संरक्षण मंत्रालय
भारतीय हवाई दलाचा 92 वा वर्धापनदिन तसेच कारगिलमधील विजयाला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त थोईसे ते तवांग दरम्यान काढण्यात आलेल्या वायू वीर विजेता कार रॅलीला aझेंडा दाखवून औपचारिकरित्या केले रवाना
Posted On:
08 OCT 2024 7:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2024
भारतीय हवाई दलाचा (आयएएफ) 92 वा वर्धापनदिन तसेच कारगिलमध्ये भारताला 1999 मध्ये मिळालेल्या विजयाला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त काढण्यात आलेल्या ‘वायू वीर विजेता’ कार रॅलीला आज 08 ऑक्टोबर 2024 रोजी, केंद्रीय महामार्ग राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांच्या हस्ते थोईसे येथे झेंडा दाखवून औपचारिकरित्या रवाना करण्यात आले. हवाई योद्धे, लष्करी कर्मचारी, हवाई दलातील निवृत्त व्यक्ती तसेच उत्तराखंड युध्द स्मारक संस्थेचे (युडब्ल्यूएम) सदस्य अशा एकूण 50 जणांच्या पथकाने जागतिक सर्वाधिक उंचीवरील हवाई दलाच्या ठाण्यांपैकी एक असलेल्या थोईसे या समुद्रसपाटीपासून 3,068 मीटर उंचीवर असलेल्या ठिकाणाहून अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे जाण्यासाठी कूच केले.
आयएएफ-युडब्ल्यूएम कार रॅली एकूण 7,000 किमीचा प्रवास करणार असून थोईसे येथे जाण्यासाठी निघालेल्या या पथकासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीच्या राष्ट्रीय युध्द स्मारक येथे 01 ऑक्टोबर 2024 रोजी हार्दिक निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. ही कार रॅली देशातील 9 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतून प्रवास करत जाणार असून 29 ऑक्टोबर 2024 रोजी तवांग येथे पोहोचण्यापूर्वी ती लेह, कारगिल, श्रीनगर, जम्मू, चंदीगड, डेहराडून, आग्रा, लखनौ, गोरखपूर, दरभंगा, बागडोगरा, हसिमारा, गुवाहाटी,तेजपूर तसेच दिरांग या ठिकाणी थांबेल.
कार रॅलीच्या प्रवासादरम्यान, हे पथक मार्गात भेटणाऱ्या युवकांशी संवाद साधेल आणि त्यांना हवाई दलात प्रवेश करण्यासाठी प्रोत्साहित करेल. आयएएफच्या वैभवशाली इतिहासाबद्दल तसेच हवाई योद्ध्यांनी विविध युद्धांमध्ये तसेच बचाव कार्यांच्या वेळी केलेल्या पराक्रमाची कृत्ये याबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे; आणि तरुण वर्गाला मातृभूमीची सेवा करण्यासाठी प्रेरणा देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. रॅलीच्या मार्गात विविध टप्प्यांवर अनेक माजी हवाईदल प्रमुख या रॅलीत सहभागी होणार आहेत.
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2063280)
Visitor Counter : 43