माहिती आणि प्रसारण मंत्रालय
अचूकतेचा ध्यास – 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उलगडला दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचा प्रवास
कृत्रिम बुद्धीमत्ता केवळ निर्माणकौशल्य वाढवू शकते, मानवी कल्पनाशक्तीला पर्याय ठरू शकत नाही. योग्य निर्णय घेण्यासाठी आपल्या बुद्धीचा उपयोग करणे अत्यंत महत्त्वाचे – रमेश सिप्पी
प्रत्येक अनुभव खूप मोलाची शिकवण देतो. अपयशातूनच आपण शिकत जातो आणि भविष्यासाठी स्वतःत सुधारणा घडवतो – रमेश सिप्पी
#IFFIWood, 28 नोव्हेंबर 2024
55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) ‘अचूकतेचा ध्यास – रमेश सिप्पी यांचे विचार’ या नावाचे मनाचा ठाव घेणारे सत्र झाले. भारतीय चित्रपटसृष्टीतल्या अत्यंत आदरणीय दिग्दर्शकाचे जीवन आणि कलाप्रवास यांचा समृद्ध करणारा अनुभव यातून प्रेक्षकांना मिळाला. या सत्रात ‘मिडीया अँड एंटरटेनमेंट स्किल्स कौन्सिल’ या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहीत सोनी यांनी रमेश सिप्पी यांच्याशी संवाद साधला.
रमेश सिप्पी यांच्या चित्रपट निर्मिती क्षेत्रातील सुरुवातीच्या काळाची काही क्षणचित्रे
सत्राच्या सुरुवातीलाच मोहीत सोनी म्हणाले की, ही मुलाखत म्हणजे रमेश सिप्पी यांच्या प्रदीर्घ अनुभवातून शिकण्याची व अचूकतेची त्यांची व्याख्या समजून घेण्याची ही एक मोठी संधी आहे.
मुलाखतीत प्रारंभी रमेश सिप्पी यांनी चित्रपट सृष्टीतल्या सुरुवातीच्या काळातील तसेच पदार्पणातला चित्रपट ‘शहेनशहा’विषयीच्या आपल्या आठवणी सांगितल्या. सिप्पी म्हणाले की, केवळ नऊ वर्षांचा असताना माझी चित्रपटाच्या सेटशी पहिली ओळख झाली. कोणत्याही चित्रपटनिर्मिती शिकवणाऱ्या संस्थेत जाण्याच्या खूप आधीच, इथूनच, माझ्या चित्रपट क्षेत्रातल्या प्रवासाला सुरुवात झाली.
सतत शिकत राहण्याचा अनुभव – ‘अंदाज ते शोले’
‘अंदाज' ते 'सीता और गीता’ या आपल्या कारकिर्दीतल्या महत्त्वाच्या टप्प्यांविषयी बोलताना सिप्पी यांनी चित्रपट जगतात सतत शिकत राहण्याचे महत्त्व समजावून सांगितले. ते म्हणाले, शिकणे कधीही संपत नाही. चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी असलेले कलाकार ते कर्मचारी अशा आपल्या सगळ्या सहकाऱ्यांसह आपण नेहमीच शंभर टक्के चांगला प्रयत्न करतो. शोलेच्या आठवणी सांगताना त्यांनी चित्रपटातले निर्णायक दृश्य चित्रित करताना घडलेला एक रंजक किस्सा सांगितला. सुरुवातीच्या काही अडथळ्यांनंतर ढगाळ वातावरणात चित्रीकरण करुनही शेवटी त्या दृश्यासाठी आवश्यक नेमका भावनिक परिणाम कसा साधला याविषयी सिप्पी बोलले. शोलेमधील एक दृश्य चित्रीत करण्यासाठी तब्बल २३ दिवस लागले असे सांगून, प्रत्येक चित्रचौकटीत नेमकेपणा असण्याबाबत आपण कसे आग्रही होतो हे त्यांनी सांगितले.
आधुनिक चित्रपट सृष्टीतली तंत्रज्ञानाची भूमिका
आधुनिक तंत्रज्ञानामुळे चित्रपट निर्मितीत कसे बदल घडत गेले याविषयीही रमेश सिप्पी बोलले. स्पेशल इफेक्टसचा शोध आणि कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे चित्रपटनिर्मितीला होणारा फायदा याविषयी सांगतानाच तंत्रज्ञान सर्जनशीलतेला पूरक असावे, त्याला पर्याय ठरू नये असे मत त्यांनी व्यक्त केले. कृत्रिम बुद्धीमत्ता कधीही मानवी बुद्धीची जागा घेऊ शकत नाही. ती सर्जनशीलतेला केवळ सहायक असू शकते. योग्य निर्णय घेण्यासाठी आपल्या बुद्धीचाच वापर करणे गरजेचे आहे, सिप्पी यांनी स्पष्ट केले.
कथाकथनाची कला व प्रेरणा
तुमच्या कथा मोठ्या पडद्यावर जिवंत करण्यासाठी तुम्ही काय करता असे विचारल्यावर सिप्पी म्हणाले, सगळ्यांचे एकत्रितपणे काम करणे व सहकार्याची भावना हेच माझ्या चित्रपटांच्या यशाचे गुपित आहे. सर्व सहकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे अचूकता साध्य करण्यात मदत मिळते.
चुका स्वीकारुन सतत सुधारणा करणे
या सत्राच्या अंतीम चरणात रमेश सिप्पी यांनी चित्रपटनिर्मितीतल्या स्वविकास प्रक्रियेचे महत्त्व सांगितले. चुका करणे चांगलेच आहे, प्रत्येक अनुभव आपल्याला मोलाची शिकवण देतो. अपयशातून शिकूनच आपण भविष्यात त्या चुका सुधारतो, ते म्हणाले.
या सत्राची सांगता उपस्थितांना प्रेरणा देणारी होती. सतत बदल घडत राहणाऱ्या या चित्रपट जगतात शिकणे, बदल स्वीकारणे व सतत अचूकतेचा ध्यास यांचे किती महत्त्व आहे, हे सिप्पी यांनी पुन्हा विशद केले.
* * *
PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Surekha/Darshana | IFFI 55
(Release ID: 2078663)
Visitor Counter : 11