माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner

55 व्या ‘इफ्फी’ मध्ये ‘तपन सिन्हा – सेंटेनरी सेशन -द स्पेक्ट्रम अँड द सोल’ या विषयावर समूह चर्चेच्या माध्‍यमातून दिग्गजांच्या योगदानावर आणि जीवनावर टाकला प्रकाश


"तपन सिन्‍हा मितभाषी आणि खूप चांगले श्रोता होते" शर्मिला टागोर

"तपन सिन्हा यांच्या कार्याचे योग्य मूल्यमापन केले न जाणे, हे समीक्षकांचे पूर्ण अपयश आहे:" प्रा. एन. मनु चक्रवर्ती

#IFFIWood, 27 नोव्‍हेंबर 2024

 

प्रसिद्ध चित्रपट निर्माते तपन सिन्हा यांच्या जीवन आणि कार्याच्या शताब्दी सोहळ्याचा एक भाग म्हणून आज सकाळी पणजी इथल्या गोवा कला अकादमीमध्‍ये  55 व्या इफ्फी मध्ये "तपन सिन्हा – सेंटेनरी सेशन -द स्पेक्ट्रम अँड द सोल" या विषयावर समूह चर्चा आयोजित करण्यात आली होती.

ज्येष्ठ अभिनेत्या शर्मिला टागोर यांनी  तपन  सिन्हा यांच्यातील  मानवी वैशिष्ट्ये अधोरेखित केली. "ते मितभाषी होते  आणि खूप चांगले  श्रोता होते ," असे शर्मिला टागोर  म्हणाल्या . त्यांनी  पुढे सांगितले की, “असे लोक आहेत ज्यांच्याकडे बोलण्यासारखे काहीही नसते,  म्हणूनच ते शांत राहतात.मात्र  तपन बाबूंकडे  सांगण्‍यासारख्‍या  अनेक गोष्टी होत्या, तरीही त्यांना बोलण्‍याची  गरज वाटत नव्हती. तपन सिन्हा यांच्या लेखनावर  रवींद्रनाथ टागोरांचा किती खोल प्रभाव होता, यावरही शर्मिला टागोर  यांनी सविस्तर चर्चा केली.

‘जातुगृह’, ‘क्षुधिता पाषाण’, ‘अटंका’ आणि ‘एक डॉक्टर की मौत’ या शीर्षकांचे  संदर्भ देऊन, प्रा. एन. मनू चक्रवर्ती यांनी  तपन सिन्हा यांना सामाजिक वास्तवाची कथा  गुंफण्यासाठी आणि व्यक्त करण्यासाठी दाखवलेल्या अतुलनीय समर्पणाचे वर्णन केले. प्रा. चक्रवर्ती यांनी असेही नमूद केले की,  तपन सिन्हा स्वतःचे  ‘एक वचनबद्ध मानवतावादी’  म्हणून वर्णन करायचे आणि त्यांचे सर्व चित्रपट त्याच विचारधारेभोवती फिरताना दिसतात.

तपन सिन्हा यांच्या कार्याचे सत्यजित रे, ऋत्विक घटक किंवा मृणाल सेन यांसारख्या समकालीन लोकांप्रमाणे मूल्यमापन का झाले नाही,  या प्रश्नावर विचार करताना, प्रा. चक्रवर्ती यांनी  स्पष्ट केले की, तपन सिन्हा यांच्या कार्याचे त्यांच्या हयातीत मूल्यमापन केले न जाणे,  हे समीक्षकांचे पूर्ण अपयश आहे, असा  त्यांनी निष्कर्ष काढला आहे. तपन सिन्‍हा यांचे  "सगिना महातो' आणि 'अटंका' सारख्या चित्रपटांनी जे गहन बौद्धिक परिमाण टिपले आहेत, ते कालातीत आहेत."

या समूह चर्चेतील आणखी एक  सदस्य आणि  तपन सिन्हा  यांच्या पाच सिनेमांमध्ये  काम करणारे अभिनेते, अर्जुन चक्रवर्ती   यांनी "निर्जन सैकाते" या चित्रपटाच्‍या  कथेचे   मोठ्या आवडीने स्‍मरण केले. पटकथा  पाहिल्यानंतर  चक्रवर्ती यांनी अविश्वासाने तपन  सिन्हा यांना विचारले की, अशी कथा ते निर्मात्याला कसे सांगतील?  यावर तपन  सिन्हा यांचे साधे पण उल्लेखनीय उत्तर होते, "मला निर्मात्यांकडे जाण्याची गरज नाही, ते माझ्याकडे येतात."

या एका  तासासाठी  आयोजित केलेल्या  चर्चासत्राची वेळ  जवळजवळ अर्ध्या तासाने वाढवण्यात आली . शर्मिला टागोर,  अर्जुन चक्रवर्ती यांचे संभाषण आणि प्रा. मनु चक्रवर्ती यांचे विवेचन आणि मूल्यमापन यांनी ही चर्चा रंगली. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन  रत्नोत्तोमा सेनगुप्ता यांनी केले.

55 व्या ‘इफ्फी’चे महोत्सव संचालक शेखर कपूर, यांनी मान्यवरांचा सत्कार केला आणि चार दिग्गजांच्या शताब्दी उत्सवानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेले विशेष तिकीट आणि  स्मृतीचिन्ह प्रदान केले.

शताब्दी सोहळ्यातील इतर उपक्रमांविषयी  माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करावे: https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=207082

 

* * *

PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Suvarna/Darshana | IFFI 55

iffi reel

(Release ID: 2078416) Visitor Counter : 26