आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशियासाठीच्या प्रादेशिक समितीच्या 77व्या सत्राला केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केले संबोधित


सार्वत्रिक आरोग्य सेवा साध्य करण्यासाठी प्राथमिक आरोग्यसुविधा आणि आवश्यक सेवा अधिक बळकट करण्यावर भर देत भारतीय आरोग्य यंत्रणेने "संपूर्ण सरकार" आणि "संपूर्ण समाज" हा दृष्टिकोन अंगिकारला आहे: जे पी नड्डा

केंद्र सरकारने आयुष्मान भारत प्रधानमंत्री - जन आरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठी सार्वजनिक वित्तपोषित आरोग्य विमा योजना सुरु केली. या उपक्रमात 120 दशलक्ष कुटुंबांचा समावेश असून त्यांना दरवर्षासाठी प्रति कुटुंब 6,000 अमेरिकी डॉलर्स इतका रुग्णालयात दाखल करण्यासाठीचा लाभ प्रदान केला जातो

असंसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध आणि नियंत्रण करण्यासाठी प्रारंभिक टप्प्यावर प्रतिबंधात्मक उपायांवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने भारताच्या राष्ट्रीय अभियानानंतर्गत देशभरात 753 असंसर्गजन्य रोग प्रतिबंधक केंद्र, 356 डे केअर सेंटर्स आणि 6,238 सामुदायिक आरोग्य केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत

भारत हा डिजिटल आरोग्य क्षेत्रात एखाद्या दीपस्तंभासारखा असून डिजिटल आरोग्य क्षेत्रात जागतिक स्तरावर पुढाकार घेऊन भारताने आयुष्मान भारत डिजिटल मिशन, ई संजीवनी, एकात्मिक आरोग्य माहिती प्लॅटफॉर्म - IHIP, सक्षम यांसारख्या डिजिटल सेवांच्या नेटवर्कच्या माध्यमातून आपला डिजिटल पायाभूत सेवांचा लाभ इतर देशांना दिला आहे

Posted On: 07 OCT 2024 4:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 ऑक्‍टोबर 2024

 

वैश्विक आरोग्याची व्याप्ती साध्य करण्यासाठी प्राथमिक आरोग्यसुविधा आणि आवश्यक सेवा अधिक बळकट करण्यावर भर देत भारतीय आरोग्य यंत्रणेने "संपूर्ण सरकार" आणि "संपूर्ण समाज" हा दृष्टिकोन अंगिकारला आहे. असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशियासाठीच्या प्रादेशिक समितीच्या 77व्या सत्राला संबोधित करताना केले. 

प्रादेशिक समितीच्या बैठकीच्या सुरुवातीच्या सत्रात पदाधिकाऱ्यांची निवड, ठराव आणि निर्णयांसाठी मसुदा गटाची स्थापना, सत्राचे नियमन करण्यासाठी "विशेष कार्यपद्धती" स्वीकारणे आणि अस्थायी अजेंडा स्वीकारणे यांचा समावेश होता.

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेनेच्या महासंचालकांच्या वतीने शेफ डी कॅबिनेट डॉ. रझिया पेंडसे, भूतानचे आरोग्यमंत्री लियोनपो तांडिन वांगचुक मालदीवचे आरोग्य मंत्री अब्दुल्ला नाझिम इब्राहिम, नेपाळचे आरोग्य आणि लोकसंख्या मंत्री प्रदिप पौडेल, तिमोर लेस्टेच्या आरोग्य मंत्री डॉ एलिया अँटोनियो डी अरौजो डॉस रीस अमरल, बांग्लादेशच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे वरिष्ठ सचिव एमए अकमल हुसैन आझाद, इंडोनेशियाच्या आरोग्य  मंत्रालयाचे महासचिव कुंता विबावा दासा नुग्राहा, श्रीलंकेच्या आरोग्य मंत्रालयाचे सचिव डॉ पीजी महिपाल, डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरियाचे भारतीय प्रजासत्ताकातील राजदूत चो हुई चोल आणि थायलंडच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाचे उप-स्थायी सचिव डॉ वीरावत इम्समरान उपस्थित होते. 

सर्वांसाठी आरोग्य कवच देण्याच्या वचनबद्धतेनुसार, केंद्र सरकारने जगातील सर्वात मोठी सार्वजनिक वित्तपोषित आरोग्य विमा योजना, आयुष्मान भारत प्रधानमंत्री- जन आरोग्य योजना (AB PM-JAY) सुरू केली आहे. या उपक्रमात 120 दशलक्ष कुटुंबांचा समावेश असून त्यांना दरवर्षासाठी प्रति कुटुंब 6,000 अमेरिकी डॉलर्स इतका रुग्णालयात दाखल करण्यासाठीचा  लाभ प्रदान केला जातो." केंद्र सरकारने अलीकडेच या योजनेची व्याप्ती वाढवली असून त्यानुसार 70  वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुरक्षा दिली जाणार आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यामुळे सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांसह सुमारे 45 दशलक्ष कुटुंबांना 5 लाख रुपयांच्या मोफत आरोग्य विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे. यातून भारताच्या भारताच्या वाढत्या वृद्ध लोकसंख्येसाठी सार्वत्रिक आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवा सुनिश्चित करण्याप्रति असलेली केंद्र सरकारची वचनबद्धता दिसून येते, असे ते म्हणले. 

असंसर्गजन्य आजारांमुळे (एन.सी.डी.) सार्वजनिक आरोग्याला मिळणारी वाढती आव्हाने ओळखून "उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांच्या  परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत 2010 पासून असंसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम राबवत आहे.” असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

“या उपक्रमामुळे सुरुवातीच्या टप्प्यात प्रतिबंधात्मक उपायांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी 753 एन. सी. डी. दवाखाने, 356 दैनंदिन जीवनात देखभाल केंद्रे आणि 6,238 सामुदायिक आरोग्य केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.” 

डिजिटल आरोग्य क्षेत्रात दीपस्तंभासारख्या असलेल्या भारत देशाने आपल्या जी 20 अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक स्तरावरील उपक्रमांना तंत्रज्ञान विषयक तसेच आर्थिक सहाय्य पुरवून आयुष्मान भारत डिजिटल मिशन इ संजीवनी, समग्र आरोग्य माहिती मंच (इंटिग्रेटेड हेल्थ इन्फॉर्मेशन प्लॅटफॉर्म IHIP), सक्षम यासारख्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा सामायिक केल्या. 

ते पुढे म्हणाले की “covid-19 महामारीच्या काळात कोविन डिजिटल मंचाने मिळवलेल्या उल्लेखनीय यशानंतर भारताने सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमासाठी ऑनलाइन डिजिटल मंच म्हणजे UWIN ची संकल्पना मांडली आहे. असे पोर्टल सर्व लसीकरण उपक्रमांची नोंदणी,  मागोवा तसेच देखरेख यांची व्यवस्था करेल.” अनेक दक्षिण आशियाई देशांमध्ये पारंपारिक तसेच पूरक औषधोपचार महत्त्वाची भूमिका बजावत असतात हे लक्षात घेऊन भारताने जागतिक पारंपारिक औषधोपचार केंद्र उभारण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेला पाठिंबा दिला आहे आणि त्यामागे अशा आरोग्यव्यवस्थांना जागतिक स्तरावर चालना देणे हा उद्देश आहे” असे ते पुढे म्हणाले.

आमची आयुष्यमान आरोग्य मंदिरे ही अशी सामुदायिक आरोग्य आणि कल्याण केंद्र आहेत जी आपल्या नागरिकांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी पारंपारिक आणि प्रचलित दोन्ही आता औषधोपचारांच्या माध्यमातून सर्वसमावेशक आरोग्य सेवा पुरवठ्यासाठी महत्त्वाची आहेत. 

केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी त्यांच्या भाषणाच्या समारोपाला माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ सबका विकास  सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या दृष्टीकोनाचा उल्लेख केला, ज्याचा अर्थ होतो सर्वांचा समावेश सर्वांचा विकास सर्वांचा विश्वास आणि सर्वांचे प्रयत्न . यामध्ये अशा एकतेचा समावेश आहे जी जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी, सर्व समावेश मानव केंद्रित विकासाला चालना देण्यासाठी, आकांक्षांना मान्यता देत विश्वास निर्माण करण्यासाठी आणि जागतिक हित या सगळ्यासाठी प्रत्येक देशाच्या सामर्थ्याचा वापर करण्यावर ती भर देते. सामुदायिक अनुभव हे देशभरात बदलाची कृती करायला प्रेरित करतात हा आमचा विश्वास आहे. आरोग्य हे सीमा ओलांडून जाते, त्यामुळे समग्र तसेच सहयोगी पद्धतीची आवश्यकता आहे. एकमेकांच्या यशातून आणि आव्हानातून शिकलो तर आपण आरोग्य व्यवस्था अधिक लवचिक करू शकतो. 

या सत्राला संबोधित करताना जागतिक आरोग्य संघटना, आग्नेय आशिया क्षेत्रीय संस्थेच्या स्थानीय संचालक सायना वाजेद म्हणाल्या १९४८ मध्ये जेव्हा आग्नेय आशियासाठी पहिली क्षेत्रीय कमिटी तयार झाली तेव्हा बालमृत्यूचा दर जागतिक स्तरावर जवळपास 147 एवढा होता तो आता 25 वर आला आहे. तेव्हा नुकतेच अँटीबायोटिक युग सुरू झाले होते आजमितीला आपल्याला मायक्रोबियल प्रतिबंधाची गरज भासत आहे आणि म्हणून ज्याप्रमाणे आपण भूतकाळातल्या आव्हानांना यशस्वी तोंड दिले त्याचप्रमाणे आपण नवीन आव्हानांना सुद्धा सामोरे जाऊ. यासाठी आपल्या पूर्व सुरींच्या बुद्धिमत्ता आणि 21 व्या शतकातील साधने यांच्यासह आत्ताच्या धोक्यांचा सामना कसा करायचा ते आपल्यावर अवलंबून आहे. 

केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव, आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव हेकाली जीमोमी, जागतिक आरोग्य संघटनेचे भारतातील प्रतिनिधी रोड ऑफरिन आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

 

* * *

JPS/Bhakti/Vijaya/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2062844) Visitor Counter : 36