माहिती आणि प्रसारण मंत्रालय
आजकाल परिपूर्ण स्त्री वा मुलगी असायला हवी ही मागणी तशी फारच कमी होत चालली आहे, आणि त्यामुळेच तसा पुरुषी दृष्टिकोणही बदलत चालला आहे - अभिनेत्री क्रिती सेनन
जगभरातील असंख्य देशांमध्ये ओटीटी व्यासपीठांचे अस्तित्व असल्याने त्या माध्यमातून आम्ही जागतिक पातळीवर पोहचू शकत आहोत - अभिनेत्री क्रिती सेनन
सुपरवुमन आणि पूर्णतः नकारात्मक छटा असलेली भूमिका साकारण्याची इच्छा अभिनेत्री क्रिती सेनन यांनी केली व्यक्त
55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने 'इन कनव्हरसेशन' या उपक्रमाअंतर्गत आयोजित 'सक्षमीकरणाच्या दिशेने बदल : सिनेमा जगतात महिलांची नेतृत्वशील वाटचाल' या विषयावरील परिसंवादात अभिनेत्री क्रिती सेनन सहभागी
#IFFIWood, 25 नोव्हेंबर 2024
कारकिर्द घडवण्याच्या दृष्टीकोनातून चित्रपट दिग्दर्शन आणि अभिनय क्षेत्र ही मुळातच अनिश्चित म्हणावी अशी क्षेत्रे आहेत. त्यामुळेच या क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या प्रत्येकाने आपल्या कारकिर्दीसाठी इतर पर्यायही उपलब्ध ठेवणे गरजेचे आणि हिताचेच असते, असे मत राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री क्रिती सेनन यांनी व्यक्त केले आहे.
मिमी या चित्रपटात भूमिका साकरण्याचा निर्णय हा आपल्या अभिनय कारकिर्दीतील आजवरचा सर्वात धाडसी निर्णय होता आणि आपल्याला या चित्रपटासाठी जेव्हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला, त्या क्षणाला या धाडसी निर्णयातून घेतलेल्या जोखीमेची खरा मोबदला मिळाला, अशी भावना क्रिती सेनन यांनी यावेळी व्यक्त केली.
क्रिती सेनन या काल दि. 26 नोव्हेंबर 2024 रोजी गोव्यात, कला अकादमी इथे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने सक्षमीकरणाच्या दिशेने बदल : सिनेमा जगतात महिलांची नेतृत्वशील वाटचाल (‘Empowering Change: Women Leading the Way in Cinema’) या विषयावरील परिसंवादात बोलत होत्या. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, 2024 च्या निमित्ताने 'इन-कन्व्हर्सेशन' या सत्राअंतर्गत हा परिसंवाद आयोजित केला गेला होता.
अनेकांनी मला मिमी या चित्रपट स्विकारू नये असाच सल्ला दिला होता. या सिनेमात काम केल्याने मी कलात्मक निर्मिती असलेल्या चित्रपटांना प्राधान्य देणारी अभिनेत्री असल्याचा शिक्का माझ्यावर बसेल अशी भिती त्या सर्वांना वाटत होती, आणि त्यामुळे भविष्यात माझ्या वाट्याला येणाऱ्या इतर कामांवर त्याचा नकारात्मक परिणाम होईल असेही त्यांना वाटत होते. पण काहीही असले तरी या चित्रपटाची पटकथा माझ्या मनाला भावली आणि म्हणूनच मी हा चित्रपट स्विकारल्याची बाबही क्रिती सेनन यांनी यावेळी सांगितली. कोणतेही काम हाती घेताना तो आपल्या मनाला भावते की नाहीच हा निकष सर्वात महत्वाचा असला पाहिजे, असे मतही क्रिती सेनन यांनी व्यक्त केले. भविष्यात आपल्याला सुपरवुमनची व्यक्तिरेखा साकारायला आवडेल, तसेच कोणतीही नकारात्मक व्यक्तिरेखा साकारायला आवडेल अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
दो पत्ती या चित्रपटात आपण साकारलेल्या व्यक्तिरेखेला अनेक छटा आणि बारकावे असल्याच्या त्या म्हणाल्या. कौटुंबिक हिंसाचार हा विषय हृदयाला स्पर्श करणारा विषय असल्याची भावनाही क्रिती सेनन यांनी यावेळी व्यक्त केली. तेरी बातों में ऐसा उल्झा जिया या चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल क्रिती सेनन यांनी यावेळी सांगितले की या चित्रपटाच्या निमित्ताने अगदी कोणतेही भाव नसलेल्या सरळ चेहऱ्याच्या रोबोची भूमिका साकारणे खूपच अवघड होते. आपल्या या भूमिकेला प्रतिसादही चांगला मिळाल्याचा अनुभव त्यांनी यावेळी सांगितला.
अलीकडच्या चित्रपटांमध्ये महिला अभिनेत्री नकारात्मक व्यक्तिरेखा साकारात असल्याबद्दल, तसेच नकारात्मक छटेच्या भूमिका स्विकारत असल्याबद्दलही क्रिती सेनन यांनी आपली मते व्यक्त केली. आता प्रेक्षकांना अशा प्रकारच्या नकारात्मक छटा असलेल्या व्यक्तिरेखा आवडतात, त्या त्यांना भावतात असे त्या म्हणाल्या. आत्ताच्या काळात परिपूर्ण स्त्री वा मुलगी असायला हवी ही मागणी तशी फारच कमी होत चालली आहे, आणि त्यामुळेच तसा पुरुषी दृष्टिकोनही बदलत चालला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
ओटीटी व्यासपीठांच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रात प्रवेश मिळवलेल्या नव्या दमाच्या महिला लेखिकांचे आपल्याला खूप कौतुक वाटत असल्याची भावनाही क्रिती सेनन यांनी यावेळी बोलून दाखवली. ओटीटी व्यासपीठांमुळे चित्रपट निर्मिती क्षेत्रात आलेल्या असंख्य महिला, शेकडो देशांपर्यंत पोहचत आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महिलांनी स्वत:च्या बळावर काम करत आपली प्रगती साध्य केली पाहिजे, त्यासाठी त्यांनी आपले शंभर टक्के योगदान द्यायला हवे, जिज्ञासू राहात प्रश्न विचारले पाहिजेत,असे मतही क्रिती सेनन यांनी व्यक्त केले.
* * *
PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Tushar/Darshana | IFFI 55
(Release ID: 2077360)
Visitor Counter : 8