माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इफ्फी मधील आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक मिळवणारे आम्ही शांतीचे दूत आहोत: मनोज मोहन कदम, 2017 मधील गांधी पदक पुरस्काराने सन्मानित
“युवा चित्रपट निर्मात्यांच्या प्रतिभेला जोपासण्यासाठी इफ्फीने अनेक स्तुत्य उपक्रम हाती घेतले आहेत”: मनोज मोहन कदम
गांधीवादी तत्त्वांना चित्रपटांद्वारे मानवंदना, इफ्फीमध्ये प्रतिष्ठित आयसीएफटी-युनेस्को गांधी पदकासाठी 10 चित्रपटांमध्ये स्पर्धा
चित्रपटांद्वारे शांतता आणि अहिंसेचा उत्सव : 55 व्या इफ्फीमध्ये आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक उद्या प्रदान केले जाईल
इफ्फीमध्ये आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक ज्युरींची पत्रकारांशी भेट
#IFFIWood, 27 नोव्हेंबर 2024
सिनेमॅटिक उत्कृष्टता आणि गांधीवादी मूल्यांचा सन्मान करण्याची परंपरा पुढे चालू ठेवत, 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक प्रदान केले जाणार आहे. शांतता, सहिष्णुता आणि अहिंसेचा उत्सव साजरा करणारा, हा प्रतिष्ठित पुरस्कार युनेस्को आणि इंटरनॅशनल कौन्सिल फॉर फिल्म, टेलिव्हिजन आणि ऑडिओ-व्हिज्युअल कम्युनिकेशन (आयसीएफटी) यांच्यातील सहयोगाने देण्यात येत आहे. आयसीएफटी -युनेस्को गांधी पदकासाठीच्या ज्युरी आणि प्रतिनिधींनी आज गोव्यात पत्रकारांशी संवाद साधला.
2015 मध्ये स्थापित, आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक हे महात्मा गांधींची तत्वे प्रतिबिंबित करणाऱ्या चित्रपटांसाठी मोठा सन्मान आहे. यावर्षी, शांतता, सामाजिक सलोखा आणि सहिष्णुता या विषयांसह प्रेक्षकांना, विशेषत: तरुणांना प्रेरित आणि सहभागी करण्याच्या त्यांच्या सामर्थ्यासाठी विविध भाषा, शैली आणि संस्कृतींमधील 10 उत्कृष्ट चित्रपट स्पर्धेसाठी निवडण्यात आले आहेत.
पुरस्कार निवड प्रक्रियेवर खालील सदस्यांचा समावेश असलेल्या सन्माननीय ज्युरींच्या पॅनेलद्वारे देखरेख ठेवली जात आहे:
- इसाबेल डॅनेल, FIPRESCI- इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्सचे मानद अध्यक्ष,
- सर्ज मिशेल, सीआयसीटी-आयसीएफटीचे उपाध्यक्ष,
- मारिया क्रिस्टिना इग्लेसियस, युनेस्कोच्या सांस्कृतिक क्षेत्र कार्यक्रमाच्या माजी प्रमुख,
- डॉ. अहमद बेडजौई, अल्जियर्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कलात्मक संचालक ,
- युयुआन हुन, संचालक, प्लॅटफॉर्म फॉर क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन,सीआयसीटी-आयसीएफटी युवा शाखा.
ज्युरी पॅनेलने चित्रपटांची नैतिक मूल्ये , कलात्मक उत्कृष्टता आणि आंतर-सांस्कृतिक संवाद वाढवण्याची क्षमता याच्या आधारे मूल्यमापन केले आहे. उद्या महोत्सवाच्या समारोप समारंभात विजेत्याचे नाव जाहीर केले जाईल.
पुरस्काराच्या महत्त्वाविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना, एनएफडीसीचे कलात्मक संचालक पंकज सक्सेना म्हणाले, “हे पदक इफ्फीच्या मूलभूत मूल्यांचे प्रतिनिधित्व करते. आजच्या जगात, आंतरसांस्कृतिक संवादाची नितांत गरज आहे. सामंजस्य , सहिष्णुता आणि प्रेम या मूल्याना चालना देत विविध संस्कृतींना एकत्र आणण्याची ताकद सिनेमात आहे. म्हणूनच या भागीदारीचा 10वा वर्धापन दिन साजरा करताना आम्हाला अभिमान वाटतो.”
परीक्षक सदस्य श्वेवेन हुन यांनी 2015 पासून आतापर्यंत वाढत गेलेल्या सहयोगावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, “दर वर्षी आम्ही युनेस्कोची तत्वे तसेच शांतता आणि अहिंसेची गांधीजींची तत्वे यांच्याशी जुळणाऱ्या चित्रपटांची निवड करतो. यावर्षी,क्रॉसिंग, फॉर राना, लेसन लर्न्ड, मिटिंग विथ पोल पॉट, सतु -इयर ऑफ रॅबिट, ट्रान्समाझोनिया, अनसिंकेबल, आमार बॉस, जुईफूल आणि श्रीकांत यासारख्या असामान्य चित्रपटांची यासाठी निवड झाली. या चित्रपटांच्या कथांमधील वैविध्य अत्यंत प्रेरणादायक आहे.”
कार्यशाळा आणि जागतिक पातळीवर कामाचे प्रदर्शन करण्याच्या संधी यांच्यासह तरुण चित्रपट निर्मात्यांना सक्षम करण्याचा युनेस्कोचा दृष्टीकोन सामायिक करत चित्रपटांच्या माध्यमातून तरुणांना सहभागी करून घेण्याचे महत्त्व देखील त्यांनी अधोरेखित केले.
अ होरायझन - (क्षितीज)या चित्रपटासाठी 2017 मध्ये गांधी पदकाने सन्मानित करण्यात आलेले मनोज मोहन कदम म्हणाले, “तरुण चित्रपट निर्मात्यांच्या कलेला खतपाणी घालण्यासाठी इफ्फीने अनेक स्तुत्य उपक्रम हाती घेतले आहेत. तरुण चित्रपट निर्मात्यांना सामाजिक मूल्ये दर्शवणारे आशयाधारित चित्रपट तयार करताना पाहून मनाला आनंद होतो.”
गांधी पदकावर कोरलेल्या “अंधाराच्या साम्राज्यात, प्रकाशाचा विजय होतो” या वाक्याप्रमाणेच या विभागातील सर्वच चित्रपट आशा, शांतता आणि सामाजिक एकतानतेचा प्रकाशकिरण पसरवतात असे देखील एका प्रश्नाच्या उत्तरात, मनोज कदम यांनी सांगितले.
युनेस्कोचे महासंचालक ऑड्रे अझोले यांनी देखील शांती तसेच शाश्वत विकासाच्या जोपासनेतील चित्रपटांच्या भूमिकेला पाठींबा दिला आहे आणि आगामी भविष्यात जागतिक शांततेला प्रेरित करणाऱ्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी आयसीएफटी विविध उपक्रम हाती घेत आहे अशी माहिती देखील श्वेवेन हुन यांनी यावेळी दिली.
आजच्या जगात महात्मा गांधींच्या चिरस्थायी वारशाचा गौरव करत आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक शांतता आणि सुसंवादासाठीच्या उत्प्रेरकाच्या रुपात चित्रपटांच्या सामर्थ्याचे उदाहरण ठरत आहे.
अधिक माहितीसाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करा: : https://pib.gov.in/PressReleseDetailm.aspx?PRID=2072716®=1&lang=1
पत्रकार परिषद पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा:
* * *
PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Sushma/Sanjana/Darshana | IFFI 55
(Release ID: 2078188)
Visitor Counter : 7