माहिती आणि प्रसारण मंत्रालय
प्रसार भारतीच्या वतीने प्रतिष्ठीत डॉ. राजेंद्र प्रसाद स्मृती व्याख्यान 2024 या उपक्रमाअंतर्गत व्याख्यानाचे आयोजन
राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी वैश्विक क्षितीजावर भारताची वाढती भूमिका यावर दिले व्याख्यान
Posted On:
29 NOV 2024 7:33PM by PIB Mumbai
राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी आज आकाशवाणीच्या प्रतिष्ठीत डॉ. राजेंद्र प्रसाद स्मृती व्याख्यान 2024 या उपक्रमाअंतर्गत व्याख्यान दिले. आकाशवाणीच्या रंगभवन सभागृहात या व्याख्यानाचे आयोजन केले होते. वैश्विक क्षितीजावर भारताची वाढती भूमिका हा यंदाच्या व्याख्यानाचा विषय होता.

डॉ. राजेंद्र प्रसाद स्मृती व्याख्यान
डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीचे औचित्य साधून आकाशवाणीच्या दिनदर्शिकीय उपक्रमांअंतर्गत 1969 सालापासून दरवर्षीचा उपक्रम म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद स्मृती व्याख्यान कार्यक्रमांचा अंतर्भाव केला जात आहे. यानिमित्ताने 3 डिसेंबर या डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंती दिनी आकाशवाणीच्या राष्ट्रीय हुक अपवर हे व्याख्यान प्रसारित केले जाते.
या निमित्ताने आज आयोजित केलेल्या व्याख्यानाचे वक्ते असलेल्या राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी आपल्या व्याख्यानात गेल्या दशकभरात भारताने उचललेल्या पुलांचा उल्लेख केला ज्यामुळे जागतिक पटलावर भारताची स्थिती बळकट झाली आहे. उदयोन्मुख जागतिक व्यवस्थेत भारताच्या सर्वांगीण प्रगतीच्या गतीचा, विशेषत: एक सॉफ्ट पॉवर म्हणून भारताचा प्रभाव आणि तो जगभरातील विविध खंडांमध्ये कशा रितीने पसरला आहे याचा उल्लेख त्यांनी केला.

हरिवंश यांनी आपल्या व्याख्यानातून 2047 पर्यंत देश ‘विकसित भारत' होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि, भारत ही वाटचाल भविष्यवेधी दृष्टीकोन बाळगून करत आहे या मुद्यावरही प्रकाश टाकला. सध्याचे जग भारताकडे शांततेचा दूत म्हणून पाहत आहे, आणि आता भारताचा विचार आणि मत केवळ ऐकले जात नाही तर त्याचा अनेक कृती आराखड्यांमध्ये प्रामुख्याने त्याचा अंतर्भाव केला जात असल्याची बाबही त्यांनी आपल्या व्याख्यानात नमूद केली.
वसाहतवादी राज्यकर्त्यांनी जादुटोणा करणाऱ्यांचा आणि सर्पांसोबत जगणाऱ्यांची भूमी अशी भारताची दिशाभूल करणारी प्रतिमा जगासमोर मांडली होती, मात्र आता भारताने ही छबी मागे सोडली आहे, आणि तो जगातली पाचवी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनला आहे, इतकेच नाही तर भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करू लागला असल्याकडे हरिवंश यांनी उपस्थितांचे आवर्जून लक्ष वेधले.

जागतिक पटलावर भारताची प्रतिमा पूर्णपणे बदलण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी कारणीभूत असल्याचे नमूद करून, हरिवंश यांनी त्यांचे कौतुक केले. भारताच्या आर्थिक विकासात झपाट्याने वाढ होत असून ही बाब जागतिक समुदायातील भारताचे स्थान किती महत्वाचे आहे ते ठरवणारी बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
आकाशवाणीने 1969 सालापासून व्याख्यानाची ही मालिका चालवण्यासाठी बजावलेल्या भूमिकेची, या मालिके अंतर्गत आयोजित केलेल्या 50 पेक्षा जास्त व्याख्यानांची, आणि त्यात सहभागी झालेल्या मान्यवर वक्त्यांची हरिवंश यांनी यावेळी प्रशंसा केली. या व्याख्यान मालिकेचा एक भाग होण्याची संधी आपल्याला मिळाल्याचा अभिमान वाटत असल्याची भावनाही हरिवंश यांनी यावेळी बोलून दाखवली.

त्याआधी सभापती हरिवंश यांच्यासह प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीच्या महासंचालक डॉ. प्रज्ञा पालीवाल गौर यांनी यांनी डॉ. राजेंद्र प्रसाद यांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
या व्याख्यानाच्या आधी प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी प्रास्ताविकपर भाषण केले. डॉ. राजेंद्र प्रसाद स्मृती व्याख्यानमालेविषयी त्यांनी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. आपल्या संबोधनातून त्यांनी स्वातंत्र्योत्तर भारतातील डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या योगदानाचाही गौरवपूर्ण उल्लेख केला. प्रसार भारतीचे कार्यक्रम कोणकोणत्या विविध व्यासपीठांवरून रसिक श्रोत्यांना उपलब्ध करून दिले जातात, याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
***
N.Chitale/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2079262)
Visitor Counter : 68