राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतली मलावीच्या राष्ट्राध्यक्षांची भेट; उभय नेत्यात प्रतिनिधीमंडळ स्तरीय चर्चा


कला आणि संस्कृती, युवाविषयक, क्रीडा आणि औषधनिर्मिती सहकार्यावरील सामंजस्य करारांवर स्वाक्षरी

मुर्मू यांनी काल मलावीमध्ये भारतीय समुदायाला केले संबोधित

Posted On: 18 OCT 2024 9:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2024

मलावी भेटीच्या दुसऱ्या दिवशी (18 ऑक्टोबर, 2024) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्टेट हाऊस, लिलोंग्वे येथे भेट दिली.  मलावीचे राष्ट्राध्यक्ष डॉ लाझारस मॅकार्थी चकवेरा यांनी त्यांचे स्वागत केले. भारत-मलावी संबंध अधिक दृढ करण्यासाठी उभय नेत्यांनी विविध मुद्द्यांवर फलदायी चर्चा केली.

राष्ट्रपतींच्या उपस्थितीत  कला आणि संस्कृती, युवा बाबी, क्रीडा आणि औषधनिर्मिती सहकार्यावरील सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत भारताकडून मलावीला मानवतावादी सहाय्य म्हणून 1000 मेट्रिक टन तांदूळ प्रतीकात्मकरित्या आणि भाभाट्रॉन कर्करोग उपचार करणारे मशीन सुपूर्द करण्यात आले. मलावीमध्ये कायमस्वरूपी कृत्रिम अवयव फिटमेंट सेंटर (जयपूर फूट) स्थापन करण्यासाठी भारत सरकारच्या साहाय्याची घोषणा त्यांनी केली.

तत्पूर्वी सकाळी, राष्ट्रपतींनी लिलोंग्वे येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली आणि पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात आणि इतर लष्करी कारवायांमध्ये प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिक आणि नागरिकांना पुष्पांजली अर्पण केली. मलावीचे पहिले अध्यक्ष डॉ. हेस्टिंग्ज कामुझू बांडा  यांचे स्मारक- कामुझु कबरीवरही त्यांनी पुष्पहार अर्पण केला.

मलावी येथील भारतीय उच्चायुक्तांनी काल संध्याकाळी (17 ऑक्टोबर, 2024), आयोजित केलेल्या स्वागत समारंभात राष्ट्रपतींनी मलावीमधील भारतीय समुदायाच्या सदस्यांना संबोधित केले.

यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, भारत, आफ्रिकेबरोबरच्या आपल्या भागीदारीला, परस्पर विश्वास, समानता आणि परस्पर हित, या तत्त्वांच्या आधारावर महत्त्व देतो. विकास भागीदारी, क्षमता विकास, व्यापार आणि आर्थिक सहकार्य, संरक्षण आणि सुरक्षा आणि एकमेकांच्या जनतेचा परस्पर संपर्क, हे आपल्यातील सहकार्याचे प्रमुख आधारस्तंभ आहेत, आणि यापैकी प्रत्येक स्तंभ, भारत-आफ्रिका संबंधांसाठी महत्वाचा आहे, असे त्या म्हणाल्या.

राष्ट्रपती म्हणाल्या की, आफ्रिकन युनियनला जी-20 संघटनेचा स्थायी सदस्य बनवण्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.  ग्लोबल साऊथमधील प्रमुख सदस्य म्हणून, भारत ग्लोबल साउथच्या देशांना आपले अनुभव आणि क्षमतांचा लाभ देत राहील.

राष्ट्रपती म्हणाल्या की, आपला समुदाय हा भारताच्या परिवर्तशील प्रवासाचा अविभाज्य भाग आहे. भारतीय समुदायाने या प्रवासाचे सोबती व्हावे, आणि भारताचे विकासाचे उद्दिष्ट पुढे घेऊन जावे, असे आवाहन त्यांनी केले.

अल्जेरिया, मॉरिटानिया आणि मलावी या तीन देशांना भेट देऊन नवी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी, राष्ट्रपती उद्या (19 ऑक्टोबर 2024), लिलोंगवे येथील श्री राधा कृष्ण मंदिरात आरती आणि पूजा करतील, तसेच मलावी तलावाला भेट देतील.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -

S.Kakade/V.Joshi/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2066255) Visitor Counter : 39