संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नौदलाच्या आठव्या IBSAMAR VIII या संयुक्त बहुराष्ट्रीय सागरी सरावात सहभागी होण्यासाठी आयएनएस तलवार दक्षिण आफ्रिकेत दाखल

Posted On: 09 OCT 2024 7:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 ऑक्‍टोबर 2024

 

भारतीय नौदलाची ‘आयएनएस तलवार’ ही आघाडीची स्टेल्थ युद्धनौका, 06 ते 18 ऑक्टोबर 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आठव्या IBSAMAR VIII या भारत, ब्राझिल आणि दक्षिण आफ्रिकेच्या नौदलाच्या संयुक्त बहुराष्ट्रीय सागरी सरावात सहभागी होण्यासाठी, 06 ऑक्टोबर 24 रोजी, दक्षिण आफ्रिकेतील सायमन्स टाऊन येथे दाखल झाली.

तिन्ही देशांच्या नौदलांची परस्परांबरोबर काम करण्याची क्षमता आणि सामंजस्य वाढवणे, हे या सरावाचे उद्दिष्ट आहे. ही संकल्पना ब्लू वॉटर नेव्हल वॉरफेअरवर (नौदल युद्ध तंत्र) आधारित असून, यामध्ये सागरी पृष्ठभागावरील तसेच विमान विरोधी युध्द तंत्राचा समावेश आहे.

IBSAMAR VIII सरावाच्या बंदरामधील टप्प्यात व्यावसायिक देवाणघेवाण, नुकसान नियंत्रण आणि अग्निशमन कवायती, भेटी, बोर्ड, शोध आणि जप्ती प्रात्यक्षिके , क्रॉस-बोर्डिंग, विमान वाहतूक सुरक्षा व्याख्याने, संयुक्त डायव्हिंग ऑपरेशन्स, सागरी प्रशासन परिषदा, क्रीडा संवाद, परस्परांच्या युद्ध नौकांना भेटी, आणि विशेष दल आणि कनिष्ठ अधिकारी यांच्यातील संवाद याचा समावेश असेल.

बहु-पक्षीय संवाद हा मैत्रीचा महत्वाचा सेतू असून, तो परस्परांवरील विश्वास वाढवतो आणि शांततापूर्ण सागरी क्षेत्र आणि सकारात्मक सागरी वातावरणाच्या समान ध्येयाकडे प्रवास करणाऱ्या  किनारपट्टी प्रदेशातील समविचारी देशांच्या नौदलांची परस्परांबरोबर काम करण्याची क्षमता विकसित करतो.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील संरक्षण सहकार्य उत्तरोत्तर वृद्धिंगत होत आहे. दोन्ही देशांच्या नौदलांमध्ये 26-28 ऑगस्ट 2024 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या चर्चेच्या 12 व्या फेरीपासून, दोन्ही नौदलांमध्ये ऑपरेशनल सी ट्रेनिंग आणि पाणबुडी बचाव सहकार्य सुरू झाले आहे.

दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करणे आणि प्रत्यक्ष सहयोग आणि परस्पर विकासाप्रति असलेल्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करणे, हे आयएनएस तलवारच्या या भेटीचे उद्दिष्ट आहे.

आयएनएस तलवार 18 जून 2003 रोजी भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू झाली असून, ती भारतीय नौदलाच्या पश्चिमी ताफ्याचा एक भाग आहे, आणि मुंबईतील पश्चिम नौदल  कमांड  अंतर्गत कार्यरत आहे. कमांड कॅप्टन जिथू जॉर्ज, या युद्ध नौकेचे कमांडिंग अधिकारी आहेत. 

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2063649) Visitor Counter : 57


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi