गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सोमवार, 21 ऑक्टोबर 2024 रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रीय पोलीस स्मारक येथे पोलीस स्मृती दिनानिमित्त शहिदांना वाहणार आदरांजली
Posted On:
18 OCT 2024 8:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2024
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सोमवार, 21 ऑक्टोबर 2024 रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रीय पोलीस स्मारक येथे पोलीस स्मृती दिनानिमित्त शहिदांना आदरांजली अर्पण करतील.
लडाखमधल्या हॉट स्प्रिंग्स येथे 21 ऑक्टोबर 1959 रोजी चिनी सैन्याने अचानक केलेल्या जोरदार हल्ल्यात दहा शूर जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या हुतात्म्यांच्या आणि कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या अन्य सर्व शहिदांच्या स्मरणार्थ 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो.
संपूर्ण देशभरात 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय पोलीस स्मारक येथे आयोजित करण्यात येणाऱ्या मुख्य कार्यक्रमात पोलीस शहिदांना आदरांजली वाहिली जाते. दिल्ली पोलिसांसह सीएपीएफ अर्थात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची संयुक्त परेड आयोजित केली जाते. केंद्रीय गृहमंत्री, राज्यमंत्री, खासदार, सीएपीएफ/सीपीओचे प्रमुख आदि शहीदांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहतात. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री शहिदांचे स्मरण करून उपस्थितांना संबोधित करतात आणि पोलीस यंत्रणेशी संबंधित आव्हानांबाबत अवगत करतात. निवृत्त महासंचालक, पोलीस दलातील अधिकारी आणि इतर मान्यवरही यावेळी उपस्थित असतात.
केंद्रीय गृहमंत्री हॉट स्प्रिंग्सच्या शहिदांना समर्पित वेदीवर पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा समारोप करतात.
पोलीस स्मृती दिनाच्या पश्चात, सीएपीएफ/सीपीओ द्वारे 22 ते 30 ऑक्टोबरदरम्यान राष्ट्रीय पोलीस स्मारक येथे शहिदांच्या कुटुंबीयांच्या भेटी, पोलिस बँड प्रदर्शन, मोटारसायकल रॅली, शहिदांच्या स्मरणार्थ दौड, रक्तदान शिबिर, निबंध/चित्रकला स्पर्धा, पोलीस कर्मचाऱ्यांचे बलिदान, शौर्य आणि सेवा दर्शविणाऱ्या व्हिडिओ फिल्म्स यासारख्या कार्यक्रमांबरोबरच विविध स्मृती कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कालावधीत सर्व पोलीस दलांद्वारे देशभरात अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
S.Kakade/V.Joshi/P.Malandkar
(Release ID: 2066219)
Visitor Counter : 80