पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रात मुंबई येथे अभिजात मराठी भाषा कार्यक्रमात सहभाग
मराठीला अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळणे हा प्रत्येकासाठी अभिमानाचा क्षण आहे: पंतप्रधान
मराठीबरोबरच बंगाली, पाली, प्राकृत आणि आसामी या भाषांनाही अभिजात भाषांचा दर्जा देण्यात आला असून, या भाषांशी संबंधित जनतेचे मी अभिनंदन करतो: पंतप्रधान
मराठी भाषेचा इतिहास अत्यंत समृद्ध असल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार
महाराष्ट्रातील अनेक क्रांतिकारी नेत्यांनी आणि विचारवंतांनी मराठी भाषेचा वापर लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी केला: पंतप्रधान
भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृती, इतिहास, परंपरा आणि साहित्याशी घट्ट जोडलेली असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
Posted On:
05 OCT 2024 8:50PM by PIB Mumbai
मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, केंद्र सरकारने मराठी भाषेला अधिकृतपणे अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. हा क्षण महत्वाचा असून, हे मराठी भाषेच्या इतिहासातील सोन्याचे पान असल्याचे ते म्हणाले. मराठी भाषिकांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित आकांक्षा पूर्ण झाल्या असून, महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यात योगदान देण्याची आपल्याला संधी मिळाली, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन केले आणि या ऐतिहासिक कामगिरीचा भाग असल्याचा अभिमान व्यक्त केला. बंगाली, पाली, प्राकृत आणि आसामी या भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आल्याचे सांगून, पंतप्रधानांनी या भाषांशी संबंधित जनतेचे अभिनंदन केले. मराठी भाषेचा इतिहास खूप समृद्ध आहे आणि या भाषेतून निर्माण झालेल्या ज्ञानाच्या प्रवाहांनी अनेक पिढ्यांना मार्गदर्शन केले आहे आणि आजही ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत, असे पंतप्रधानांनी विशेष नमूद केले. ते पुढे म्हणाले की, मराठी भाषेच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांनी लोकांना वेदांमधील ज्ञानाशी जोडले आणि ज्ञानेश्वरीने गीतेचा बोध लोकांपर्यंत पोहोचवून भारताचे आध्यात्मिक ज्ञान पुन्हा जागे केले.
संत नामदेवांनी मराठीचा वापर करून भक्ती संप्रदायाबद्दलची जाणीव बळकट केली, तर संत तुकाराम यांनी मराठी भाषेत धार्मिक जागृती मोहीम सुरू केली, आणि संत चोखामेळा यांनी सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींना बळ दिले, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
“मी महाराष्ट्र आणि मराठी संतांना नमन करतो”, पंतप्रधान मोदी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेकाच्या वर्षात संपूर्ण देशाने केलेला त्यांचा सन्मान आहे.
पंतप्रधानांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यातले मराठी भाषेचे अमूल्य योगदान अधोरेखित केले आणि महाराष्ट्रातील अनेक क्रांतिकारक नेते आणि विचारवंतांनी जनजागृती तसेच जनसामान्यांना एकत्र करण्यासाठी मराठीचा माध्यम म्हणून कसा वापर केला ते नमूद केले.ते म्हणाले की, लोकमान्य टिळकांनी त्यांच्या केसरी या मराठी वृत्तपत्राद्वारे परकीय राजवटीचा पाया खिळखिळा केला आणि मराठीतील त्यांच्या भाषणांनी प्रत्येक भारतीयाच्या हृदयात स्वराज्याची इच्छा प्रज्वलित केली. न्याय आणि समतेसाठीचा लढा पुढे नेण्यात मराठी भाषेने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. गोपाळ गणेश आगरकर यांच्यासारख्या इतर दिग्गजांच्या योगदानाचे त्यांनी स्मरण केले, ज्यांनी त्यांच्या सुधारक या मराठी वृत्तपत्राद्वारे सामाजिक सुधारणांची मोहीम प्रत्येक घरापर्यंत पोहोचवली. गोपाळ कृष्ण गोखले हे आणखी एक दिग्गज होते ज्यांनी स्वातंत्र्यलढ्याला ध्येयाकडे नेण्यासाठी मराठीचा आधार घेतला. मराठी साहित्य हा भारताचा अमूल्य वारसा आहे, ज्याने आपल्या संस्कृतीच्या वाढीच्या आणि सांस्कृतिक प्रगतीच्या कथा जतन केल्या आहेत यावर मोदींनी भर दिला. स्वराज्य, स्वदेशी, मातृभाषा आणि सांस्कृतिक अभिमान या आदर्शांचा प्रसार करण्यात मराठी साहित्याचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वातंत्र्य चळवळी दरम्यान महाराष्ट्रातील गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव, वीर सावरकरांचे क्रांतिकारी विचार, बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील सामाजिक समतेची चळवळ, महर्षी कर्वे यांची महिला सक्षमीकरण मोहीम, तसेच औद्योगिकीकरण आणि कृषी सुधारणा प्रयत्न यासारखे उपक्रम त्यांनी अधोरेखित केले , ज्यांना मराठी भाषेची ताकद मिळाली. आपल्या देशाची सांस्कृतिक विविधता मराठी भाषेशी जोडली गेल्यामुळे अधिक समृद्ध झाली आहे असे ते म्हणाले.
"भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नाही तर ती संस्कृती, इतिहास, परंपरा आणि साहित्याशी घट्ट जोडलेली आहे," असे पंतप्रधान म्हणाले. पोवाडा या लोकगीताविषयी बोलताना मोदी म्हणाले की, अनेक शतकांनंतरही छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर वीरांच्या शौर्याच्या गाथा आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत. पोवाडा ही आजच्या पिढीला मराठी भाषेची अद्भूत देणगी असल्याचे त्यांनी नमूद केले. आज जेव्हा आपण गणपतीची पूजा करतो तेव्हा ‘गणपती बाप्पा मोरया’ हे शब्द स्वाभाविकपणे आपल्या मनात रुंजी घालतात आणि ते केवळ काही शब्दांचे वाक्य नाही तर भक्तीचा अनंत प्रवाह आहे असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ही भक्ती संपूर्ण देशाला मराठी भाषेशी जोडते असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे श्री विठ्ठलाचे अभंग ऐकणारेही आपोआप मराठीशी जोडले जातात असेही मोदी यांनी अधोरेखित केले.
मराठी साहित्यिक, लेखक, कवी आणि असंख्य मराठी प्रेमींनी मराठी भाषेसाठी दिलेले योगदान आणि केलेले प्रयत्न अधोरेखित करून मोदी म्हणाले की या भाषेला अभिजात दर्जा मिळणे हा अनेक प्रतिभावान साहित्यिकांच्या सेवेचा परिणाम आहे. बाळशास्त्री जांभेकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, केशवसुत, श्रीपाद महादेव माटे, आचार्य अत्रे, अण्णाभाऊ साठे, शांताबाई शेळके, गजानन दिगंबर माडगूळकर, कुसुमाग्रज यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांचे योगदान अतुलनीय आहे असे त्यांनी सांगितले.
मराठी साहित्याची परंपरा ही केवळ प्राचीन नसून बहुआयामी आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. विनोबा भावे, श्रीपाद अमृत डांगे, दुर्गाबाई भागवत, बाबा आमटे, दलित साहित्यिक दया पवार, बाबासाहेब पुरंदरे अशा अनेक थोर व्यक्तिमत्त्वांनी मराठी साहित्यात भरीव योगदान दिले आहे, असेही ते म्हणाले. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, डॉ. अरुणा ढेरे, डॉ. सदानंद मोरे, महेश एलकुंचवार, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते नामदेव कांबळे यांच्यासह मराठी भाषेची सेवा करणाऱ्या सर्व साहित्यिकांच्या योगदानाचेही पंतप्रधानांनी स्मरण केले. आशा बगे, विजया राजाध्यक्ष, डॉ. शरणकुमार लिंबाळे, नाट्यदिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी अशा अनेक दिग्गजांनी वर्षानुवर्षे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे स्वप्न पाहिले होते, असे त्यांनी सांगितले.
व्ही. शांताराम आणि दादासाहेब फाळके यांसारख्या दिग्गजांनी भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचला, असे नमूद करून पंतप्रधानांनी मराठी चित्रपट, साहित्य आणि संस्कृतीत त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. शोषितांचा आवाज बनलेल्या मराठी रंगभूमीची प्रशंसा करत पंतप्रधानांनी बाल गंधर्व, भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांसारख्या महान कलाकारांच्या योगदानाबद्दल आणि त्यांनी मराठी संगीत परंपरा कायम राखल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली.
पंतप्रधानांनी अहमदाबादमधील एका मराठी कुटुंबाने त्यांना मराठी भाषा शिकण्यास मदत केली याबद्दलची एक वैयक्तिक आठवण सांगितली. मराठीला अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळाल्याने भारतभरातील विद्यापीठांमध्ये या भाषेविषयीच्या संशोधनाला चालना मिळेल तसेच मराठीतील साहित्य संग्रहालाही चालना मिळेल यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. या निर्णयामुळे मराठी भाषेच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण प्रोत्साहन मिळेल, असेही पंतप्रधान म्हणाले. या उपक्रमामुळे शिक्षण आणि संशोधनाचे नवीन मार्ग खुले होतील आणि या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी वाढतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
देशामध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षणाला प्राधान्य देणारे सरकार आहे यावर भर देऊन पंतप्रधानांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रम देखील मराठीतून शिकवले जाण्याची शक्यता अधोरेखित केली. विज्ञान, अर्थशास्त्र आणि कला यांसारख्या विविध विषयांवर मराठीतील पुस्तकांची उपलब्धता वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले आणि मराठीला विचारांचे माध्यम बनवण्यावर भर दिला जेणेकरून मराठी भाषा चैतन्यपूर्ण राहील. मराठी साहित्य जागतिक स्तरावर पोहोचवण्याच्या प्रयत्नांना त्यांनी प्रोत्साहन दिले आणि भाषांतर वैशिष्ट्याद्वारे भाषेतील अडथळे दूर करण्यास मदत करणाऱ्या भाषिणी ॲपचाही त्यांनी उल्लेख केला.
या ऐतिहासिक सोहळ्यामुळेही जबाबदारी वाढली असल्याची पंतप्रधानांनी सर्वांना आठवण करून दिली. मराठी भाषेच्या विकासासाठी प्रत्येक मराठी भाषिकाने हातभार लावलाच पाहिजे, हे त्यांनी अधोरेखित केले. मराठी भाषेबाबत भावी पिढ्यांमध्ये अभिमानाची भावना निर्माण करून मराठीचा आवाका वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. मराठीला अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
***
S.Patil/R.Agashe/S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2062542)
Visitor Counter : 99
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam