उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

संशोधन आणि नाविन्य हीच विकसित राष्ट्राचे ध्येय साध्य करण्याची गुरूकिल्ली : उपराष्ट्रपती

Posted On: 09 NOV 2024 3:13PM by PIB Mumbai

 

संशोधन आणि नावीन्य हीच विकसित राष्ट्राचे ध्येय साध्य करण्याची गुरूकिल्ली आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. “संशोधन आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात आपण किती अव्वल आहोत, यावरून जागतिक समुदायासमोर आपले कौशल्य सिद्ध होते,” असेही ते म्हणाले. शैक्षणिक संस्थांनी "नवोन्मेष आणि संशोधनाची मूस" म्हणून आपल्या क्षमतेचा उपयोग करण्याचे तसेच कॉर्पोरेट संस्थांनी भरीव योगदानाद्वारे या मोहिमेला पाठिंबा देण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले.

नवी दिल्लीतील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (NIT) चौथ्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना आज उपराष्ट्रपतींनी शैक्षणिक परिसंस्था बळकट करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भाष्य केले. माजी विद्यार्थी संघटनांनी सक्रिय सहभाग घेऊन योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

ज्या मुद्द्यांवर चर्चा होणे आणि प्रतिसाद मिळवणे आवश्यक आहे, अशा क्षेत्रांबाबत मी बोलणे आवश्यक आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले. ‘सर्वांना उपदेश करणे आणि आपल्या घटनात्मक संस्था दुष्ट असल्याचे भासवणे, ही बाब  राजकीय क्षेत्रात घटनात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या लोकांच्या लेखी सुद्धा मनोरंजनाची बाब बनत आहे. यामुळे राष्ट्राचे भले होत नाही. यामुळे अनागोंदी माजून आपल्या वाढीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे”, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादाशी अतूट बांधिलकी ठेवण्याचे आवाहनही उपराष्ट्रपतींनी केले. “राष्ट्रवादाप्रती अतुलनीय बांधिलकी आवश्यक आहे. पक्षपाती किंवा अन्य हितसंबंधांपेक्षा राष्ट्रीय हिताला प्राधान्य असले पाहिजे” , असे ते म्हणाले. उपराष्ट्रपतींनी आर्थिक राष्ट्रवादाची आवश्यकता देखील अधोरेखित केली. “आर्थिक राष्ट्रवाद हा व्यवसायाशी संबंधित एक प्रमुख मुद्दा आहे, यावर त्यांनी भर दिला.  कितीही न्याय्य, कितीही मोठे असो वा कितीही मोठे वित्तीय परिमाण असो, आर्थिक राष्ट्रवादाशी तडजोड करण्याची कोणतीही सबब चालणार नाही. अशी सबब राष्ट्राला प्रथम मानण्याच्या तत्त्वाशी आमची बांधिलकी नाकारते”, असे उपराष्ट्रपतींनी स्पष्ट केले.

भारताच्या कॉर्पोरेट क्षेत्रावर विश्वास व्यक्त करताना उपराष्ट्रपती म्हणाले, "मला विश्वास आहे की आपले कॉर्पोरेट नेतृत्व एके दिवशी नक्की पुढे येईल आणि आपल्या अनेक आणि पात्र संस्थांद्वारे त्यांचा कार्पोरेट सामाजिक जबाबदारी निधी उदारपणे उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध होईल."

युवकांना तंदुरुस्तीसह यश मिळवण्याचे, वाढीच्या संधी म्हणून आव्हानांना सामोरे जाण्याचे आणि उच्च उद्देश पूर्ण करण्याचे आवाहन करून जगदीप धनखड यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

उपराष्ट्रपतींच्या भाषणाचा येथे संपूर्ण मजकूर वाचा:  https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2071987  

***

M.pange/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2072025) Visitor Counter : 42