वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय परराष्ट्र व्यापार संस्था दुबईमध्ये आपले पहिले परदेशी संकुल उघडणार

Posted On: 07 OCT 2024 7:31PM by PIB Mumbai

मुंबई, 7 ऑक्‍टोबर 2024

 

भारतीय परराष्ट्र व्यापार संस्था (आयआयएफटी) दुबईतील एक्स्पो सिटीमधील प्रतिष्ठित अशा इंडिया पॅव्हेलियन मध्ये आपले पहिले परदेशी संकुल उघडणार आहे. या संदर्भातील एका सामंजस्य करारावर आयआयएफटी चे कुलगुरू प्रोफेसर राकेश मोहन जोशी आणि संयुक्त अरब अमिरातचे आंतरराष्ट्रीय सहकार राज्यमंत्री आणि एक्सपो सिटी दुबई प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रीम अल हाशिमी यांनी 03 ऑक्टोबर 2024 रोजी स्वाक्षरी केली. आयआयएफटी 2025 च्या सुरुवातीला आपले संकुल उघडणार असून त्या माध्यमातून अल्प आणि मध्यम कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रम, संशोधन आणि एमबीए (आंतरराष्ट्रीय व्यवसाय) या त्यांच्या महत्वाकांक्षी अभ्यासक्रमासह  काही प्रमुख उपक्रम सुरु करणार आहे.

आयआयएफटी हे आंतरराष्ट्रीय व्यवसाय संशोधन, प्रशिक्षण आणि शिक्षण क्षेत्रातील एक शैक्षणिक उत्कृष्टता केंद्र म्हणून ओळखले जाते. आयआयएफटी पहिल्यांदाच पूर्वीच्या एक्स्पो 2020 इंडिया पॅव्हेलियन मध्ये भारताबाहेर संकुल  स्थापन करेल. यूएईमध्ये राहणाऱ्या 3.5 दशलक्ष भारतीय समुदायासाठी हे संकुल  म्हणजे एक वरदान ठरेल. हे आयआयएफटी या ब्रँडच्या परदेशातील विस्तारासाठी आणि मान्यतेसाठीचे प्रवेशद्वार ठरेल.

आयआयएफटी  आणि दुबई एक्स्पो सिटी यांच्यातील सामंजस्य करार भारत आणि यूएईमधील द्विपक्षीय करारांच्या श्रेणीवर आधारित आहे, ज्यामध्ये स्थानिक चलनांमध्ये व्यापार तडजोडीची यंत्रणा, व्यापक आर्थिक भागीदारी करार (CEPA), द्विपक्षीय गुंतवणूक करार आणि इतरांचा समावेश आहे. 2 सप्टेंबर, 2024 रोजी, अबू धाबीचे युवराज  शेख खालेद बिन मोहम्मद यांनी आयआयटी दिल्ली-अबू धाबी मध्ये पहिला बी टेक अभ्यासक्रम सुरु करून या कॅम्पसचे उद्घाटन केले.

या संस्थेचे अभिनंदन करताना केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की दुबई मधील आयआयएफटीच्या नवीन संकुलाबाबतच्या या निर्णयामुळे या संस्थेचा खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाच्या संस्थेत कायापालट होईल. एवढेच नव्हे तर परकीय व्यापार क्षेत्रातील आयआयएफटीचे नैपुण्य लक्षात घेता केवळ युएईमधील विद्यार्थी, व्यावसायिक आणि सरकारी अधिकाऱ्यांनाच नाही तर आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रात प्रशिक्षण आणि संशोधन करू इच्छिणाऱ्या जगभरातील लोकांना त्याचा लाभ होणार आहे.

आयआयएफटीने दुबईत एक्स्पो सिटी येथे आपला पहिला परदेशी कॅम्पस स्थापन केल्याबद्दल वाणिज्य सचिव आणि आयआयएफटी संस्थेचे कुलपती सुनील बर्थवाल यांनी आनंद व्यक्त केला.  संस्थेचे दुबईतील संकुल हे केवळ आयआयएफटीच्या आंतरराष्ट्रीय विस्तारासाठीच नव्हे तर युएई सोबतच संपूर्ण आखाती प्रदेशात आणि त्यापलीकडे आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठीचे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

दुबई येथे परदेशातील पहिले संकुल आयआयएफटीला अत्याधुनिक संशोधन, प्रशिक्षण आणि शैक्षणिक कार्यक्रमांसह जागतिक दर्जाच्या संस्थेत रूपांतरित करण्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असे आयआयएफटीचे कुलगुरू, प्रा. राकेश मोहन जोशी म्हणाले.

 

आयआयएफटी  बद्दल:

वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त संस्था म्हणून 1963 मध्ये  स्थापन झालेल्या, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड (आयआयएफटी) ने अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त केला आहे आणि परकीय व्यापारावर लक्ष केंद्रित करणारी ही भारतातल्या प्रमुख व्यावसायिक संस्थांपैकी एक आहे.  व्यवसाय संशोधन, प्रशिक्षण आणि शिक्षण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्टतेचे शैक्षणिक केंद्र म्हणून आयआयएफटी ओळखली जाते. आयआयएफटी एक्स्पो सिटी दुबईसोबत संशोधन प्रकल्प आणि शाश्वतता आणि नावीन्यपूर्णतेवर लक्ष केंद्रित केलेल्या इतर ज्ञान केंद्रित सहकार्य विषयक उपक्रमांमध्ये सहकार्य करणार आहे.

 

* * *

PIB Mumbai | S.Kane/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2062950) Visitor Counter : 66


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi , Tamil