Visitor Counter : 40