वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अबू धाबी गुंतवणूक प्राधिकरणाने (ADIA) गिफ्ट सिटी मध्ये कामकाजाला केला प्रारंभ

Posted On: 07 OCT 2024 7:25PM by PIB Mumbai

मुंबई, 7 ऑक्‍टोबर 2024

 

संयुक्त अरब अमिरातीमधील सर्वात मोठा सार्वभौम संपत्ती निधी आणि जगातील अशा सर्वात मोठ्या फंडांपैकी एक असणाऱ्या अबू धाबी गुंतवणूक प्राधिकरणाने (ADIA), आवश्यक नियामक मंजूरी मिळवल्यानंतर तसेच गिफ्ट सिटीमध्ये आपले कार्यालय उघडल्यानंतर भारतातील कामकाजाला सुरुवात केली आहे. या कार्यालयामुळे अबू धाबी गुंतवणूक प्राधिकरणाच्या भारतातील गुंतवणूक गतिविधींना  अधिक गती मिळणे अपेक्षित आहे.

अबू धाबी गुंतवणूक प्राधिकरणाची भारतातील गुंतवणूक संबंधी माहिती  अधिक व्यापक  बनवण्यासाठी प्राधिकरणाच्या भारतातील उपस्थितीचा लाभ घेण्याच्या मार्गांबाबत आज (7 ऑक्टोबर, 2024) मुंबईत भारत - संयुक्त अरब अमिरात यांच्यातील गुंतवणुकीवरील उच्च-स्तरीय संयुक्त कृती दलाच्या 12 व्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीचे सहअध्यक्षपद भारत सरकारचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री  पीयूष गोयल आणि अबू धाबी गुंतवणूक प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक शेख हमद बिन झायेद अल नाह्यान यांनी भूषविले.

अहमदाबादमधील गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (गिफ्ट सिटी) आपल्या स्थापनेपासूनच एक अग्रगण्य जागतिक वित्तीय आणि तंत्रज्ञान केंद्र म्हणून वेगाने उदयास येत आहे. ही गिफ्ट सिटी व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांचा विस्तार करण्यासाठी एक जोमदार आर्थिक परिसंस्था प्रदान करते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुलै 2023 मधील अबू धाबी भेटीदरम्यान, अबू धाबी गुंतवणूक प्राधिकरण भारतातील गिफ्ट सिटी मध्ये आपले अस्तित्व प्रस्थापित करेल अशी घोषणा करण्यात आली होती. संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्या जानेवारी 2024 मधील अहमदाबादच्या भेटीदरम्यान जारी केलेल्या संयुक्त निवेदनात या घोषणेचा पुनरुच्चार करण्यात आला होता. त्यानंतर, अबू धाबी गुंतवणूक प्राधिकरणाने गिफ्ट सिटी मध्ये भारताशी संबंधित गुंतवणुकीसाठी पर्यायी गुंतवणूक निधी स्थापन करण्याची घोषणा केली.

गिफ्ट सिटीमध्ये अबू धाबी गुंतवणूक प्राधिकरणाची उपस्थिती भारताच्या वाढत्या आणि गतिमान अर्थव्यवस्थेमध्ये संयुक्त अरब अमिरातीच्या संस्थात्मक गुंतवणूकदारांचे उच्च स्वारस्य अधोरेखित करते. यामुळे गिफ्ट सिटी एक मजबूत नियामक आणि कायदेशीर चौकटी अंतर्गत कार्यरत असलेले जागतिक दर्जाचे वित्तीय सेवा केंद्र असल्याचे सिद्ध होऊन गिफ्ट सिटीची प्रतिष्ठा वाढली आहे.

संयुक्त अरब अमिरात हा भारतातील सर्वात मोठा अरब गुंतवणूकदार देश  असून  या देशाने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारतात सुमारे 3 अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणुक केली आहे. संयुक्त अरब अमिरात हा भारतासाठी आर्थिक वर्ष 2023-24 साठी सहाव्या क्रमांकाचा थेट परदेशी गुंतवणुकीचा स्रोत होता तर 2000 पासून एकूण सातव्या क्रमांकाचा सर्वात मोठा स्रोत होता.  आखात  सहकार्य परिषद (GCC) गुंतवणुकीपैकी 70% पेक्षा जास्त गुंतवणूक भारतात संयुक्त अरब अमिराती मधून केली जाते.  31 ऑगस्ट 2024 रोजी अंमलात आलेला नवीन भारत- संयुक्त अरब अमिरात द्विपक्षीय गुंतवणूक करार दुतर्फा गुंतवणूक प्रवाह अधिक मजबूत करेल, अशी अपेक्षा आहे.

 

* * *

PIB Mumbai | S.Kane/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2062947) Visitor Counter : 58