माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इंडियन पॅनोरमामध्ये देशाच्या सर्व भागांना समान प्रतिनिधित्व मिळेल हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केलाः हिमांशू शेखर खटुआ, परीक्षकमंडळ सदस्य
'इंडियन पॅनोरमा' भारत आणि भारतीय सिनेमाच्या विविधतेचे दर्शन घडवतोः प्रिया कृष्णस्वामी
देशाच्या सर्व प्रदेशातून येणारी प्रतिभा, फिल्म्स आणि सर्जनशीलता यांना न्याय देण्याचा ज्युरींनी प्रयत्न केला आहे- मनोज जोशी
इंडियन पॅनोरमाच्या ज्युरींनी इफ्फी 2024 मध्ये भारतीय सिनेमामधील भावी कल जगाला दाखवण्याचे प्रयत्न केले अधोरेखित
#IFFIWood, 21 नोव्हेंबर 2024
384 चित्रपटांमधून 20 भारतीय चित्रपटांची निवड करणे अतिशय अवघड काम होते आणि या इफ्फीमध्ये निवड न होणे म्हणजे निवड न झालेल्या चित्रपटांच्या दर्जाविषयीची नापसंती आहे, असे मानण्याचे काही कारण नाही, असे मत इफ्फी 2024 मध्ये इंडियन पॅनोरमामधील फीचर फिल्म्स विभागाच्या परीक्षकमंडळ सदस्यांनी व्यक्त केले आहे. 55 व्या इफ्फी 2024च्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते.
इंडियन पॅनोरमामध्ये चित्रपटांची निवड करण्याच्या प्रक्रियेबद्दल आपला दृष्टीकोना मांडताना नामवंत चित्रपट निर्माते हिमांशू शेखर खटुआ यांनी सांगितले की हे सर्व चित्रपट देशाच्या विविध भागातून आलेले असल्याने आणि देशाच्या सर्व भागांना समान प्रतिनिधित्व मिळावे हे सुनिश्चित करण्याची इच्छा असल्याने परीक्षकमंडळासाठी हे काम अतिशय अवघड होते. 13 परीक्षकांच्या पॅनेलने या विभागातील सर्वोत्तम 25 चित्रपटांना निवडण्यासाठी 42 दिवस विचारविनिमय केला.
खटुआ पुढे म्हणाले की चित्रिकरणासाठी गोवा सर्वाधिक पसंतीचे स्थान बनले आहे आणि गोव्यामध्ये चित्रिकरण करताना निर्मात्यांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध होत असल्याचे यातून दिसत आहे.
यावेळी बोलताना ज्युरी मेंबर मनोज जोशी म्हणाले की ज्युरींनी देशाच्या सर्व भागातून येत असलेली प्रतिभा, फिल्म्स आणि सर्जनशीलतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. “आपण जगाचे प्राथमिक कथाकथनकार आहोत. कथाकथन आपल्या रक्तात आहे आणि जगाला सर्वोत्तम आशय उपलब्ध करणारा देश आहोत,” जोशी यांनी नमूद केले.
ज्युरी मेंबर रत्नोत्तमा सेनगुप्ता म्हणाल्या की इफ्फी 2024 मधील इंडियन पॅनोरमातील चित्रपट भारताची आणि भारतीय सिनेमाची जी विविधता आहे, त्याचे दर्शन घडवतात. जरी हा महोत्सव केवळ 10 दिवस चालत असला तरी त्याच्या स्वतःमध्येच अनेक प्रकारची विविधता आणि चित्रपटांची श्रेणी असलेल्या अनेक विभागांचा समावेश आहे, यावर त्यांनी भर दिला. ज्युरी मेंबर आशू त्रिखा म्हणाले की सिनेमा हा स्वतःच एक प्रदेश आहे आणि निवड प्रक्रिया अतिशय बारकाईने आणि मनापासून करण्यात आलेली आहे. ते पुढे म्हणाले की स्पेशल इफेक्ट्स आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर या क्षेत्रात आणि अशा प्रकारच्या सर्व क्षेत्रात भारतीय सिनेमा नवे मापदंड प्रस्थापित करत आहेत आणि ते जागतिक दर्जाच्या बरोबरीचे आहेत.
ज्युरी सदस्य प्रिया कृष्णस्वामी यांनी आजच्या भारतीय चित्रपटांच्या संकल्पनांमधील तरलतेची प्रशंसा केली. त्या म्हणाल्या की, सिनेमा माध्यम आणि सिनेमॅटिक परिभाषेतील प्रयोगांचे आजच्या सिने निर्मात्यांनी केलेले सादरीकरण पाहणे आनंददायी आहे. चित्रपटांची काटेकोरपणे निवड करून चित्रपट निर्मितीमधील नवीन ट्रेंड प्रदर्शित करण्याचा आणि भारतीय चित्रपटांमधील वैविध्य जगासमोर ठळकपणे प्रदर्शित करण्याचा ज्युरी सदस्यांचा प्रयत्न होता. सुष्मिता मुखर्जी, ओयनम गौतम, एस.एम. पाटील, नीलाभ कौल, सुशांत मिश्रा, अरुणकुमार बोस आणि समीर हंचाटे, पत्रकार परिषदेला उपस्थित होते. राजित चंद्रन यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले.
55 व्या इफ्फी (IFFI), अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा प्रमुख भाग असलेल्या इंडियन पॅनोरमा अंतर्गत यंदा 25 फीचर फिल्म्स आणि 20 नॉन-फीचर फिल्म्स प्रदर्शित होणार आहेत. 384 समकालीन भारतीय फीचर फिल्म्सच्या विस्तृत श्रेणीतून सिनेमाच्या मुख्य प्रवाहातील 5 चित्रपटांसह 25 फीचर फिल्म्सचे पॅकेज निवडण्यात आले आहे. इंडियन पॅनोरमा 2024 चा उद्घाटनपर चित्रपट म्हणून, ज्युरी सदस्यांनी रणदीप हुडा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर (हिंदी)’ या चित्रपटाची निवड केली आहे.
इंडियन पॅनोरमा फीचर फिल्म्सचे ज्युरी सदस्य:
1. मनोज जोशी, अभिनेते
2. सुस्मिता मुखर्जी, अभिनेत्री
3. हिमांशू शेखर खटुआ, चित्रपट दिग्दर्शक
4. ओयनम गौतम सिंग, चित्रपट दिग्दर्शक
5. आशु त्रिखा, चित्रपट दिग्दर्शक
6. एस.एम. पाटील, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक
7. नीलाभ कौल, सिनेमॅटोग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक
8. सुशांत मिश्रा, चित्रपट दिग्दर्शक
9. अरुण कुमार बोस, प्रसाद संस्थेचे माजी एचओडी आणि ध्वनी अभियंता
10. रत्नोत्तमा सेनगुप्ता, लेखिका आणि संपादक
11. समीर हंचाटे, चित्रपट दिग्दर्शक
12. प्रिया कृष्णस्वामी, चित्रपट दिग्दर्शक
इंडियन पॅनोरमा
सिनेमॅटिक कलेच्या सहाय्याने भारतीय चित्रपटांच्या माध्यमातून भारताची समृद्ध संस्कृती आणि वारसा जगासमोर प्रदर्शित करण्यासाठी, 1978 साली इफ्फी (IFFI) महोत्सवाचा एक भाग म्हणून इंडियन पॅनोरमा हा विशेष विभाग सुरु करण्यात आला. सुरुवातीपासूनच, इंडियन पॅनोरमा हा विभाग त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी पूर्णपणे समर्पित आहे. चित्रपट कला प्रकारला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, इंडियन पॅनोरमा विभागासाठी निवड झालेले चित्रपट बिगर नफा तत्त्वावर भारतात आणि परदेशातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये, द्विपक्षीय सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमांमध्ये आणि सांस्कृतिक देवाणघेवाण प्रोटोकॉल व्यतिरिक्त भारतीय चित्रपट महोत्सवांमध्ये विशेष आयोजित करण्यात आलेल्या भारतीय चित्रपट सप्ताहात, तसेच भारतातील विशेष इंडियन पॅनोरमा महोत्सवात प्रदर्शित केले जातात.
अधिक माहितीसाठी: https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2067711
* * *
PIB IFFI CAST AND CREW | Chippalkatti/Shailesh/Rajshree/Darshana | IFFI 55
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 2075640)
Visitor Counter : 13