माहिती आणि प्रसारण मंत्रालय
निर्मात्याने उत्कट आणि व्यावहारिक असायला हवे : 55 व्या इफ्फी मास्टरक्लासमध्ये ब्रिटिश चित्रपटकर्ते स्टीफन वूली यांचे मार्गदर्शन
निर्मात्याची भूमिका प्रामुख्याने सहयोगकर्त्याची : स्टीफन वूली
निर्मात्याने वर्चस्व गाजवण्याऐवजी हर प्रकारे सहयोगी व्हावे : स्टीफन वूली
#IFFIWood, 26 नोव्हेंबर 2024
गोव्यात सुरू असलेल्या 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) प्रसिद्ध ब्रिटिश चित्रपटकर्ते आणि अभिनेते स्टीफन वूली यांनी आज ''हू इज अ फिल्म प्रोड्यूसर?- फाईव्ह इम्पॉर्टन्ट स्टेजेस ऑफ फिल्म प्रॉडक्शन ''या विषयावरच्या मास्टरक्लासला संबोधित केले.
आकांक्षी चित्रपटकर्ते, विद्यार्थी आणि चित्रपट रसिक या सत्राला उपस्थित होते. चित्रपट निर्मात्यांची बहुआयामी भूमिका, चित्रपट निर्मितीतले पाच मूलभूत टप्पे :विकास, निर्मितीपूर्व, निर्मिती, निर्मिती उत्तर आणि मार्केटिंग व प्रकाशित होणे, याविषयीचा सविस्तर उहापोह या सत्रात ऐकायला मिळाला.
एखाद्या संकल्पनेविषयी किंवा कथेविषयी आत्यंतिक उत्कटता जागृत होण्यापासून निर्मात्याचा प्रवास सुरू होतो, यावर स्टीफन यांनी मास्टरक्लासच्या सुरुवातीलाच भर दिला. ''निर्मात्याला प्रथम स्वतःला त्या प्रोजेक्टविषयी पराकोटीची उत्कटता वाटायला हवी, बारकाव्यांबाबत निर्माता स्वतः आग्रही असायला हवा.'' असे त्यांनी स्पष्ट केले. ''हे असे काही आहे का की तेच माझे जीवन ठरेल?'' असा प्रश्न निर्मात्याने स्वतःला विचारावा, असे ते म्हणाले. उत्कटता आणि बांधिलकी महत्त्वाची मानतानाच निर्मात्याने व्यावहारिक असायला हवे. ध्येय आणि व्यावहारिक मर्यादा यात संतुलन त्याला साधता यायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
निर्मितीपूर्व टप्प्यातील चर्चेत स्टीफन यांनी सहयोगाचे महत्त्व अधोरेखित केले. ''निर्माता हा प्रामुख्याने सहयोगकर्ता असतो.'' असे सांगून प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी वित्तपुरवठादार, सर्जनशील व्यावसायिक आणि इतर संबधितांसोबत सातत्याने काम करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
निर्मितीच्या टप्प्यासाठी काळजीपूर्वक नियोजन आणि अंमलबजावणी यांचे महत्त्व स्टीफन यांनी विशद केले. निर्माता आणि दिग्दर्शक यांच्यातल्या नाजूक समन्वयाविषयी त्यांनी सांगितले. निर्मात्याने नेहमीच त्यांचा अहंकार नियंत्रणात ठेवला पाहिजे आणि दिग्दर्शकाला सर्जनशील अवकाश प्रदान केला पाहिजे" या महत्त्वपूर्ण बाबीकडे त्यांनी लक्ष वेधले. हा सहयोगी दृष्टिकोण संपूर्ण कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या चमूच्या नात्यासाठीही लागू आहे. निर्मात्याची भूमिका वर्चस्व गाजवणारा ऐवजी हर प्रकारे सहयोग पुरवणारा, अशी असायला हवी.
स्टीफन यांनी चित्रपटाला अंतिम रूप मिळते त्या पोस्ट प्रॉडक्शन टप्प्याचे महत्त्व, त्यातील उत्साह याविषयी सांगितले. त्यांनी चाचणी म्हणून आधी छोट्या प्रमाणात चित्रपट प्रदर्शनाचे महत्त्व अधोरेखित केले. यामुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि मौल्यवान मते समजून सुधारणा करण्याची संधी मिळते. ''प्रेक्षकच चित्रपटाचे भविष्य ठरवत असतो. प्रेक्षकांना तुमचा चित्रपट आवडला तर तुमचा हेतू साध्य झाला. '' असे त्यांनी नमूद केले.
मार्केटिंग आणि चित्रपटाचे प्रकाशन या अंतिम टप्प्यासाठी धोरणात्मक नियोजन आवश्यक असते. स्टीफन यांनी जाहिरातदार, वितरक आणि इतर भागीदारांना यशस्वीरीत्या सहभागी करून घेणाऱ्या उत्कृष्ट मार्केटिंग नीतीच्या गरजेवर भर दिला.
आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीतून प्रसिद्ध चित्रपटकर्ते स्टीफन वूली यांनी चित्रपट निर्मितीतील गुंतागुंतीच्या अनेक बाबी उलगडल्या. निर्मितीच्या कलेत उत्कटता, व्यावहारिकता आणि सहयोग यांच्या महत्त्वावर भर देत भावी पिढीतल्या चित्रपटकर्त्यांना त्यांनी मौलिक मार्गदर्शन केले.
वक्त्यांविषयी
स्टीफन वूली हे एक इंग्लिश चित्रपट निर्माते आणि अभिनेते असून त्यांची कारकीर्द तब्बल साडे तीन दशकांहून अधिक काळाची आहे. त्यांना फेब्रुवारी 2019 मध्ये चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट ब्रिटिश योगदानाबद्दल बाफ्टा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. द क्रायिंग गेम (1992) या चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्यांना ऑस्कर नामांकन मिळाले होते. बहुविध अकादमी पुरस्कारांचे नामांकन मिळालेले अनेक चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. मोना लिसा (1986), लिटल व्हॉइस (1998), मायकेल कॉलिन्स (1996), द एंड ऑफ द अफेअर,(1999), इंटरव्यू विथ द व्हॅम्पायर (1994), आणि कॅरोल (2016) असे त्यांचे काही नावाजलेले चित्रपट आहेत. एलिझाबेथ कार्लसन यांच्यासोबत 'नंबर 9 फिल्म्स' ही निर्मिती कंपनी ते चालवतात.
* * *
PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Sonali/Darshana | IFFI 55
(Release ID: 2077613)
Visitor Counter : 12