संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डीआरडीओकडून भारताच्या पहिल्या लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी

Posted On: 17 NOV 2024 9:45AM by PIB Mumbai

 

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने  (डीआरडीओ) काल( १६ नोव्हेंबर २०२४) रात्री ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून भारताच्या पहिल्या लांब पल्ल्याच्या ध्वनीच्या वेगाच्या पाच पटींहून अधिक वेगवान (हायपरसॉनिक) क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी केली आहे. हे `हायपरसॉनिक` क्षेपणास्त्र सशस्त्र दलांसाठी १,५०० किलोमीटरहून अधिक अंतरावर विविध प्रकारची स्फोटके, गुप्तचर उपकरणे किंवा इतर युद्धसामग्री (पेलोड) वाहून नेण्यासाठी तयार करण्यात आले आहे. क्षेपणास्त्राचा मागोवा अनेक कक्षांमध्ये तैनात करण्यात आलेल्या विविध श्रेणी प्रणालीद्वारे घेतला गेला.

A rocket launching at nightDescription automatically generated

दूरस्थित जहाज स्थानकावरून उड्डाणासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार या क्षेपणास्त्राने यशस्वी युद्धाभ्यासाचे प्रात्यक्षिक देताना अचूकतेने लक्ष्यभेदाची पुष्टी केली आहे.

हे क्षेपणास्त्र डॉ. एपीजे अब्दुल कलाम क्षेपणास्त्र संकुल, हैदराबादमधील प्रयोगशाळा तसेच `डीआरडीओ`च्या इतर प्रयोगशाळा आणि औद्योगिक भागीदारांच्या सहकार्याने स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आले आहे. ही उड्डाण चाचणी `डीआरडीओ`च्या वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि सशस्त्र दलाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

'एक्स' या सामाजिक संपर्क माध्यमावर या संदर्भात माहिती देताना संरक्षणमंत्री  राजनाथ सिंह यांनी या उड्डाण चाचणीचे वर्णन ऐतिहासिक यशस्वरूप असे केले आहे. यामुळे भारताने अत्यंत प्रगत आणि उपयुक्त लष्करी तंत्रज्ञान असलेल्या निवडक देशांच्या समूहात स्थान मिळवले आहे, असे त्यांनी आपल्या या संदेशात नमुद केले आहे.  त्यांनी यशस्वी चाचणीसाठी `डीआरडीओ`, सशस्त्र दल आणि यात सहभागी उद्योग जगताचे अभिनंदनही केले आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि `डीआरडीओ`चे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी या यशस्वी मोहिमेत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या `डीआरडीओ`च्या चमूचे अभिनंदन केले आहे.

***

Jaydevi PS/N.Gaikwad/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2074015) Visitor Counter : 21