माहिती आणि प्रसारण मंत्रालय
दर्जेदार चित्रपटांना चालना देण्याच्या ग्वाहीसह 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची झाली सांगता
सिनेसृष्टीचे भविष्य साजरे करताना : नेत्रदीपक कार्यक्रमाने 55 व्या इफ्फीची सांगता
'टॉक्सिक' या लिथुआनियन चित्रपटाने इफ्फी 2024 मध्ये सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला
इफ्फी 2024 मध्ये प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते फिलिप नॉय्स यांचा सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्काराने गौरव
‘शांतता आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या क्रॉसिंग’ या चित्रपटाचा प्रतिष्ठित आयसीएफटी-युनेस्को गांधी पदकाने सन्मान
मराठी वेब सिरीज ‘लंपन’ ने पटकावला सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (ओटीटी) पुरस्कार
इफ्फीमध्ये नव्याने सुरु केलेल्या भारतीय चित्रपटासाठी 'पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' पुरस्काराचे मानकरी ठरले ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर
यंदा भारतीय चित्रपटसृष्टीतला उल्लेखनीय चेहरा पुरस्कार अभिनेते विक्रांत मॅसी यांना
इफ्फीने गोव्याला जागतिक पटलावर स्थान मिळवून दिले : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
यंग फिल्ममेकर्स : द फ्युचर इज नाऊ' ही संकल्पना असलेल्या 55 व्या इफ्फीने तरुण चित्रपटकर्त्यांना व्यासपीठ सुनिश्चित केले&
#IFFIWood, 28 November 2024
ज्याप्रमाणे सगळ्याच चांगल्या गोष्टी कधीतरी समाप्त होतात तसाच इफ्फी 2024 चा देखील समारोप झाला . अर्थात चित्रपटांचा आनंद साजरा करणाऱ्या आणि आगामी चित्रपट निर्मात्यांसाठी मार्ग प्रशस्त करणाऱ्या या महोत्सवाने सर्वांवर कायमचा ठसा उमटवला आहे.
एका नव्या सुरुवातीसाठी निरोप घेत , 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) आज दिमाखदार सोहळ्यात सांगता झाली. गोव्यात डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये चित्रपटाची जादू आणि गोष्ट सांगण्याची-पाहण्याची रसिकता साजरी करत, इफ्फी महोत्सवाचा समारोप झाला.
रेड कार्पेटचे क्षण ते उत्तम सादरीकरण आणि उत्कृष्ट कथनापर्यंत सांगता समारंभ सर्वार्थाने भव्य होता. अमीट छाप उमटवणाऱ्या सर्वोत्तम चित्रपटांचा आणि कलाकारांचा सन्मान या सोहळ्यात झाला.
महोत्सवातील समारोप सोहळ्याच्या या स्मृती उपस्थित चित्रपट रसिकांच्या मनात दीर्घकाळ राहतील.
मानवता, शाश्वतता आणि पिढ्यांमधील बंध यांची कहाणी सांगणाऱ्या “ड्राय सीझन” या झेक चित्रपट निर्माते बोहदान स्लामा यांनी दिग्दर्शित केलेल्या बहुप्रतिक्षित चित्रपटाने महोत्सवाची सांगता
चित्रपट रसिकांसाठी या रात्रीचे बहुप्रतिक्षीत क्षण होते ते प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे वितरण, पडद्यावर गोष्ट सादर करण्याची विलक्षण प्रतिभा लाभलेल्या प्रतिभावंतांच्या कौतुकाचे !
'टॉक्सिक' या लिथुआनियन चित्रपटाने इफ्फी 2024 मध्ये सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला
लिथुआनियन चित्रपट टॉक्सिक ने इफ्फीचा सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सर्वात प्रतिष्ठित सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला. ज्युरींनी या चित्रपटाची संवेदनशीलता आणि सहानुभूतीबद्दल प्रशंसा केली, ज्यात वास्तविक आणि सामाजिक पार्श्वभूमीवर बदलत्या काळाचा वेध घेणारे कथानक मांडले आहे. टॉक्सिक हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला."पौगंडावस्थेतील बदलांचा तसेच आर्थिकदृष्ट्या वंचित समाजात मोठे होत जाण्यातील वास्तविकतेचा शोध अत्यंत संवेदनशीलता आणि सहानुभूतीने घेत जाणारी आणि त्याच वेळी बदलत्या काळाचा वेध घेणारी ही कथा वास्तविक आणि सामाजिक परिदृश्याच्या पार्श्वभूमीवर घडते," असे मत ज्युरींनी व्यक्त केले.
रोमानियन दिग्दर्शक बोगदान मुरेसानु यांनी 'द न्यू इयर दॅट नेव्हर केम' साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला
द न्यू इयर दॅट नेव्हर केम या रोमानियन चित्रपटातील उल्लेखनीय कामगिरीसाठी रोमानियन दिग्दर्शक बोगदान मुरेसानू यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्पर्धा श्रेणीतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून त्यांना गौरवण्यात आले.
सर्वोत्कृष्ट अभिनेता(पुरुष) साठीचा रौप्य मयूर पुरस्कार : क्लिमेंट फाव्यू
क्लिमेंट फाव्यू यांनी होली काऊ या फ्रेंच चित्रपटातील बारकावे असलेल्या गुंगवून टाकणाऱ्या व्यक्तिरेखेतील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता(पुरुष) हा पुरस्कार मिळवला. त्यांच्या पात्राला अस्सलता आणि खोली देण्याची त्यांची उल्लेखनीय क्षमता दर्शवणारा त्यांचा अभिनय परीक्षकांच्या मनाला भावला. “निरागसतेकडून परिपक्वतेच्या दिशेने होणाऱ्या प्रवासातील भावनिक चढ-उतार अचूकपणे व्यक्त करणाऱ्या अविश्वसनीय वाटणाऱ्या नैसर्गिक अभिनयासाठी” क्लिमेंट फाव्यू यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता(पुरुष) हा पुरस्कार देण्यात आला असे परीक्षकांनी सांगितले.
सर्वोत्कृष्ट अभिनेता(स्त्री) साठीचा रौप्य मयूर पुरस्कार : व्हेस्टा मॅटलाईट आणि लेवा रुपीकायटे
व्हेस्टा मॅटलाईट आणि लेवा रुपीकायटे या दोघींना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. “मरीजा आणि क्रिस्टीना ही अविस्मरणीय पात्रे रंगवण्यासाठी स्वतःच्या शारीरिक तसेच भावनिक मर्यादेची परीक्षा पाहणाऱ्या व्हेस्टा मॅटलाईट आणि लेवा रुपीकायटे या अभिनेत्रींच्या पदार्पणातील असामान्य अभिनयासाठी” परीक्षकांनी उद्धृत केले.
विशेष परीक्षक पारितोषिकासाठीचा रौप्य मयूर पुरस्कार : लुईस कोउवीसीएर
फ्रेंच दिग्दर्शक लुईस कोउवीसीएर यांना त्यांच्या पदार्पणातील होली काऊ या चित्रपटासाठी विशेष परीक्षक पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.पौगंडावस्थेतून प्रौढावस्थेच्या दिशेने होणाऱ्या स्थित्यंतराच्या सार्वत्रिक संकल्पनेसाठी परीक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले. “जेव्हा एक आनंदी किशोरवयीन तरुण अचानक प्रौढावस्थेत प्रवेश करतो आणि त्याला पुढे पाऊल टाकून स्वतःच्या जीवनावर ताबा मिळवावा लागतो त्या परिस्थितीची सार्वत्रिक कथा पदार्पणात सादर केल्याबद्दल,” असे मत परीक्षकांनी व्यक्त केले.
दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार : सारा फ्रिडलँड
अमेरिकी दिग्दर्शिका सारा फ्रिडलँड यांना त्यांच्या 'फॅमिलियर टच' या चित्रपटासाठी दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात आले. हा पुरस्कार जागतिक स्तरावरील चित्रपटातल्या नव्या आश्वासक प्रतिभेकडे लक्ष वेधतो. सारा फ्रिडलँड यांना रौप्य मयूर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नवज्योत बांदिवडेकर यांनी ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटासाठी भारतीय चित्रपटासाठीचा 'पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' पुरस्कार पटकावला
भारतीय सिनेमाच्या उत्क्रांतीत युवा प्रतिभावंतांच्या योगदानाची दखल घेत देशभरात चित्रपट निर्मिती करणाऱ्या युवा प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने यंदाच्या इफ्फी आवृत्तीसाठी भारतीय चित्रपटासाठीचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार नव्याने सुरू केला आहे. “बांदिवडेकरांनी कौटुंबिक बंधांची गुंतागुंत मोठ्या खुबीने टिपली आहे. उत्कट भावनिक नादमयता कायम राखताना कौटुंबिक जीवनातील बारकावे उत्तमरीत्या अधोरेखित केले आहेत, त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात चित्रपटाची भट्टी उत्तम जमली आहे,” अशा शब्दांत ज्युरींनी त्यांचे कौतुक केले.
स्वीडिश निर्माता लेवन अकीन यांच्या ‘क्रॉसिंग’ या चित्रपटाचा प्रतिष्ठित आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक देऊन गौरव
गोवा येथे आयोजित 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्वीडिश निर्माता लेवन अकीन यांच्या ‘क्रॉसिंग’ या चित्रपटाने प्रतिष्ठित आयसीएफटी-युनेस्को गांधी पदकावर नाव कोरले. ‘क्रॉसिंग’ चित्रपटातील जबरदस्त चित्रपटीय गुणधर्म आणि त्यात दाखवलेला लिंग समानता तसेच सामाजिक अंतर्दृष्टी या तत्वांचा विचारप्रवर्तक शोध याबद्दल परीक्षकांनी सदर पुरस्कारासाठी या चित्रपटाची निवड केली. “प्रेम आणि अंतर्दृष्टी यांची कथा सांगणारा अप्रतिम चित्रपट” अशा शब्दात परीक्षकांनी या चित्रपटाचा गौरव केला आहे.
ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते फिलिप नॉय्स यांचा सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
गोव्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप समारंभात आज ऑस्ट्रेलियातील दिग्गज चित्रपट निर्माते फिलिप नॉय्स यांचा त्यांच्या उल्लेखनीय आणि प्रतिभाशाली सिनेमॅटिक वाटचालीबद्दल सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
महान चित्रपट निर्माते सत्यजीत रे यांचे स्मरण करताना नॉय्स यांनी सांगितले, “ ऑस्ट्रेलियात लहानाचे मोठे होत असताना आम्ही सर्वजण सत्यजीत रे यांच्या कामामुळे प्रेरित झालो.त्यांच्या दृष्टीकोनाचा वापर मी माझ्या कामात, विशेषतः भूमिकेसाठी कलाकार निवडताना केला आहे. रे यांच्याप्रमाणेच ज्यावेळी मला माझ्या चित्रपटांसाठी अस्सल ऑस्ट्रेलियन कलाकार सापडत नसायचे, त्यावेळी मी त्या भूमिकांमध्ये चपखल बसतील अशा प्रकारे सर्वसामान्य लोकांना त्या भूमिकांसाठी निवडायचो.”
मराठी वेब सिरीज ‘लंपन’ला इफ्फी 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (ओटीटी) पुरस्कार
मराठी वेब सिरीज ‘लंपन’ ला 55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (ओटीटी) पुरस्कार मिळाला आहे. उल्लेखनीय कथाकथन, उच्च निर्मिती मूल्ये आणि अपवादात्मक कामगिरी यासाठी या वेब सिरिजला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
अभिनेता विक्रांत मॅसी भारतीय चित्रपटसृष्टीतला उल्लेखनीय चेहरा पुरस्काराने सन्मानित
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, यांच्या हस्ते अभिनेता विक्रांत मॅसी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतला उल्लेखनीय चेहरा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ''माझ्यासाठी हा क्षण खरोखरच खास आहे; हा पुरस्कार मिळेल याची कल्पनाही केली नव्हती. जीवनात चढ-उतार असतात मात्र '12वी फेल' या चित्रपटातील माझ्या पात्राप्रमाणे आपण पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी सज्ज असायला हवे,'' असे विक्रांत मॅसी यांनी सांगितले. ''मुळात मी कथा सांगणारा आहे. सामान्य लोकांचा आवाज बनू शकतील अशा संहिता मी निवडतो''
मॅसी यांनी ठामपणे सांगितले, ''स्वतंत्रपणे विचार करा, आपल्या कथा निवडा, तुम्ही जिथून आला आहात, ती मुळे लक्षात ठेवा. भारतीय चित्रपट उद्योग हे एक भव्य क्षेत्र आहे.
विशेष सन्मान
यंदाच्या इफ्फिमध्ये प्रतिष्ठित भारतीय दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि प्रसिद्ध अभिनेत्री जया प्रदा यांचा त्यांच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
या समारंभात इफ्फीच्या तांत्रिक भागीदारांना आणि सहयोगकर्त्यांना ही आवृत्ती यशस्वी करण्यात त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल आदरांजली वाहण्यात आली. ईएसजीच्या उपाध्यक्षा डेलिलाह लोबो, गोव्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कांदेवेलू आणि क्यूब सिनेमा, बारको, पल्स इलेक्ट्रॉनिक्स आणि एसएमपीटीई यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांच्या प्रतिनिधींचा सत्कार केला.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि NFDCच्या प्रयत्नांचे कौतुक करताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, “फिल्म बाजार सारख्या अनेक नवीन उपक्रमांच्या दृष्टीने हा इफ्फी अद्वितीय आहे, जे अशा क्रांतिकारी रीतीने सादर केले गेले की प्रत्येकाला फिल्म बाजाराचा फायदा होतो. यावेळी, आम्ही चित्रपट रसिकांसाठी चित्रपटांचा आनंद घेण्यासाठी गोवा शहरात चित्रपट प्रदर्शित केले आणि यावर्षी 195हून अधिक चित्रपट प्रदर्शित करण्यात आले.
यंदाच्या वर्षी गोव्याची संस्कृतीचे प्रतिबिंब इफ्फीच्या परेडमध्ये दर्शवण्यात आले, ज्याला जगभरातील सर्व प्रतिनिधी आणि सहभागींकडून प्रचंड प्रेम आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाला, याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. आता, पर्यटक विशेषत: गोव्यातील इफ्फीमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांचे कॅलेंडर चिन्हांकित करतात जे आपल्या पर्यटनाला जागतिक स्तरावर घेऊन जात आहे. इफ्फीने आपली पोहोच जागतिक स्तरावर नेली असून IFFIला उपस्थित राहिल्यानंतर अनेक चित्रपट निर्माते गोव्यात चित्रीकरणासाठी यायला लागले आहेत, म्हणूनच मी परदेशी चित्रपट निर्मात्यांना गोवा राज्यात चित्रीकरणासाठी आमंत्रित करतो आणि मी आश्वासन देतो की सर्व चित्रपट निर्मात्यांना चित्रपटाच्या शूटिंगसाठी सिंगल विंडो क्लिअरन्स प्रदान केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू म्हणाले की, “या वर्षीच्या इफ्फीचे वर्णन करणारा एक शब्द म्हणजे जिवंतपणा, जो यापूर्वी कधीही दिसला नाही. कारण, आमचे माननीय पंतप्रधान नेहमी आमच्या तरुण निर्मात्यांबद्दल आणि सामग्रीचा पुढील निर्यातदार म्हणून भारताबद्दल बोलतात. आम्ही या वर्षीचा इफ्फी सर्व तरुण निर्मात्यांना, क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारोच्या नवोदित प्रतिभांना आणि देशभरातून येणाऱ्या कथाकारांना समर्पित करतो. हा इफ्फी गुणात्मक आणि परिमाणात्मकदृष्ट्या आतापर्यंतचा सर्वोत्तम ठरला आहे. मी गोवा आणि आपल्या देशातील लोकांचे, सर्व कलाकारांचे आणि कलाकारांचे आभार मानतो, ज्यांनी हे शक्य केले.”
महोत्सवाच्या अनेक पैलूंबद्दल, विशेषत: भारतीय चित्रपट आणि फिल्म बाजारच्या आयकॉन्सच्या शतकपूर्ती सोहळ्यांबद्दल बोलताना, जाजू पुढे म्हणाले की, “इफ्फी हा चित्रपट उद्योग जगतासाठी एक उत्सव मानला जातो. शेखर कपूर हे यंदाच्या महोत्सवाचे संचालक असताना हा खरोखरच एक उत्सव म्हणून साजरा झाला."
"संख्या आणि आकाराच्या दृष्टीने फिल्म बाजार या वर्षी जगातील सर्वात मोठा ठरला आहे. येथील चित्रपटांची संभाव्य विक्री आणि खरेदी यांची क्षमता पाहता भविष्य येथेच आहे. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी मी जगभरातून येणाऱ्या लोकांचे आभार मानतो,” असे जाजू म्हणाले.
गोवा ही खऱ्या अर्थाने देशाची मनोरंजनाची राजधानी असल्याचे सांगून सचिव महोदयांनी गोवा सरकारच्या पाठिंब्याबद्दल आणि सहकार्याबद्दल आभार मानले.
समारंभात उपस्थितांना संबोधित करताना, महोत्सवाचे संचालक शेखर कपूर यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले. “आम्ही नुकताच जगातील सर्वात मोठा चित्रपट महोत्सव सादर केला आहे. फिल्म बाजार, मास्टरक्लासेस इत्यादी उपक्रमांनी हा महोत्सव भव्यदिव्य बनवला आहे,” अशा शब्दांत कपूर यांनी महोत्सवाचे कौतुक केले. तसेच त्यांनी या महोत्सवात जल्लोषात सहभाग घेतल्याबद्दल गोव्यातील जनतेचेही आभार मानले.
आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातील परीक्षक समितीचे अध्यक्ष आशुतोष गोवारीकर हे सिनेमाची ताकद सांगताना म्हणाले की “स्पर्धेसाठी निवडलेले सर्व चित्रपट दर्जेदार होते. एक उत्तम चित्रपट आपल्याला केवळ कथा सांगत नाही, तर तो आपल्याला बदलतो. सर्व तरुण चित्रपट निर्मात्यांना, तुमच्या आतला प्रकाश अधिक तेजस्वी होऊ द्या, जेणेकरून एक दिवस तुमची दृष्टी जगाला दिसेल."
55 व्या IFFI मध्ये आपला अनुभव सांगताना गोवारीकर म्हणाले, “येथील प्रत्येक चित्रपट जिवंत होता. या चित्रपटांनी कलेबद्दलची अथक बांधिलकी प्रकट केली. पुरस्कार विजेत्या चित्रपटांनी आपले वेगळेपण दाखवून दिले.”
समीर कोचर यांनी सूत्रसंचालन केलेल्या समारंभात चित्रपट उद्योगातील दिग्गज, सरकारी अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय पाहुण्यांसह प्रेक्षकांची तुफान गर्दी होती. औपचारिक स्वागत व राष्ट्रगीत यांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर कलाकारांच्या आकर्षक सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत वाढवली.
या वर्षीच्या इफ्फीमध्ये दाखवण्यात आलेल्या कलात्मक आणि सांस्कृतिक विविधतेचा उत्सव साजरा करणाऱ्या ऑडिओ-व्हिज्युअल मॉन्टेजमध्ये फेस्टिव्हलच्या सर्वोत्तम क्षणांचा भावनिक प्रवास सादर करण्यात आला. मामे खान, निकिता गांधी आणि दिग्विजय सिंग परियार यांच्या शो-स्टॉपिंग परफॉर्मन्सने आणि गायक अमाल मलिकच्या मनाला स्तिमित करणारे संगीत सादरीकरण करून प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन केले.
अखेरच्या टप्प्यात अभिनेत्री आणि नृत्यांगना श्रिया सरनच्या “रिदम्स ऑफ इंडिया” या भारतीय शास्त्रीय आणि लोकपरंपरेची समृद्धता दर्शविणाऱ्या सादरीकरणामध्ये प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
अखेरीस, 55 व्या IFFI चा समारोप जवळ आला, तसतसे गेल्या 55 वर्षांच्या सिनेमॅटिक यशाचा, अर्थपूर्ण संवादाचा आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचा वारसा ठेवला. या वर्षीच्या महोत्सवाने केवळ चित्रपट निर्मितीची कलाच साजरी केली नाही तर जीवनाला प्रेरणा देण्यासाठी, जोडण्यासाठी आणि बदलण्यासाठी सिनेमाची शक्ती अधोरेखित केली.
***
PIB IFFI CAST AND CREW | Sonal/Harshral/Nilima/Sonali/Sanjana/Sushama/Parshuram
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2078813)
Visitor Counter : 16