माहिती आणि प्रसारण मंत्रालय
धैर्य, लवचिकता आणि विश्वासाची प्रभावशाली कथा: 55 व्या इफ्फी (IFFI) मध्ये ‘महावतार नरसिंहा' या चित्रपटाचा प्रीमियर
मला या कथा मिथक म्हणून नाही तर आपल्या सामूहिक इतिहासाचा आणि जाणीवेचा भाग म्हणून जतन करायच्या होत्या: दिग्दर्शक अश्विन कुमार
भारतीय VFX आणि ॲनिमेशन हे जागतिक दर्जाचे असू शकते हे आम्ही सिद्ध केले आहे: अश्विन कुमार
#IFFIWood, 25 नोव्हेंबर 2024
गोव्यामधील 55 व्या इफ्फी (IFFI), अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज अत्यंत महत्वाकांक्षी ॲनिमेटेड चित्रपटांपैकी एक असलेल्या, ‘महावतार नरसिंहा’ चा जागतिक प्रीमियर झाला, आणि त्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक टप्पा नोंदवला. अश्विन कुमार यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट जबरदस्त दृश्यात्मक परिणाम साधतो. भगवान विष्णूच्या वराह आणि नारसिंहावतारातील कथा विश्वास, धैर्य आणि लवचिकतेच्या आकर्षक कथानकातून जिवंत करतो.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना अश्विन कुमार म्हणाले, “हा केवळ ॲनिमेशन चित्रपट नसून, तो प्रेम आणि आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला दिलेली सलामी आहे. विष्णु पुराण, नरसिंह पुराण आणि श्रीमद भागवत पुराणातील संदर्भ घेताना, आम्ही सर्व पिढ्यांच्या हृदयाचा ठाव घेतील अशा कथा सादर करण्यासाठी मूळ स्रोतांशी प्रामाणिक राहिलो. मला या कथा मिथक म्हणून नव्हे तर आपल्या सामूहिक इतिहासाचा आणि जाणीवेचा भाग म्हणून जतन करायच्या होत्या.”
या चित्रपटात भगवान विष्णूविरुद्ध सूड उगवणारा राक्षस राजा हिरण्यकशिपू आणि त्याचा पुत्र प्रल्हाद यांच्यातील संघर्षाचे चित्रण केले आहे. प्रल्हादाच्या अतूट विश्वासामुळे भगवान विष्णू, नरसिंह अवतारात प्रकट होतात. कथेशी असलेला आपला वैयक्तिक संबंध स्पष्ट करताना दिग्दर्शक म्हणाले, “माझ्या जीवनातील कठीण काळात या कथांनी मला सामर्थ्य दिले. प्रल्हादाचा विश्वास आणि परिस्थितीला तोंड देण्याची लवचिकता, याने मला हा चित्रपट तयार करण्याची प्रेरणा दिली, मला आशा आहे, की तो इतरांसाठी आशेचा किरण ठरेल.”
भारतीय ॲनिमेशन पटांचा दर्जा उंचावणे, हे ‘महावतार नरसिंहा’ या चित्रपटाचे उद्दिष्ट आहे, जो सर्व वयोगटांना आकर्षित करणारा सिनेमॅटिक अनुभव देतो. जिवंत वाटणारे ॲनिमेशन आणि बारीकसारीक तपशीलांसह हा चित्रपट बनवायला साडेचार वर्षे लागली. निर्मात्या शिल्पा धवन म्हणाल्या, “हा प्रकल्प आपल्या वारशाचा उत्सव आहे. भारतीय संस्कृतीची समृद्धी प्रदर्शित करण्यासाठी तो जगभरातील घराघरांत पोहोचावा, असे आमचे उद्दिष्ट आहे.”
भारतातील ॲनिमेशन हे प्रामुख्याने मुलांसाठी आहे, या कल्पनेला छेद देत अश्विन कुमार म्हणाले, “आम्हाला या समजुतीला आव्हान द्यायचे होते आणि सर्वांसाठी एक चित्रपट तयार करायचा होता. सुरुवातीला आमच्या दृष्टिकोणावर कोणीही विश्वास ठेवला नाही, परंतु आम्ही हे सिद्ध केले की भारतीय VFX आणि ॲनिमेशन हे जागतिक दर्जाचे असू शकते.”
महावतार नरसिंहा’ ही केवळ एका मोठ्या नजरेची, दृष्टीकोणाची सुरुवात आहे. व्हिडीओ गेम्स, कॉमिक्स, वेब सिरीज आणि लाइव्ह-ॲक्शन फिल्म्ससह अनेक प्रकल्पांमधून भगवान विष्णूच्या सर्व दहा अवतारांचा शोध घेण्याची या टीमची योजना आहे. हा केवळ एक चित्रपट नसून तो वारसा आहे. संशोधन आणि आशयामध्ये रुजलेली कला खोलवर परिणामकारक ठरते. आमच्या भविष्यातील प्रयत्नांमध्ये हा दर्जा कायम ठेवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.” दिग्दर्शक म्हणाले.
युवा वर्ग या कथेशी जोडला जाईल, अशी कुमार यांना आशा आहे. "सत्य आणि सामर्थ्य, विश्वास आणि संशय यांच्यातील संघर्ष कालातीत आहे. मला विश्वास आहे, की तरुण प्रेक्षकांना आपल्या जीवनातील कठीण काळात तो ओळखीची वाटेल,” ते पुढे म्हणाले.
आधुनिक कथाकथनाला प्राचीन धर्मग्रंथांच्या शिकवणीशी जोडून, ‘महावतार नरसिंहा’ हा चित्रपट, पौराणिक कथा पडद्यावर कशा सांगितल्या जातात, याचा पायंडा पाडेल.
* * *
PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Rajshree/Darshana | IFFI 55
(Release ID: 2077353)
Visitor Counter : 27