संरक्षण मंत्रालय
संरक्षण संशोधन आणि विकास नव्याने परिभाषित करण्यासाठी डीआरडीओतील आमूलाग्र बदल’ याविषयी विचारमंथनाकरिता डीआरडीओ संचालक संमेलन 2024 या दोन दिवसीय कार्यक्रमाचा पुण्यात प्रारंभ
Posted On:
25 OCT 2024 8:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2024
डीआरडीओ संचालक संमेलन 2024 या दोन दिवसीय कार्यक्रमाचा 25 ऑक्टोबर 2024 रोजी पुण्यातील आयुध संशोधन आणि विकास आस्थापना येथे प्रारंभ झाला.डीआरडीओ च्या या वार्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओ चे अध्यक्ष डॉ.समीर व्ही कामत यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या भाषणात, डीआरडीओ अध्यक्षांनी आजच्या जागतिक परिस्थितीत तंत्रज्ञानाधारित नेतृत्वाच्या निकडीवर भर दिला.
‘संरक्षण संशोधन आणि विकास नव्याने परिभाषित करण्यासाठी डीआरडीओतील आमूलाग्र बदल’ या संकल्पनेवर आधारित विविध सत्रांचे आयोजन या परिषदेत करण्यात येत आहे. डीआरडीओला अधिक कार्यक्षम संस्था बनवण्याच्या दिशेने अंमलबजावणी केलेल्या किंवा अंमलबजावणी सुरू असलेल्या डीआरडीओ च्या सुधारणांच्या मालिकेबद्दल अवगत करण्याचा यामागचा उद्देश आहे.
या कार्यक्रमात संरक्षण तंत्रज्ञानामध्ये देशाला अग्रगण्य राष्ट्र बनविण्याच्या दिशेने उद्योग आणि शैक्षणिक संस्थांच्या व्यापक सहभागाद्वारे मजबूत संशोधन आणि विकास परिसंस्था विकसित करण्यावर चर्चा करण्यात आली. विविध विचारमंथन सत्रे आणि शैक्षणिक संशोधन आणि उद्योग यांच्या सहभागातून संरक्षण संशोधन आणि विकास क्षमता वाढीसाठी पूर्ण सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. पुढील वाटचालीसाठी संकल्पना आणि सूचनांची देवाणघेवाण करून संमेलनाचा समारोप होईल.
विविध तंत्रज्ञान आणि कॉर्पोरेट समूहाचे महासंचालक, प्रयोगशाळांचे संचालक आणि कार्यक्रम संचालक, मुख्यालयाचे कॉर्पोरेट संचालक आणि एकात्मिक आर्थिक सल्लागारांसह डीआरडीओ चे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2068285)
Visitor Counter : 27