माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारताचा 55 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव: चित्रपट आणि कार्यक्रमांची वैविध्यपूर्ण श्रेणी
Posted On:
06 NOV 2024 10:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर 2024
गोव्याच्या विलोभनीय आणि सळसळत्या निसर्गसौंदर्याच्या देखण्या रंगछटा सिनेमाच्या रूपेरी झगमगाटात मिसळून गेलेल्या तुम्ही पाहिल्या आहेत? हे घडते इफ्फीमध्ये - ज्याठिकाणी जगाच्या कानाकोपऱ्यातील कथाकार आपली कला प्रदर्शित करण्यासाठी एकत्र येतात! आता अवघ्या काही दिवसांत, 55 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (आयएफएफआय -इफ्फी) गोव्यातील पणजी येथे आपले व्दार मुक्त करण्यासाठी सज्ज झाला आहे. गोव्याच्या सागरी किनारपट्टीवर सिनेमाचे नंदनवन फुलणार आहे. पुन्हा एकदा जागतिक संस्कृती, प्रतिभा आणि सिनेमॅटिक ‘सेलिब्रेशन’चे एक जिवंत केंद्र बनणार आहे. चित्रपट रसिक, चित्रपट उद्योगातील दिग्गज आणि इच्छुक चित्रपट निर्माते, केवळ त्यांच्या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठीच नाही तर ते देत असलेल्या अनोख्या अनुभवासाठीही इफ्फीकडे आकर्षित होतात. इफ्फीमध्ये या कलेला सांस्कृतिक सीमा नसतात त्यामुळे सर्व स्तरातील लोकांना सिनेमाच्या कलात्मकतेचे कौतुक करण्यासाठी इफ्फीचे आमंत्रण असते.
1952 मध्ये ‘इफ्फी’ची स्थापना झाल्यापासून, जगभरातील कथाकथन, संस्कृती आणि सर्जनशीलतेची विविधता साजरी करणाऱ्या चित्रपटांच्या प्रचारासाठी इफ्फी एक प्रमुख व्यासपीठ म्हणून विकसित झाले आहे. 2024 आवृत्तीही अशीच आकर्षक आहे. सिनेमा व्यवसायिकांची कार्यशाळा आणि प्रवेशयोग्यता त्याचबरोबर सर्वसमावेशकतेवर भर देण्याचे वचन यामध्ये दिले आहे. भारताचा चित्रपट उद्योग जागतिक स्तरावर एक प्रमुख सामग्री (कंटेट) निर्मिती केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, इफ्फी हा केवळ एक उत्सवच नाही तर तो आंतरराष्ट्रीय चित्रपटातील भारताच्या विकसित भूमिकेचे प्रदर्शन करणारा महत्वाचा कार्यक्रम आहे. तसेच सामाजिक माध्यम म्हणून चित्रपटाचे समाजाबरोबर असलेले ऋणानुबंध, समाजामध्ये होणारे परिवर्तन टिपणाऱ्या महान कलाकार, चित्रनिर्माते, दिग्दर्शक यांना ‘ट्रिब्युट’ म्हणून सलामी देणारा महोत्सव आहे.
इफ्फी चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याची, नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची आणि अनोख्या कथा सामायिक करण्याची संधी प्रदान करतो. त्याचे स्पर्धात्मक विभाग, नेटवर्किंग इव्हेंट्स आणि शैक्षणिक कार्यशाळांमुळे विशेषत: नवोदित चित्रपट निर्मात्यांसाठी हा महोत्सव एक आवश्यक व्यासपीठ बनला आहे. भारताचा चित्रपट उद्योग पारंभापासूनच विविध कथा, शैली आणि तंत्र यांची एक सळसळती परिसंस्था आहे आणि इफ्फी भारतीय चित्रपट निर्मात्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची ओळख करून देऊन, त्यातून वृद्धिंगत होतो.
55 व्या इफ्फीची ठळक वैशिष्ट्ये : चित्रपट आणि कार्यक्रमांची वैविध्यपूर्ण श्रेणी
यावर्षीच्या कार्यक्रमात प्रत्येकाला काहीतरी मिळाले पाहिजे, याची खात्री करून, क्युरेटेड सेगमेंटमध्ये 16 चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. हृदयस्पर्शी नाट्य असलेल्या कथानकापासून ते प्रखर माहितीपटांपर्यंत विविध सिनेमे असतील. सिनेमाच्या प्रत्येक क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे चित्रपट यामध्ये आहेत. इफ्फीमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा प्रीमियर प्रदर्शित करणा-यांचा उत्साह खूप असतो. त्यामुळे प्रेक्षकांना ‘ग्राउंडब्रेकिंग’ म्हणता येईल अशा कथानकांमध्ये डोकावून पाहता येते.
इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागामध्ये जगभरातील सांस्कृतिक आणि कलात्मकदृष्ट्या अपवादात्मक चित्रपटांची वैविध्यपूर्ण श्रेणी एकत्र आणली गेली आहे. चित्रपट उद्योगातील तज्ञांनी काळजीपूर्वक निवडलेल्या सिनेमांचा तसेच वर्षभरात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रदर्शित करून आपले वेगळे स्थान राखले आहे, त्यांचा यामध्ये समावेश आहे. इंडियन पॅनोरमा हा इफ्फीचा आणखी एक प्रमुख विभाग आहे. त्यामध्ये यंदा 25 फीचर फिल्म्स आणि 20 नॉन-फीचर फिल्म्स प्रदर्शित करण्यात येतील. इंडियन पॅनोरमामध्ये प्रारंभीचा चित्रपट म्हणून रणदीप हुड्डा यांच्या "स्वातंत्र्य वीर सावरकर" (हिंदी) हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल. यामध्ये परीक्षकांनी नामांकित 384 समकालीन भारतीय नोंदींमधून मुख्य प्रवाहातील 5 चित्रपटांसह 25 वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांचे पॅकेज निवडले आहे. 262 चित्रपटांच्या स्पेक्ट्रममधून निवडलेल्या इंडियन पॅनोरामामध्ये 20 नॉन-फीचर फिल्म्स प्रदर्शित केले जातील. नॉन-फीचर फिल्म्सचे पॅकेज उदयोन्मुख आणि प्रस्थापित चित्रपट निर्मात्यांच्या दस्तऐवजीकरण, छाननी, मनोरंजन आणि समकालीन भारतीय मूल्ये प्रतिबिंबित करण्याच्या क्षमतेचे उदाहरण देते. नॉन-फीचर फिल्मची श्रेणी हर्ष संगानी दिग्दर्शित ‘घर जैसा कुछ’ (लडाखी) या चित्रपटाने सुरू होणार आहे.
भारतीय चित्रपट जगतातील उदयोन्मुख कलाकारांचा सन्मान करण्यासाठी इफ्फी 2024 मध्ये नव्या पुरस्कार गटाचा - ‘पदार्पणात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा भारतीय फीचर फिल्म दिग्दर्शक’ – आरंभ करण्यात येत आहे. भारतीय सांस्कृतिक आणि भाषिक वैविध्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या, पदार्पणात दिग्दर्शकांनी केलेल्या पाच फिल्मना यंदाच्या महोत्सवात या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. या फिल्म ताजा दृष्टिकोन आणि त्याबरोबरच भारताच्या प्रादेशिक भागांमधील खास आगळ्यावेगळे कथन मोठ्या मंचावरील प्रेक्षकांसमोर घेऊन आल्या आहेत. लक्ष्मीप्रिया देवी दिग्दर्शित मणिपुरी फीचर फिल्म ‘बूंग’, नवज्योत बांदिवडेकर दिग्दर्शित मराठी फीचर फिल्म ‘घरत गणपती’, मनोहर के दिग्दर्शित कन्नड फीचर फिल्म ‘मिक्का बन्नड हक्की’ (बर्ड ऑफ ए डिफरंट फेदर), यत सत्यनारायण दिग्दर्शित तेलुगु फीचर फिल्म ‘रझाकार’ (सायलेंट जिनोसाईड ऑफ हैदराबाद) आणि रागेश नारायणन दिग्दर्शित मल्याळी फीचर फिल्म ‘तनुप्प’ (द कोल्ड) या पाच फिल्म भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशातील जीवनाचे दर्शन घडवतात. पदार्पणातील चित्रपटकारांच्या फिल्मचे प्रसारण करून इफ्फी नव्या प्रतिभेला प्रोत्साहन देत आहे आणि चित्रपटाच्या राष्ट्रीय परिदृश्यात प्रादेशिक प्रतिनिधीत्वाचे महत्त्व अधोरेखित करत आहे.
भारतीय चित्रपटाच्या श्रीमंत वारशाचे साजरीकरण म्हणून इफ्फी 2024 अभिनेते राज कपूर, दिग्दर्शक तपन सिन्हा, तेलुगु फिल्मचा मानबिंदू ठरलेले अक्किनेनी नागेश्वर राव (एएनआर) आणि गायक मोहम्मद रफी या चार मानबिंदूना शताब्दीनिमित्त आदरांजली वाहणार आहे. यातील प्रत्येकाने चित्रपट उद्योगात आगळेवेगळे व महत्त्वपूर्ण योगदान दिले असून आदरांजलीचा भाग म्हणून त्यांच्या कालातीत फिल्मच्या पुनरुज्जीवित प्रती महोत्सवात प्रदर्शित केल्या जाणार आहेत. या मानबिंदूंच्या चित्रपट जगतातील प्रवासाचे दर्शन घडवणारे उद्घाटन सोहळ्यातील विशेष दृक्-श्राव्य सादरीकरण नव्या प्रेक्षकांना चित्रपट जगताला आकार देण्यास हातभार लावलेल्या या मानबिंदूंचे जीवन आणि वारशाची ओळख करून देईल. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ – एनएफडीसीने कालातीत चित्रपटांच्या प्रतींचा दर्जा वाढवण्यासाठी पुनरुज्जीवनाचे काम हाती घेतले आहे.
सांस्कृतिक देवाणघेवाणीचे व्यासपीठ - ऑस्ट्रेलिया केंद्रस्थानी
इफ्फीमध्ये ‘कंट्री ऑफ फोकस’ शीर्षकांतर्गत सत्रात निवडक देशातील उत्तमोत्तम समकालीन फिल्मवर प्रकाशात आणल्या जातात. यंदा या सत्राच्या केंद्रस्थानी देश म्हणून ऑस्ट्रेलियाची निवड झाली असून जागतिक चित्रपटात ऑस्ट्रेलियाने नवोन्मेषी कथाकथन, वैविध्यपूर्ण कथा आणि आगळ्यावेगळ्या खास सांस्कृतिक दृष्टीकोनांसह दिलेले योगदान साजरे केले जाणार आहे. विविध शैलीतील सात ऑस्ट्रेलियाई फिल्म इफ्फीमध्ये प्रदर्शित केल्या जाणार आहेत. त्यामध्ये समीक्षकांची प्रशंसा लाभलेली नाट्ये, ताकदवान माहितीपट, दृश्यपरिणामकारक थरारपट आणि लक्षवेधी विनोदीपटांचा समावेश आहे. या चित्रपटांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंब असून तिथले स्थानिक समुदाय आणि आधुनिक समाज अशा दोहोंच्या कथा त्यात आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दृक्-श्राव्य सहनिर्मिती कराराची औपचारिकताही पूर्ण झाल्यामुळे ही भागीदारी उत्तमरित्या संरेखित होते आहे आणि त्यातून दोन देशांमध्ये चित्रपट क्षेत्रात खोलवर सहकार्यास पाठबळ मिळणार आहे.
चित्रपट प्रदर्शनांच्या पलिकडे : प्रात्यक्षिकांसह कार्यशाळा, मास्टरक्लास आणि भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा रेड कार्पेट सोहळा
या महोत्सवात चित्रपटांच्या प्रदर्शनांसोबतच, या कलाप्रकाराला योग्य आदर मिळावा या हेतूने इफ्फीच्या वतीने मास्टरक्लास, चर्चासत्रे, प्रात्यक्षिकांसह कार्यशाळा अशा विविध उपक्रमांचे आयोजन इफ्फीद्वारा केले जात आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या बहुप्रतीक्षित रेड कार्पेट इव्हेंटमध्ये चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरची झलक अनुभवायला मिळते. या इव्हेंटमध्ये प्रसिद्ध अभिनेते - अभिनेत्री, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते सहभागी होतात. या उपक्रमाच्या निमित्ताने कलाकार आणि चित्रपट निर्माते आपल्या कलाकृतींमधून मिळालेला आनंद साजरा करण्यासाठी तसेच कलेबद्दलचे आपले वेड परस्परांसोबत सामायिक करण्यासाठी एकत्र येतात, त्यामुळेच रेड कार्पेट इव्हेंटमुळे सिनेमाच्या मंतरलेल्या विश्वाचा साक्षात अनुभव घेण्याची संधी मिळते. या महोत्सवाच्या निमित्ताने इफ्फीचे प्रतिनिधी, चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते आणि उद्योग क्षेत्रातील तज्ञ परस्परांशी भेटतील, एकमेकांच्या संपर्कात येतील. या सगळ्याला जोडून यंदाही या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुन्हा एकदा 'क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो', 'फिल्म बाजार' आणि 'सिने मेला' या उपक्रमांच्या 2024 मधील आवृत्त्यांचे आयोजन केले जात आहे. एका अर्थाने या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला नवोदित कलावंतांसाठी 'एकाच ठिकाणी सर्वकाही' (One Stop Shop) हे नवे रुप दिले आहे.
यंदाचा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सर्वसमावेशकतेचे सर्वोत्तम उदाहरण ठरावा, या दिशेनेही मोहोत्सवाच्या आयोजन व्यवस्थापनाने महत्त्वाचे पाऊल टाकत, आयोजनाचा संपूर्ण परिसर हा दिव्यांग व्यक्तींसह प्रत्येकासाठी वावरण्याच्या दृष्टीने सुलभ आणि सोयीचा असावा याची सुनिश्चितीही केली आहे. यादृष्टीनेच प्रत्येकाला सिनेमाच्या मंतरलेल्या विश्वाचा आनंद घेता यावा याकरता आयोजन परिसरात रॅम्प, हँडरेल, स्पर्षाने मार्ग ओळखण्याची सोयी, ब्रेल लिपीमधील फलक, पार्किंगची जागा आणि इतर सुलभेच्या असंख्य सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. यातून हा महोत्सव सर्वसमावेशक ठरावा याबद्दलची आयोजकांची बांधिलकीच दिसून येते. याअनुषंगानेच आयोजनाचा संपूर्ण परिसर सर्वांसाठी अडथळामुक्त असेल असे नियोजन करण्यावरच भारताचा भर असल्याचेही ठळकपणे दिसून येते. याशिवाय या सर्व प्रयत्नांमधून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक उपक्रमांमध्ये भारत सर्वसमावेशक दृष्टिकोन बाळगूच वाटचाल करत असल्याचेही प्रतिबिंबित होत आहे.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची उत्साहपूर्ण भावना : संक्षिप्त स्वरुपातील इतिहास
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा आशियातील प्रमुख चित्रपट महोत्सवांपैकी एक असून, या महोत्सवाची सुरुवात 1952 मध्ये झाली होती. त्यानंतर 2004 सालापासून आपल्या खुल्या आणि मुक्त वातारवणाच्या भावनेने नावाजलेले आणि जागतिक आकर्षणाचे केंद्र असलेले गोवा हे या महोत्सवाच्या आयोजनाचे कायमस्वरुपी ठिकाण म्हणून नावारुपाला आले. गेल्या काही वर्षांत या महोत्सवाची प्रतिष्ठा खूपच वाढली आहे, महत्वाचे म्हणजे चित्रपट निर्मात्या संस्थांच्या आंतरराष्ट्रीय महासंघाची (Film Producers’ Associations - FIAPF) मान्यताही या महोत्सवाने मिळवली आहे. आता या महोत्सवाने जगातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धात्मक चित्रपट महोत्सवांमध्ये स्थान मिळवले आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने, गोवा राज्य सरकारच्या अखत्यारीतील गोवा मनोरंजन सोसायटीच्या (Entertainment Society of Goa, Government of Go) सहकार्याने दरवर्षी संयुक्तपणे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाते. यापूर्वी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारितील चित्रपट महोत्सव संचालनालयाकडे (Directorate of Film Festivals) या महोत्सवाच्या आयोजनाची मुख्य जबाबदारी होती, मात्र फिल्म मीडिया युनिट्सचे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळात (National Film Development Corporation - NFDC) विलीनीकरण झाल्यानंतर, या आयोजनाची मुख्य जबाबदारी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या वतीने सांभाळली जात आहे. आजवर हा महोत्सव जगभरातील प्रेक्षक, चित्रपट दिग्दर्शक आणि सिने प्रेमींना जोडणारा सांस्कृतिक सेतू म्हणून काम करत आला आहे. महत्वाची गोष्ट अशी की या महोत्सवाने जागतिक स्तरावर चित्रपट निर्मिती कलेविषयीचा आदर वाढवण्यात मोठी भूमिका बजावली आहे.
सारांश
गोव्यात लवकरच 55वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू होईल. मात्र हा महोत्सव म्हणजे चित्रपट संग्रहित करून त्याचे खेळ दाखवण्याच्या पलिकडे जाणारा महोत्सव आहे. हा महोत्सव म्हणजे एकता, सर्जनशीलता आणि परस्पर सामायिक मानवी अनुभुतीचे दर्शन घडवणारा महोत्सव. खरे तर हा महोत्सव म्हणजे कथा मांडण्याच्या जागतिक भाषेच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणणारी भावना आहे. हा महोत्सव म्हणजे एक असा मंच आहे, जिथे वैविध्यपूर्ण मतांची अभिव्यक्ती पाहायला मिळते आणि ती साजरीही केली जाते. यंदाचा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे दिग्गजांना आदरांजली वाहणारा, उदयोन्मुख प्रतिभेचा सोहळा आणि त्याचवेळी सर्वसमावेशकतेचे मूल्य जपणारा महोत्सव असणार आहे. हा महोत्सव म्हणजे जागतिक चित्रपट सृष्टीत भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या वारशाची शाश्वततेच्या दिशेने होत असलेली वाटचाल अधिक ठाशीव करणारा महोत्सव असणार आहे.
References
https://www.iffigoa.org/public/press_release/Press%20Release_Press%20Information%20Bureau.pdf
https://iffigoa.org/
https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=2067309
https://www.iffigoa.org/public/press_release/screening.pdf
https://www.iffigoa.org/public/press_release/IFFI%202024%20announces%20Official%20Selection%20for%20%E2%80%98Best%20Debut%20Director%20of%20Indian%20Feature%20Film%E2%80%99%20Category.pdf
https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=2067101
https://x.com/IFFIGoa/status/1850175729285116372/photo/1
Click here to download PDF
S.Tupe/Suvarna/Reshma/Tushar/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2071537)
Visitor Counter : 134