विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विकसित भारताची कथा विज्ञानाच्या अक्षरांनी लिहिली जाईल - डॉ. जितेंद्र सिंह


केंद्रीय मंत्र्यांनी भारताचे वैज्ञानिक सामर्थ्य दाखवणाऱ्या आयआयएसएफ 2024 चे केले उद्घाटन

Posted On: 30 NOV 2024 4:17PM by PIB Mumbai

 

गुवाहाटी येथे भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (आयआयएसएफ) 2024 च्या 10व्या आवृत्तीच्या उद्घाटनादरम्यान "विकसित भारताची कथा विज्ञानाच्या अक्षरांनी लिहिली जाईल," असे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले  आहे.

सभेला संबोधित करताना त्यांनी असे नमूद केले की, भारताच्या विकसित राष्ट्र होण्याच्या वाटचालीत वैज्ञानिक प्रगती आणि नवकल्पनांचा मोठा वाटा आहे. डॉ. जितेंद्र सिंह यांनी असेही स्पष्ट केले की विज्ञानाला प्रगतीचे मुख्य साधन मानून, भविष्यात तंत्रज्ञान आणि संशोधन समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात, जसे की आरोग्यसेवा, पायाभूत सुविधा इत्यादींमध्ये, योगदान देण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्यांच्या शब्दांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'विकसित भारत' साकार करण्यासाठी विज्ञानाच्या परिवर्तनक्षम ऊर्जेची जाणीव करून दिली.

आपल्या भाषणादरम्यान, डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारताच्या वैज्ञानिक प्रगतीच्या वचनबद्धतेची ग्वाही देणाऱ्या मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या पाच महिन्यांत घेतलेल्या सहा महत्त्वपूर्ण निर्णयांवर प्रकाश टाकला.

आयआयएसएफ 2024 चे एक अद्वितीय वैशिष्ट्य म्हणजे त्याचा "संपूर्ण विज्ञान" दृष्टिकोन, जो सर्व विज्ञान मंत्रालये आणि धोरणकर्त्यांना एकत्र आणतो. हा मॉडेल "संपूर्ण सरकार" धोरणावर आधारित आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार आणि आसाम प्रशासनाने महोत्सव यशस्वी करण्यासाठी एकत्रित काम केले आहे. डॉ. जितेंद्र सिंह यांनी "संपूर्ण राष्ट्र" दृष्टिकोनावर देखील भर दिला, ज्यामध्ये नागरिक, स्टार्टअप्स आणि धोरणकर्ते यांना 2047 पर्यंत वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत भारत घडवण्यासाठी एकत्र आणले जात आहे.

देशभरातून 10,000 हून अधिक विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत. आयआयएसएफ 2024 ने अभूतपूर्व सहभाग अनुभवला आहे, जो तरुणांमध्ये जिज्ञासा आणि वैज्ञानिक शोध घेण्याची संस्कृती निर्माण करण्यासाठी या व्यासपीठाचे महत्त्व अधोरेखित करतो. हा महोत्सव युवकांना शिकण्यासाठी, विज्ञानात रुची निर्माण करण्यासाठी आणि भारताला विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक नेता बनवण्यासाठी प्रेरित करण्याचे कार्य करतो.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) आयआयएसएफ 2024 चे आयोजन करत आहे, ज्यामुळे भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचार करण्याच्या तिच्या वचनबद्धतेला अधोरेखित केले जाते.

आपल्या समारोपाच्या भाषणात, डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारताच्या वैज्ञानिक भविष्यासाठी आशावाद व्यक्त केला. "आपण 2047 कडे वाटचाल करत असताना, आपले तरुण, विशेषतः स्टार्टअप्स, आपल्याला जगाचे नेतृत्व स्विकारण्याकडे नेत असतील," असे त्यांनी सांगितले आणि नवकल्पना, सहकार्य व प्रगती यासाठी राष्ट्राची वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली.

***

N.Chitale/G.Deoda/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2079480) Visitor Counter : 73