राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

एनडीसी अर्थात राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाच्या 64 व्या अभ्यासक्रमाच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेतली भेट

Posted On: 01 OCT 2024 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 ऑक्‍टोबर 2024

 

एनडीसी अर्थात राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाच्या 64 व्या अभ्यासक्रमाच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी आज (1 ऑक्टोबर, 2024) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

झपाट्याने बदलणाऱ्या भू-राजकीय वातावरणात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. अलीकडच्या काळात अत्यंत वेगाने घडलेल्या घटना पाहता कदाचित  एक दशकापूर्वी  त्यांचा अंदाजही लावता आला नसता असे राष्ट्रपती यावेळी बोलताना म्हणाल्या. म्हणूनच प्रशासकीय सेवेतील असोत किंवा लष्करी सेवेतील असोत, सर्व अधिकाऱ्यांना,  त्यांच्यासमोरील आव्हाने आणि शक्यतांबद्दल जागरूक असणे गरजेचे आहे तसेच या आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांच्याकडील सामर्थ्याचा अंदाज देखील त्यांना असायला हवा, असे राष्ट्रपती म्हणाल्या. तंत्रज्ञानाचा अवलंब त्यांच्या संस्थेसाठी, देशासाठी आणि मानवतेच्या भल्यासाठी कशाप्रकारे करता येईल, या सामर्थ्याची जाणीव त्यांना असायलाच हवी, आणि त्याशिवाय तरणोपाय नाही याविषयीचे आकलन गरजेचे आहे. नावीन्य हा आणखी एक घटक आहे जो त्यांना भविष्यासाठी तयार ठेवेल, असे राष्ट्रपतींनी सांगितले

आपली सुरक्षा विषयक चिंता आता प्रादेशिक अखंडतेच्या रक्षणापर्यंत मर्यादित राहिली नसून त्यामध्ये आर्थिक, पर्यावरणीय, ऊर्जा सुरक्षा आणि सायबर सुरक्षा यांसारख्या राष्ट्रीय हिताच्या गोष्टी जोडल्या गेल्या आहेत. या सर्व गोष्टींकडे लक्ष पुरवण्यासाठी सखोल संशोधन आणि सर्वांगीण दृष्टीकोनाची आवश्यकता आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले.

   

सायबर हल्ले हा राष्ट्रीय सुरक्षेला असलेला मोठा धोका बनला आहे. या सायबर हल्ल्यांना तोंड देण्यासाठी अतिशय अद्ययावत तंत्रकुशल व्यवस्था आणि प्रशिक्षित आणि तज्ञ मनुष्यबळ तसेच मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा यांची आवश्यकता आहे, असे त्या म्हणाल्या. हे अशा क्षेत्रांपैकी एक आहे जिथे अशा हल्ल्यांना परतवून लावण्यासाठी एक सक्षम आणि सुरक्षित देशव्यापी प्रणाली उभारण्याकरता प्रशासकीय सेवा आणि सशस्त्र दलांनी एकजुटीने काम करायला हवे. तंत्रज्ञानातील विकासामुळे डिजिटल पायाभूत सेवा उभारणे आणि त्याचा वापर करणे देशासाठी अनिवार्य झाले आहे. शासन प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात डेटा आणि संवेदनशील माहिती देखील उपलब्ध आहे जी असुरक्षित ठेवली जाऊ शकत नाही असे सांगून सर्वांनी या समस्येचे गांभीर्य समजून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी केले.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

* * *

N.Chitale/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2060782) Visitor Counter : 15