माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
0 4

‘घरत गणपती’ हा चित्रपट भारतीय परंपरा आणि संस्कृती पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो: चित्रपट निर्माते नवज्योत बांदिवडेकर


'लेव्हल क्रॉस' हा चित्रपट मानवी भावनांची परिसीमा ओलांडतो: ॲडम अयुब

#IFFIWood, 22 नोव्‍हेंबर 2024

 

‘घरत गणपती’ हा चित्रपट म्हणजे भारतात आज लोप पावत असलेली आपली परंपरा, संस्कृती आणि मूल्ये पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे या चित्रपटाचे दिग्दर्शक नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांनी म्हटले आहे. ते आज 55 व्या इफ्फी (IFFI), अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पत्रसूचना कार्यालयाने (PIB) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. आजच्या जगात एकत्र कुटुंब पद्धतीची संकल्पनाही मागे पडत असल्याचे ते म्हणाले. 55 व्या इफ्फी (IFFI) महोत्सवात ‘दिग्दर्शनासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण’ पुरस्काराच्या स्पर्धेत असलेल्या या चित्रपट निर्मात्याने सांगितले, की हा चित्रपट मजेदार आणि गोंधळाचे वातावरण निर्माण करणाऱ्या प्रसंगांमधून कुटुंबातील सर्व सदस्यांचे परस्परांबरोबरच्या नात्याचे पदर उलगडतो.  

‘घरत गणपती चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक संकेत साने यांनी सांगितले की, या चित्रपटासाठी संगीत रचना करताना त्यांनी असा दृष्टीकोन ठेवला, की ते प्रेक्षकांना भारतीय संस्कृतीशी जोडेल, जे प्रत्येक भारतीयाच्या हृदयाला भिडेल.

या चित्रपटाचे कथानक महाराष्ट्रातील निसर्गरम्य कोकण किनारपट्टी परिसरावर बेतले आहे, मात्र चित्रपटात दाखवलेले वडिलोपार्जित महाराष्ट्रीयन घर हे प्रत्यक्षात केरळमध्ये आहे! या संदर्भात बोलताना बांदिवडेकर म्हणाले, “संपूर्ण भारतात अफाट निसर्ग सौंदर्य आहे. त्यासाठी भारताबाहेर जाण्याची आवश्यकता नाही.”

“घरत गणपती’ या मराठी चित्रपटातील एक प्रसंग

 

'घरत गणपती' चित्रपटाच्या कार्यकारी सहनिर्मात्या अश्विनी परांजपे यांनी सांगितले की, चित्रपटाचे कथानक ऐकता क्षणीच आवडले. ‘घरत गणपती’ चित्रपट स्वीकृती, बदलत्या परंपरा आणि भारतीय कुटुंबातील गुंतागुंतीचे बंध याचा वेध घेतो. उत्सवाच्या धामधुमीत घडणाऱ्या आनंद आणि दुःखाच्या प्रसंगांमधून, हा चित्रपट प्रेम, अस्तित्व आणि सांस्कृतिक चेतनेची जाणीव करून देतो.   

चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी नमूद केले की, या चित्रपटात सशक्त महिला व्यक्तिरेखा आहेत. या चित्रपटात एका उत्तर भारतीय मुलीचे कथानक आहे, जी गणपती उत्सवासाठी कोकणात एका  महाराष्ट्रीयन कुटुंबाबरोबर राहण्यासाठी आली आहे. या चित्रपटात निकिता दत्ता, भूषण प्रधान, अजिंक्य देव, अश्विनी भावे, संजय मोने, शुभांगी लाटकर आणि शुभांगी गोखले हे कलाकार आहेत.

इफ्फी (IFFI) महोत्सवातील पत्रकार परिषदेत मराठी चित्रपट ‘घरत गणपती’ आणि मल्याळम चित्रपट ‘लेव्हल क्रॉस’च्या टीम्स

मल्याळम चित्रपट ‘लेव्हल क्रॉस’ चे दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि मुख्य अभिनेता देखील पत्रकार परिषदेत सहभागी झाले  होते. दिग्दर्शक अरफाझ अयुबने  या चित्रपट  प्रकल्पाचे वर्णन एक “अतिवास्तव चित्रपट” असे केले आहे.  या सिनेमामध्‍ये  स्थळ हे देखील एक पात्र आहे! आयुष्य किती अनिश्चित, बेभरवशाचे  आहे हे दाखवणारा हा  चित्रपट आहे. असे सांगून अरफाझ अयुब पुढे म्हणाले, चित्रपट सामाजिक परिदृश्‍यातील दोन वेगवेगळ्या टोकांवर असलेल्‍या दोन लोकांना समोर आणतो.  हे दोघेही  वरवर पाहता,  खूप वेगळे दिसतात. पण त्यांच्‍या  मानवी भावना  सखोल पातळीवर सारख्याच असतात,  हेही या चित्रपटातून दिसून येते. कथेत दडलेला वर्तमान हा भूतकाळाचा अवशेष आहे,  हे चित्रपट सूक्ष्मपणे प्रकट करतो. जगण्याची ही कहाणी परस्परविरोधी दृष्टीकोनातून आणि सूक्ष्म रूपकांच्या मानवी भावनांनी भरलेली आहे, असेही ते म्हणाले.

ट्युनिशियातील सहारा वाळवंटात ‘लेव्हल क्रॉस’चे चित्रीकरण करण्यात आले आहे. दिग्दर्शकाने हे स्थान निवडले कारण प्रेक्षकांनी नवीन घटनास्‍थळ   पहावे आणि पटकथेच्या मागणीनुसार ते "अत्यंत, काल्पनिक जग" असावे,  असा विश्वासही त्यांनी ठेवावा, अशी त्यांची  इच्छा होती.  ट्युनिशियामध्ये चित्रीत  झालेला हा पहिला भारतीय चित्रपट असल्याचे त्यांनी सांगितले. "वेळ आणि स्‍थळाच्या पलीकडे एका काल्पनिक भूमीत बनलेला, हा चित्रपट भावना, विचार आणि श्रद्धा यांचा सुंदरपणे शोध घेतो", असे दिग्दर्शकाने सांगितले.

अरफाझ अयुब यांनी  या प्रकल्पासाठी योग्य स्‍थानाचा  शोध घेताना आलेला  अनुभव यावेळी सामायिक केला.  वाळवंटात तिथल्‍या  स्थानिक ट्युनिशियन लाइन निर्मात्याबरोबर चित्रीकरणाच्‍या  स्थळापर्यंत कसे मैल न मैल  चालत जावे लागत  होते,  तिथे जाण्‍यासाठी रस्ताही  नव्हता!

अरफाझ  अयुब यांचे वडील आदम अयुब, मल्याळम टीव्ही प्रणेते आहेत, त्यांनीच  'लेव्हल क्रॉस'साठी पटकथा लिहिली होती. पत्रकार परिषदेत, चित्रपट उद्योगातील दिग्गजांनी सांगितले की, त्यांनी या प्रकल्पासाठी अनेक वेळा पटकथेचे पुनर्लेखन केले. हा चित्रपट मानवी भावनांच्या पलीकडे घेवून जाणारा आहे, असे आदम अयुब यांनी सांगितले.  प्रेक्षकांनी हा चित्रपट शेवटपर्यंत पहावा, असा सल्ला त्यांनी दिला, कारण अगदी शेवटच्या दृश्यामध्‍येही  कथा वेगळे वळण घेते.  त्यावेळची  आश्चर्यकारक दृश्‍ये   आणि मनमोहक ध्वनी यामुळे  एक अद्वितीय सिनेमॅटिक अनुभव प्रेक्षकांना मिळतो.

या चित्रपटामध्‍ये प्रमुख भूमिका करणारी अभिनेत्री अमला पॉलने सांगितले की,  तिची भूमिका गुंतागुंतीची होती आणि अनेक वळणांनी  भरलेल्या रहस्यमय नाटकातल्‍या  या पात्राला अनेक स्तर आहेत. अमला पॉलने “अनप्रेडिक्टेबल डेझर्ट एन्वायरमेंट”  म्‍हणजे वाळवंटामध्‍ये   बेभरवशी  अशा  हवामानात केलेल्या चित्रीकरणाचा  रोमांचक अनुभव सामायिक केला. शूटिंगच्या शेवटच्या दिवसात एक मोठे वादळ  पाहिल्याचेही अमलाने  सांगितले.

मल्याळम फीचर फिल्म 'लेव्हल क्रॉस' मधील एक दृश्य

'लेव्हल क्रॉस' या रहस्‍यमय चित्रपटाच्या कलाकारांमध्ये आसिफ अली आणि शराफ यू धीन यांचाही समावेश आहे.

 

* * *

PIB IFFI CAST AND CREW | N.Chitale/Rajashree/Suvarna/Darshana | IFFI 55

iffi reel

(Release ID: 2076186) Visitor Counter : 21


Read this release in: English , Hindi