संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सिंगापूरच्या संरक्षण मंत्र्यांच्या सह-अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत 6 वा भारत-सिंगापूर संरक्षण मंत्रीस्तरीय संवाद


महत्वपूर्ण क्षेत्रात उद्योग सहकार्यासह संरक्षण सहकार्य अधिक विस्तारण्याबाबत सहमती

प्रादेशिक शांतता,स्थैर्य आणि सुरक्षिततेच्या सामायिक दृष्टिकोनावर आधारित दीर्घकालीन संबंधांची घेतली दखल

Posted On: 22 OCT 2024 8:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर 2024

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सिंगापूरचे संरक्षण मंत्री डॉ एनजी इंग हेन यांच्या सह-अध्यक्षतेखाली 22 ऑक्टोबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे सहावा भारत-सिंगापूर संरक्षण मंत्रीस्तरीय संवाद पार पडला. दोन्ही मंत्र्यांनी प्रादेशिक शांतता, स्थैर्य आणि सुरक्षिततेच्या सामायिक दृष्टिकोनावर आधारित दृढ आणि दीर्घकालीन संबंधांची दखल घेतली.

भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणाला एक दशक पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची असून  सिंगापूरने आर्थिक सहकार्य आणि सांस्कृतिक संबंधांना चालना देण्यात आणि प्रदेशातील देशांबरोबर धोरणात्मक संपर्क  विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

उभय देशांमधील वाढत्या संरक्षण सहकार्याबद्दल दोन्ही मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. गेल्या काही  वर्षांत दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमध्ये नियमित संवाद  होत आहे.भारत आणि सिंगापूर दरम्यान प्रस्थापित झालेल्या राजनैतिक संबंधांना 2025 मध्ये 60 वर्षे पूर्ण होत असल्याने, संरक्षण सहकार्य आणखी वाढवून नवीन कामगिरी करण्यास दोन्ही मंत्र्यांनी सहमती दर्शवली. संयुक्त लष्करी प्रशिक्षण हा लष्कराबाबतचा द्विपक्षीय करार पुढील पाच वर्षांसाठी वाढवण्यासही त्यांनी दुजोरा दिला.

संरक्षण उपकरणांचा सह-विकास आणि सह-उत्पादन सुरू करण्यासाठी उभय राष्ट्रे नैसर्गिक भागीदार आहेत हे जाणून, ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या विशिष्ट क्षेत्रांमध्ये सहकार्याचा धांडोळा घेण्याबरोबरच उद्योग सहकार्य वाढविण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली. दोन्ही मंत्र्यांनी सायबर सुरक्षेसारख्या उदयोन्मुख क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला.

राजनाथ सिंह यांनी 2021 ते 2024 या कालावधीत आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भारतासाठी देश समन्वयक म्हणून सिंगापूरने दिलेल्या समर्थनाबद्दल डॉ एनजी इंग हेन यांचे आभार मानले. आशियातील शांतता आणि स्थैर्यासाठी भारत हा एक धोरणात्मक अभिव्यक्ती असल्याची दखल सिंगापूरच्या संरक्षण मंत्र्यांनी घेतली. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिंगापूर भेटीदरम्यान द्विपक्षीय संबंध हे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीमध्ये वाढले होते.

संवादापूर्वी, भेट देणाऱ्या मान्यवरांचे औपचारिक स्वागत केल्यानंतर त्यांना तिन्ही दलांतर्फे गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

तत्पूर्वी, सिंगापूरच्या संरक्षणमंत्र्यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकात शहीद वीरांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

डॉ एनजी इंग हेन 21 ते 23 ऑक्टोबर 2024 या कालावधीत भारत भेटीवर आहेत.

S.Patil/S.Kane/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2067190) Visitor Counter : 43