दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
महिलांच्या नेतृत्वाखालील सहभागाचा ऐतिहासिक टप्पा गाठत आयटीयुडब्ल्यूटीएसए 2024 मध्ये दूरसंचार मापदंड निश्चितीत लिंगभाव समानता साध्य करण्यात मोठे यश
मानक विकासात महिलांच्या सहभागाला चालना देणे ही केवळ महिलांच्या संख्येशी संबंधित बाब नव्हे तर महिलांच्या मतांना महत्त्व देण्याची, भविष्यातील नेतृत्वाना सक्षम करण्याची आणि समावेशकतेची जोपासना करण्याची सुनिश्चिती करून घेण्याची बाब आहे : आयटीयुच्या सरचिटणीस डोरीन बॉग्डन मार्टिन
Posted On:
18 OCT 2024 2:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2024
केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाच्या सहयोगासह नवी दिल्ली येथे आयोजित आयटीयुडब्ल्यूटीएसए 2024 म्हणजेच यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ-जागतिक दूरसंचार मानक मंडळाच्या बैठकीत काल दूरसंचार मानकांच्या क्षेत्रात लिंगभाव विविधतेला चालना देण्यावर केंद्रित असलेली अत्यंत महत्त्वाची घडामोड पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघातील (आयटीयु-टी) दूरसंचार मानक क्षेत्राच्या नेतृत्वाखाली नेटवर्क ऑफ विमेन इन स्टँडर्ड्स (एनओडब्ल्यू) या विशेष कार्यक्रमाने एसटीईएम आणि मानकीकरण क्षेत्रात महिलांच्या प्रमुख भूमिकेला चालना देण्याप्रती कटिबद्धता अधोरेखित केली.
डब्ल्यूटीएसएच्या 55 व्या ठरावाशी (अरईव्ही.जिनिव्हा,2022) सुसंगत असलेले आयटीयु-टी मधील नेटवर्क ऑफ विमेन इन स्टँडर्ड्स (एनओडब्ल्यू) मानकीकरण उपक्रमांमध्ये महिलांच्या सक्रीय सहभागाला खतपाणी घालून आयटीयु-टी प्रक्रियांच्या दरम्यान लिंगभाव समावेशक दृष्टीकोनाची सुनिश्चिती करण्याप्रती समर्पित आहे. तंत्रज्ञानाच्या भवितव्याला आकार देण्यात महिलांची अत्यंत महत्त्वाची भूमिका लक्षात घेत, डिजिटल समावेशकतेसाठी जागतिक पातळीवर आग्रही भूमिका व्यक्त होत असताना सुरु झालेला हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.
आयटीयुच्या सरचिटणीस डोरीन बॉग्डन मार्टिन यांनी त्यांच्या भाषणात या क्षेत्रातील लिंगभाव असमानतेची समस्या सोडवण्याच्या महत्त्वावर अधिक भर दिला. त्या म्हणाल्या, “आपण आपल्या क्षेत्रात, विशेषतः आपल्या मानक विषयक अभ्यास गटांमध्ये नेतृत्व करणाऱ्या महिलांची संख्या वाढवली पाहिजे, आणि आपण हे साध्य करू शकतो. महिलांना सक्षम आणि आधारभूत वाटेल असे वातावरण निर्माण करणे हेच नेटवर्क ऑफ विमेन मधून देखील अपेक्षित आहे. या परिवर्तनात मार्गदर्शनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मार्गदर्शनातून, संधी निर्माण करून आणि आपले ज्ञान सामायिक करुन आपण खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. सर्वांना पुढे जाण्यासाठी चालना देणे, एकमेकांना मदत करणे आणि संपूर्ण मानवतेद्वारे डिजिटल भविष्याची उभारणी सुनिश्चित करणे आपण यापुढेही सुरूच ठेवू. आपण एकत्रितपणे डिजिटल समावेशनाच्या दिशेने खरी प्रगती साध्य करू शकतो आणि आपण ती करुच.”
एनओडब्ल्यू, आयटीयुचे प्रमुख आणि ट्यूनिसी टेलिकॉममध्ये डिजिटल परिवर्तनासंबंधी मुख्य नवोन्मेष आणि धोरण अधिकारी डॉ.रिम बेल्हासिन-चेरीफ यांनी आयटीयु-डब्ल्यूटीएसए 2024 मध्ये लिंगभाव समतोल साध्य करण्यात झालेली प्रगती अधोरेखित केली. गट चर्चा, प्रशिक्षण सत्रे, चाचण्या इत्यादींसारखे विविध उपक्रम आणि क्षेत्रीय तयारी गटाच्या पाठींब्याने आपण आयटीयु-डब्ल्यूटीएसएच्या इतिहासातील महिलांचा सर्वोच्च सहभाग दर गाठण्यात यशस्वी झालो आहोत असे ते म्हणाले.
कृत्रिम बुद्धीमत्तेसारख्या (एआय) व्यत्ययकारी तंत्रज्ञानांचा उदय होत असताना आयसीटी मानकीकरण क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग महत्त्वाचा आहे. महिलांचे योगदान संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी तंत्रज्ञानविषयक प्रगतीला चालना देणाऱ्या समावेशक, न्याय्य आणि शाश्वत मापदंडांचा विकास सुनिश्चित करण्यात मदत करू शकेल.
“समावेशक एआयसाठीचे मानके” या विषयावरील गट चर्चेदरम्यान उपस्थित तज्ञांनी एआयमधील लिंगभावना समानतेच्या संदर्भातील आव्हानांचे परीक्षण आणि चर्चा केली तसेच त्यांनी समावेशक एआय ला मदत करण्यासाठीच्या तंत्रज्ञानविषयक मानकांसाठी आवश्यक प्रोत्साहने आणि संधींवर प्रकाश टाकला. लिंगभेद दूर करण्यासाठी तसेच न्याय्य भविष्याची खात्री करून घेण्यासाठी मापदंड कशी मदत करू शकतात याचा शोध घेण्यासाठीच्या मार्गांवर देखील यावेळी उपस्थितांनी चर्चा केली.
सांख्यिकीय तसेच रुढीवादी अशा दोन्ही प्रकारच्या पक्षपाती वृत्तींचा सामना करत, अशा पक्षपाताचे प्रमाण कमी करत तसेच दूरसंचार आणि तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांच्या सक्रीय सहभागाला चालना देत आयटीयु-डब्ल्यूटीएसए 2024 ने दूरसंचार क्षेत्रातील लिंगभाव समानता विषयक महत्त्वपूर्ण चर्चा सुरु ठेवली आहे.
Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2066056)
Visitor Counter : 48