पोलाद मंत्रालय
पोलाद मंत्रालयाने नवी दिल्ली येथे एक दिवसीय चिंतन शिबिराचे केले आयोजन
पोलाद मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले होते
Posted On:
31 OCT 2024 8:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2024
उदयोन्मुख स्पर्धात्मक जागतिक आणि देशांतर्गत परिस्थितीमुळे पोलादाशी संबंधित केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना (सीपीएसईंना) त्यांचे पोलाद उत्पादन प्रकल्प तसेच खाणींच्या कामकाजाच्या पारंपरिक पद्धतीला आव्हान देऊन कार्यान्वयन आणि व्यवसाय संचालनाची नवीन धोरणे शोधून त्यांचा अवलंब करणे बंधनकारक आहे, असे पोलाद मंत्रालयाचे सचिव पौंडरिक आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हणाले. जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी सीपीएसईनी संभाव्य परतावा किंवा फलनिष्पत्ती सिमित करणाऱ्या पुराणमतवादी दृष्टीकोनाचा त्याग करावा असे आवाहन पौंडरिक यांनी केले.
पोलादाशी संबंधित केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी (सीपीएसई) प्रकल्प व्यवस्थापनासाठी नवीन धोरणे स्वीकारली पाहिजेत आणि प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी प्रकल्पाच्या संकल्पनेपासून कराराला अंतिम रूप देण्यापर्यंत आणि त्यानंतरच्या अंमलबजावणीपर्यंतचा कालावधी कमी केला पाहिजे, यावर पोलाद मंत्रालयाच्या सचिवांनी भर दिला. या चिंतन शिबिरात ब्लास्ट फर्नेससंबंधातील नवीन उपक्रम आणि ऊर्जा बचतीच्या उपाययोजनांवरील सादरीकरणांचे चांगलेच कौतुक झाले.
चर्चेदरम्यान, पोलादाशी संबंधित केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या (सीपीएसई) परदेशातील उपस्थितीचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. ऑप्टिमायझेशन सुनिश्चित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा मशीन लर्निंग प्रक्रिया विविध क्षेत्रात वापरली जाऊ शकते. केवळ उत्पादन क्षेत्रच नाही तर मालमत्तेचे व्यवस्थापन आणि मूल्यमापन, सुरक्षितता, कच्च्या मालाची गुणवत्ता अंदाज, डेटा विश्लेषण, आरोग्य क्षेत्र, पर्यावरणीय प्रभाव, मानव संसाधन व्यवस्थापन इ. या क्षेत्रात देखील कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा मशीन लर्निंग प्रक्रिया वापरली जाऊ शकते.
पोलादाशी संबंधित केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या (सीपीएसई) पॅनेल सदस्यांनी चिंतन शिबिरात तंत्रज्ञान अद्यतनीकरण, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग; जलद प्रकल्प अंमलबजावणी कराराचा मान्यतापूर्व आणि मान्यता मिळाल्यानंतरची कृती अंमलबजावणी; आंतरराष्ट्रीय मालमत्ता संपादन; हरित पोलाद उत्पादनाच्या दिशेने ब्लास्ट फर्नेस क्षेत्रात नवीन उपक्रम आणि ऊर्जा बचतीचे उपाय यासारख्या विषयांवर सादरीकरण केले.
हा कार्यक्रम आपल्याला भारतीय पोलाद क्षेत्राच्या वाढीचा आणि विकासाचा विस्तृत मार्ग तयार करण्यास मदत करेल, अशी अपेक्षा या चर्चासत्राचा समारोप करताना पोलाद मंत्रालयाच्या सचिवांनी व्यक्त केली. भविष्यात होणाऱ्या संमेलनांसाठी आलेल्या सूचनांचेही त्यांनी कौतुक केले.
* * *
S.Patil/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2069905)
Visitor Counter : 41