माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
0 5

मिसेस हा असंख्य महिलांच्या स्वप्नांशी साधर्म्य साधतो : अभिनेत्री सान्या मल्होत्रा


विवाहानंतर उद्भवणारे सूक्ष्म फरक आणि गुंतागुंतीतून मार्ग काढणाऱ्या महिलांना समजून घेणे आणि त्यांच्याप्रति सहानुभूती बाळगणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे: दिग्दर्शिका आरती कडव

चित्रपटनिर्मिती महिला केंद्रित किंवा पुरुषकेंद्रीत च्याही पलीकडे गेली आहे. यातील अडथळे दूर करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे: निर्माता हरमन बावेजा

#IFFIWood, 22 नोव्‍हेंबर 2024

 

“विवाहानंतर उद्भवणारे अनेक सूक्ष्म फरक  आणि गुंतागुंतीतून मार्ग काढणाऱ्या महिलेला समजून घेणे आणि तिच्याप्रति सहानुभूती बाळगणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे” असे मत चित्रपटाच्या दिग्दर्शिका आरती कडव यांनी गोव्यात 55 व्या इफ्फीमध्ये ‘मिसेस’च्या भव्य प्रीमियरच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कडव यांनी या चित्रपटाबाबतचा आपला दृष्टिकोन व्यक्त केला, त्या म्हणाल्या की 'मिसेस' ही "सामान्य लोकांसाठी" एक कथा आहे आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याच्या दृष्टीने त्याची  रचना  केली आहे. “प्रत्येक महिला  हा या चित्रपटाचा विषय आहे.

कुटुंब आणि समाज या दोन्हीमध्ये महिलांच्या भूमिकांबाबतचे मौन तोडण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर  दिला आणि 'मिसेस' सिनेमाने  या समस्या सहज आणि आकर्षक मार्गाने सर्वांसमोर मांडल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

सान्या मल्होत्रा जिने रिचा  ही प्रमुख भूमिका साकारली आहे, तिने या भूमिकेशी तिचा भावनिक संबंध सामायिक केला आणि ते अगदी वैयक्तिक असल्याचे सांगितले.  सान्या म्हणाली, "रिचासारख्या महिला आपल्या आजूबाजूला असतात.  "मी अशा अनेक महिलांना भेटले आहे ज्या अशाच अनुभवातून गेल्या आहेत. अनेक महिलांशी बोलून, त्यांच्या कथा ऐकून आणि त्यांचा संघर्ष समजून घेतल्यानंतर  मी त्या  व्यक्तिरेखेशी मुळापासून जोडले गेले." ती पुढे म्हणाली की, हा चित्रपट असंख्य महिलांच्या स्वप्नांशी साधर्म्य साधतो  आणि म्हणूनच तिच्या हृदयाच्या जवळ आहे. सान्याने रिचाची व्यक्तिरेखा साकारताना तिला जाणवलेल्या जबाबदारीवरही भर दिला, "मी कधीही एखाद्या पात्राकडे वरवर पाहत नाही. मी प्रत्येक भूमिका  गांभीर्याने आणि जबाबदारीने पार पाडते आणि भावना प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करते."

निर्माते हरमन बावेजा यांनी चित्रपटाच्या मुख्य संदेशातील अंतर्दृष्टी दाखवून देत संभाषणाला सुरुवात केली, लग्नानंतर महिलांना परिवर्तनाच्या प्रवासाला सामोरे जावे लागणाऱ्या आव्हानांवर भर दिला. त्यांनी मिसेसचे वर्णन एका महिलेची, रिचाची कथा असे केले, जी सामाजिक अपेक्षांच्या पलीकडे जाऊन स्वतःची ओळख पुन्हा परिभाषित करू पाहते. बावेजा यांनी नमूद केले, "लग्नानंतर एक स्त्री वेगळ्या मार्गाने प्रवास करते आणि मिसेस हा रिचाच्या आत्मशोधाचा मार्ग आहे. आपण 'महिला-केंद्रित' किंवा 'पुरुष-केंद्रित' अशा लेबलांच्या पलीकडे जायला हवे. कलेमध्ये कोणतेही लिंग अडथळे नसावेत, हे अडथळे दूर करणे ही एक समाज म्हणून आपली सामूहिक जबाबदारी आहे.“

मिसेसद्वारे सक्षमीकरण, स्वत:ची ओळख आणि आव्हानात्मक सामाजिक नियमांबद्दल एक प्रभावी आणि समयोचित संदेश सादर केला आहे. आकर्षक कथानक आणि अपवादात्मक कलाकारांसह हा चित्रपट अर्थपूर्ण संभाषणांचे स्फुल्लिंग चेतवण्याचे वचन देतो आणि प्रेक्षकांना पारंपरिक लैंगिक भूमिकांचा पुनर्विचार करण्यास प्रेरित करतो.

 

चित्रपट: मिसेस

रंगीत| 111’ | हिंदी | 2024

रिचा, एक उत्कट नृत्यांगना, एका लाजाळू मेहनती डॉक्टरशी लग्न करते परंतु लवकरच तिला अंतहीन घरगुती काम आणि अप्रशंसनीय प्रयत्नांमुळे गुदमरल्यासारखे वाटते. तिचे समर्पण असूनही, तिचे समवयस्क पुढे जात असताना, तिला कौटुंबिक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. तिची स्वतःची ओळख बनवण्याचा निर्धार करून, रिचा पाककलेमध्ये स्वतःच्या प्रेमाला वाट करून देते‌ आणि पुरुषी वर्चस्वाचा प्रतिकार करते. पारंपरिक अपेक्षांपलिकडे जात स्वत:ला पुन्हा परिभाषित करणारा “मिसेस “ हा तिच्या आत्मशोधाचा प्रवास आहे.

दिग्दर्शक : आरती कडव

निर्माते: ज्योती देशपांडे, पम्मी बावेजा, हरमन बावेजा

पटकथा लेखक: अनु सिंग चौधरी, हरमन बावेजा, आरती कडव

सिनेमॅटोग्राफर: प्रथम मेहता

संपादक: प्रेरणा सहगल

संपूर्ण पत्रकार परिषद येथे पहा:

 

* * *

PIB IFFI CAST AND CREW | S.Patil/Sushma/Nandini/Darshana | IFFI 55

iffi reel

(Release ID: 2076367) Visitor Counter : 11