माहिती आणि प्रसारण मंत्रालय
‘सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो’ हा चित्रपट लोककथा आणि माझ्या बालपणीच्या अनुभवातून प्रेरित आहे: दिग्दर्शक चिदानंद एस नाईक
उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांसाठी लघुपट हे सर्वोत्तम माध्यम आहे: चिदानंद एस नाईक
#IFFIWood, 22 नोव्हेंबर 2024
गोवा येथील 55 व्या इफ्फी (IFFI), अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज आयोजित करण्यात आलेल्या भव्य पत्रकार परिषदेत, ‘सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो (Sunflowers Wear the First Ones to Know)’ या प्रशंसाप्राप्त लघुपटाच्या क्रू सदस्यांनी, अमूल्य सिनेमॅटिक प्रचीती देणाऱ्या या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेचे आपले अनुभव माध्यमांसमोर सादर केले.
या संवादा दरम्यान, चित्रपट दिग्दर्शक चिदानंद एस. नाईक यांनी सांगितले की, ‘सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो’, हा चित्रपट भारतीय लोककथा आणि त्यांच्या बालपणीच्या अनुभवांमध्ये खोलवर रुजलेला असून, तो पारंपरिक कथा आणि वैयक्तिक आठवणी यांचे काव्यात्मक सौंदर्य एकत्र गुंफणारे कथानक साकारतो. त्यांनी या चित्रपटाचे वर्णन, ‘वास्तविक जीवनातील अनुभवांची काव्यात्मक अभिव्यक्ती’ असे केले. हा प्रकल्प सांस्कृतिक संकल्पना आणि कथाकथनाचा त्यांचा शोध प्रतिबिंबित करतो, असे त्यांनी अधोरेखित केले.
चित्रपट निर्माता म्हणून आपल्या प्रवासाबद्दल बोलताना, चिदानंद म्हणाले की, युवा आणि उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांसाठी लघुपट महत्वाचे आहेत. "लघुपट हा चित्रपट निर्मात्यांना त्यांचा सिनेमॅटिक प्रवास सुरू करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करतो, ज्यामुळे त्यांना कथाकथनाच्या वेगवेगळ्या शैली, तंत्रे आणि प्रकार यांचा प्रयोग करण्याची संधी मिळते," ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, चित्रपट निर्माता म्हणून, ते नेहमीच वेळ, स्थळ आणि खर्च यांच्यात समतोल साधायचा प्रयत्न करतात, आणि तो चित्रपट प्रेक्षकांकडे असलेल्या मूल्यांमध्ये भर घालेल हे सुनिश्चित करतात.
चित्रपटाची निर्मिती प्रक्रियाही तेवढीच उल्लेखनीय होती, असे प्रॉडक्शन डिझायनर प्रणव खोत यांनी, मर्यादित साधनांसह चित्रपट जिवंत करताना आपल्या समोर आलेल्या आव्हानांबदल बोलताना सांगितले. "FTII, पुणे ची निर्मिती असलेला ‘सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो’, हा असा प्रकल्प होता, ज्याने आम्हाला सृजनशीलतेने विचार करायला, आणि आपल्यासाठी असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या मर्यादेत आणि साधन संपत्तीच्या सहाय्याने नवोन्मेशी उपाय शोधायला प्रवृत्त केले," ते म्हणाले.
‘सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो’, हा चित्रपट 97 व्या अकादमी पुरस्कारांच्या ‘लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म’ श्रेणीतील प्रवेशासाठी अधिकृतपणे पात्र ठरला आहे. या उल्लेखनीय कामगिरी पाठोपाठ या चित्रपटाला कान चित्रपट महोत्सवातील ‘ल सिनेफ निवड (La Cinef)’ श्रेणीत प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले, ज्याने भारतीय लोककथा आणि परंपरांनी प्रेरित या कन्नड भाषेतील प्रकल्पाला जागतिक मान्यता मिळवून दिली.
सनफ्लॉवर्स वर द फर्स्ट वन्स टू नो (Sunflowers Were the First Ones to Know):
रंगीत | 16’ | 2023 | कन्नड
गावातील कोंबडा चोरणाऱ्या एका वृद्ध महिलेची कथा, जी गावकऱ्यांचा गोंधळ उडवते. कोंबडा परत मिळवण्यासाठी एका भविष्यवाणीनुसार, वृद्ध महिलेच्या कुटुंबाला विजनवासात पाठवले जाते.
कलाकार आणि क्रू सदस्य
दिग्दर्शक: चिदानंद एस नाईक
निर्मिती: FTII, पुणे
पटकथा लेखन: चिदानंद एस नाईक
संपादन: मनोज व्ही.
सिनेमॅटोग्राफी: सूरज ठाकूर
* * *
PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Rajshree/Darshana | IFFI 55
(Release ID: 2076120)
Visitor Counter : 14