माहिती आणि प्रसारण मंत्रालय
55 व्या इफ्फी मध्ये सादर झाला 'बॅसिमाज वुम्ब' आणि 'लुनीज': मानवी संघर्षाच्या अंतरंगाच्या खोलीचा घेतलेला वेध
'बॅसिमाज वुम्ब' आपल्याला एका तरुण महिलेच्या आशा आकांक्षांची कथा सांगतो : मैक्सिन डेनिस, अभिनेत्री
कलात्मक चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत आणि कॅनडा यांच्यात अधिकाधिक सहकार्य आवश्यक : बेबेक अलियासा, दिग्दर्शक
'लुनीज' ही प्रेम आणि आयुष्यातील एका सामर्थ्यवान शक्तीची कथा आहे: लेक मॅकीविझ, अभिनेता
भारतीय चित्रपटांच्या अतिशय चैतन्यदायी अनुभवाने प्रेरित झालो : लेक मॅकीविझ, अभिनेता
#IFFIWood, 24 नोव्हेंबर 2024
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, अर्थात 55 व्या इफ्फीमध्ये ‘सिनेमा ऑफ द वर्ल्ड’ श्रेणीत आज कॅनेडियन चित्रपट ‘बॅसिमाज वुम्ब’ आणि पोलिश चित्रपट, ‘लुनीज’ हे दोन उल्लेखनीय चित्रपट प्रदर्शित करण्यात आले: दूरदर्शी दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी तयार केलेले, हे चित्रपट सामाजिक दबाव, अस्तित्वाचा शोध, वचनपूर्ती, आशा आणि चांगल्या जीवनाची अपेक्षा आणि त्यासाठी केलेला पाठपुरावा यांसारख्या गहन संकल्पनांवर भाष्य करतात.

या चित्रपटाची कथा भारतातील सरोगसी बद्दलच्या कथांनी प्रेरित असल्याचे ‘बॅसिमाज वुम्ब’ चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेता बेबेक अलियासा यांनी प्रसार माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना सांगितले. या चित्रपटात संगीत नसल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की प्रेक्षकांना गुंतवून ठेवणे टाळण्यासाठी हा निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात आला आहे.
भारत आणि कॅनडा मधील चित्रपटांच्या तुलनात्मक अभ्यासाबद्दल बोलताना ते म्हणाले की कॅनडा मध्ये भारताच्या तुलनेत चित्रपटांची निर्मिती कमी होते आणि कलात्मक चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत आणि कॅनडा यांच्यात अधिकाधिक सहकार्य आवश्यक आहे.
ही कथा अतिशय गहन असून आशा आकांक्षांनी प्रफुल्लित अशा बॅसिमा या नवयुवतीची व्यक्तिरेखा आपण साकारत असल्याचे अभिनेत्री मैक्सिन डेनिस यांनी सांगितले. चित्रपटातील संगीताचा अभाव ही एक कलात्मक निवड होती, प्रेक्षकांना चित्रपटाशी सहजसोप्या पद्धतीने जोडण्यापेक्षा कलाकृतीच्या माध्यमातून जोडण्यावर अधिक भर दिल्याचं त्यांनी सांगितले. या भूमिकेच्या तयारीसाठी सरोगसी या विषयावरील अनेक माहितीपट पाहणे आणि सीरियन भाषेच्या उच्चारांसह फ्रेंच आणि अरबी भाषा बोलायला शिकणे यांचा समावेश होता आणि या दोन्ही गोष्टी आव्हानात्मक आणि मजेदार होत्या, असे त्या म्हणाल्या.

अभिनेत्री निकोल-सिल्वी लगार्डे, यांनी या चित्रपटात नकारात्मक भूमिका केली आहे. या चित्रपटातील त्यांची व्यक्तिरेखा म्हणजे आयष्यातील ओरखडे आणि त्यांच्यावरील उपचारांचा एक वैयक्तिक प्रवास असल्याचे त्यांनी सांगितले. कॅनडामध्ये चित्रीकरण करताना प्रतिकूल हवामानाचाही अनुभव घेतल्याचा त्यांनी उल्लेख केला.
‘लुनीज’ मधील अभिनेत्री अॅलीसिया स्तासिएविझ हिने सांगितले की तिच्या भूमिकेसाठी वजनातील बदलासह लक्षणीय शारीरिक परिवर्तन आवश्यक होते आणि हा आव्हानात्मक भाग होता. या चित्रपटातील भूमिकेसाठी भावनिकदृष्ट्या मदत करणाऱ्या नाट्यक्षेत्रातील 11 वर्षांच्या कारकिर्दीला तीने या भूमिकेच्या यशाचे श्रेय दिले.

अभिनेते लेक मॅकीविझ यांनी चित्रपटातील प्रेमाच्या मध्यवर्ती संकल्पनेबद्दल बोलताना सांगितले की ही जीवनातील प्रबळ शक्ती आहे. चित्रपटातील संगीताबाबत चर्चा करताना, हे संगीत पात्रांच्या भावनांसोबत जुळणारे आहे असे त्याने नमूद केले. भारतीय चित्रपटांच्या उत्साहाने सळसळत्या, भव्य शैलीची अधिक संयत पद्धतीच्या पोलिश चित्रपटांशी तुलना करत त्यांनी भारतीय शैलीच्या चित्रपटांची निर्मिती करण्याची इच्छा व्यक्त केली.
चित्रपटांची थोडक्यात माहिती:
बस्सीमा’ज वुंब : या चित्रपटाची कथा एका तरुण सिरीयन महिलेभोवती फिरते जिचा पती, योग्य कागदपत्रे नसल्याने कॅनडातून निर्वासित करण्यात आला आहे. पतीला पुन्हा भेटण्याच्या उतावीळपणे केलेल्या प्रयत्नात, ती बनावट पारपत्राच्या बदल्यात सरोगेट मातृत्वाची अट स्वीकारते. मात्र, लवकरच तिला एका धक्कादायक सत्याला सामोरे जावे लागते. ती आधीच गरोदर असल्याचे वास्तव तिला समजते. तिला स्वतःच्या मुलाचा त्याग करण्याचा हृदयद्रावक निर्णय घेणे भाग पडते.
लुनीज : इरिक आणि करोल्का हे आदर्शवादी जोडपे, आयुष्याची नव्याने सुरुवात करण्याच्या इराद्याने, तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्यांच्या त्रासदायक भूतकाळापासून दूर जात, निसर्गाच्या सान्निध्यात शांतता शोधते. इरिक त्याच्या मुलीला झेसिकाला अधिक चांगले आयुष्य देण्याच्या प्रयत्नात आहे. एक नवे भविष्य घडवण्यासाठी ते एकत्रितपणे पोलंड ओलांडून जाण्याच्या प्रवासाला निघतात. मात्र करोल्का गंभीररीत्या आजारी पडल्यामुळे त्यांचा बेत बारगळतो. आणि करोल्कासाठी आवश्यक उपचार त्यांना परवडण्याच्या पलीकडे, अत्यंत खर्चिक असतात.
ही पत्रकार परिषद पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा:
* * *
PIB IFFI CAST AND CREW | S.Patil/Bhakti/Sanjana/Darshana | IFFI 55
(रिलीज़ आईडी: 2076689)
आगंतुक पटल : 93