संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्र्यांनी तवांग येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘देश का वल्लभ’ पुतळ्याचे आणि मेजर रालेन्गनाओ ‘बॉब’ खाथिंग यांच्या ‘म्युझियम ऑफ वॅलर’चे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले; त्यांनी या स्मारकांचे एकता आणि सामर्थ्याचे प्रतीक म्हणून वर्णन केले
Posted On:
31 OCT 2024 2:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2024
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 31 ऑक्टोबर 2024 रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे ‘देश का वल्लभ’ या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे आणि मेजर रालेन्गनाओ ‘बॉब’ खाथिंग यांच्या ‘म्युझियम ऑफ वॅलर’चे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. त्यांनी आसाममधील तेजपूर येथील 4 कोअर मुख्यालयातून हे उद्घाटन केले. ते तवांगला प्रत्यक्ष भेट देणार होते, पण खराब हवामानामुळे जाऊ शकले नाहीत. हा उद्घाटन सोहळा दीपावली सणासोबतच ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साठी सुद्धा आयोजित केला होता, जो भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.
राजनाथ सिंह यांनी भारताचे ‘लोहपुरुष’ म्हणून ओळखले जाणारे सरदार पटेल यांना आदरांजली अर्पण केली आणि स्वातंत्र्यानंतर 560 हून अधिक संस्थानांचे एकत्रीकरण करण्यातील त्यांचे महत्त्वपूर्ण कार्य लक्षात आणून दिले. “हा ‘देश का वल्लभ’ पुतळा लोकांना एकतेतील सामर्थ्याची आणि आपल्या विविधतेने भरलेल्या देशाच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या दृढतेची आठवण करून देईल,” असे त्यांनी यावेळी सांगितले.
संरक्षण मंत्र्यांनी मेजर बॉब खाथिंग यांनाही आदरांजली वाहिली, ज्यांनी ईशान्य भारताच्या आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात अमूल्य योगदान दिले. “मेजर खाथिंग यांनी केवळ तवांगचे शांततेत भारतात एकत्रीकरण केले नाही, तर सशस्त्र सीमा बल, नागालँड आर्म्ड पोलीस आणि नागा रेजिमेंट यांसारख्या महत्त्वपूर्ण लष्करी आणि सुरक्षा संरचनांची स्थापना केली. ‘म्युझियम ऑफ वॅलर’ आता त्यांच्या शौर्य आणि दूरदृष्टीचे प्रतीक म्हणून उभे आहे, जे येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल,” असेही त्यांनी सांगितले.
* * *
S.Patil/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2069845)
Visitor Counter : 90